Thu, Jun 24, 2021 10:50
संकट काळात राजकारण करणे खा. सुजय विखे पाटील यांना शोभते का ? : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे 

Last Updated: Jun 01 2021 11:10PM

राहुरी : पुढारी वृत्तसेवा

कोरोनाच्या जीव घेणार्‍या संकट काळात खासदार डॉ. सुजय विखे यांनी काही कार्यकर्त्यांच्या बोलण्यावरून राहुरीत येऊन खोटे नाटे आरोप करणे हे मुळीच पटले नाही. राहुरीकरांनी मोठे मताधिक्य देऊनही खासदार विखे हे कोरोनाची भयावह लाट ओसरत असताना राहुरीत आले. किमान राहुरीत आले हे समाधान कारक असताना त्यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत दुर्देवी असल्याचे प्रतिपादन राज्याचे नगरविकास तथा उर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी झूम अ‍ॅपद्वारे पत्रकारांशी संवाद साधत खासदार डॉ. सुजय विखे यांनी केलेल्या आरोपांबाबत उत्तरे दिली. यावेळी राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले की, राज्याला लस पुरवठा करण्याची जबाबदारी ही नक्कीच केंद्राची होती. केंद्र शासनानेच भारत बायोटेक व सिरम कंपनीची लस पाठविली. परंतु, केंद्राकडून किती प्रमाणात लस पुरवठा झाला. लोकसंख्या पाहता तुटपुंज्या प्रमाणात लस आरोग्य प्रशासनाला मिळत होती. त्यामुळे आरोग्य विभागावर संकट निर्माण झाले होते. शेकडोच्या प्रमाणात लस येत असताना हजारोच्या संख्येने नागरिक गर्दी करीत होते. अशावेळी लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी म्हणून नियोजन करणे माझे कर्तव्य होते. केंद्र व राज्याच्या निधीचे भांडण करण्यापेक्षा लोकांचे जीव वाचविण्याला महत्व होते. खासदार डॉ. सुजय विखे हे कोरोना लाट कमी झाल्यानंतर राहुरीत दाखल झाले. ते राहुरीत आल्याचे समाधान असले तरीही त्यांनी केलेले राजकारण हे संकट काळात न पटण्यासारखे असल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रक्कमेवर रुग्णवाहिका  खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली. वित्त आयोगाचा निधी हा केद्राचा असतो. परंतु त्यावरील व्याजाच्या खर्चाचे नियोजन हे राज्य शासन करीत असते. त्यामुळे राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे 45 रुग्णवाहिका जिल्ह्यात उपलब्ध झाल्या. वाड्यावर बसून नियोजन करणे हे  मला कधीच जमलेले नाही. राहुरी तालुक्यातील सर्वच कोविड सेंटरवर मी प्रत्यक्षपणे पाहणी केली. रुग्णांना दिल्या जाणार्‍या सोय सुविधांची दैनंदिन माहिती घेतली. इतकेच नव्हे तर कोविड सेंटरमध्ये थांबून जेवणाच्या दर्जाबाबत प्रत्यक्ष अनुभव घेतला. घरात बसण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन कोरोना कालखंडाचे नियोजन केले. स्वतःच्या कामाचा उदोउदो करून घेण्याची माझी सवय नाही. परंतु जेवढे काही सर्वसामान्यांसाठी करता येईल तेवढे काम कोरोना कालखंडात केले आहे. खासदार डॉ. सुजय विखे हे सत्ताधारी पक्षाचे आहेत. त्यांच्याकडून अशा पद्धतीने संकट काळात खोट्या नाट्या पद्धतीने आरोपाची अपेक्षा नव्हती. परंतु त्यांना कार्यकर्त्यांनी चुकीची माहिती दिल्याचे समजत आहे. कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या खोट्या माहितीची शहानिशा खासदार विखे यांनी करणे गरजेचे होते.

दरम्यान, देशामध्ये सर्वत्र लसीचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आठवड्याभरात एकदा किंवा दोनदा लस उपलब्ध होते. खरे म्हणजे डॉ. विखे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय आरोग्य मंत्र्याची भेट घेऊन लसीचा निर्माण झालेल्या तुटवडा व आरोग्याबाबत निर्माण झालेल्या समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी चर्चा करणे गरजेचे होते. ते न करता केवळ राजकीय टिका टिप्पणी हे कोरोनाच्या संकट काळात खासदार विखे यांना शोभत नसल्याचे मंत्री तनपुरे यांनी सांगितले.

केंद्र शासनाने पहिल्या लाटेनंतरच दुसर्‍या लाटेची तयारी करणे गरजेचे होते. परंतु त्यांना निवडणुका जिंकणे व गर्दी करण्यातच धन्यता वाटले. केंद्र शासनाने लस निर्मितीसाठी वेळेवर निधी दिला असता तर आज देशामध्ये मुबलक प्रमाणात लस पुरवठा झाला असता. परंतु केंद्र शासन हे कोरोना बाबत पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यांच्या अपयशाचे खापर खासदार डॉ. विखे हे राज्य शासनावर फोडत आहेत. लस देण्यापूर्वी चाचणी करण्याचा निर्णय जिल्हा आरोग्य यंत्रणेने घेतला होता. कोरोना संसर्ग असलेल्या व्यक्तीस लस दिल्यास त्याचा वाईट परिणाम होत असल्याचे समोर आले होते. चाचण्यांची क्षमता वाढविणे व लस घेण्यासाठी गर्दी ठिकाणी आलेल्या व्यक्तीची कोरोना चाचणी करून संसर्ग वाढू नये तसेच तपासणी करूनच लसीकरण झाल्यास त्या लसीचा उपयोग व्हावा अशी भावना होती. त्यामुळे लसीकरणापूर्वी कोरोना चाचणीचा निर्णय घेतला. तसेच शासकीय अधिकार्‍यांनाही कोणत्याही राजकीय नेत्याचे न ऐकता सर्व नियोजन हे शासकीय अधिकार्‍यांमार्फतच व्हावे म्हणून सक्त सूचना केलेल्या होत्या. त्यामुळे अधिकार्‍यांवर दबाव आणणे व कोरोना लसीकरण केंद्रावर राजकारण करणे हा प्रकार राहुरीत कोठेही घडला नाही. खासदार डॉ. सुजय विखे यांनी राहुरी येथील लसीकरण केंद्रावर जाणे गरजेचे होते. त्यांना सत्यता कळाली असती. जिल्ह्यात सर्वाधिक चांगल्या पद्धतीचे लसीकरण राहुरीत होत आहे. जिल्ह्यामध्ये राहुरीच्या पॅटर्नचा अवलंब करण्यात आला. याची माहिती खासदार डॉ. विखे यांना नसावी. त्यामुळेच त्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या खोट्या माहितीमुळे माझ्यावर खालच्या पातळीचे आरोप केले आहे. कोरोनाच्या या संकट काळात राजकारण कोणीही करू नये अशी माझी भावना होती. परंतु माझ्यावर खोटे आरोप झाल्याने पत्रकार परिषद घेत मला उत्तर द्यावे लागल्याचे राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले.

अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी लोकार्पण केल्याचा आनंदच : राज्यमंत्री तनपुरे

माझ्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी जिल्हा परिषदेचे माजी सभापती अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी रुग्णवाहिकांचे लोकार्पण केले. त्यांनी केलेला लोकार्पण सोहळ्याने मला आनंद झाला. लोकार्पण करण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. त्यामुळे मला त्याबद्दल काहीच वाईट वाटलेले नाही. अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी रुग्णवाहिकांचे लोकार्पण करून रुग्णसेवेला प्राधान्य दिल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले.