कोपरगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील संवत्सर-पढेगाव चौकी जवळील रहिवासी व सैनिक म्हणून कार्यरत असलेल्या विशाल बाबासाहेब भोसले (28) यांचा नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथे अपघाती मृत्यू झाला.
मयत विशाल भोसले हे पिंपळगाव शहरातील चिंचखेडरोड परिसरात आपल्या दुचाकीवरून जात असताना पुढे जाणार्या ट्रकवर त्यांची दुचाकी आदळली. या अपघातात भोसले जागीच ठार झाले.
ही घटना काल, दि. 6 रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास हॉटेल अजिंक्य परिसरात घडली. त्यांच्या सोबत असलेला त्यांचा मित्र प्रशांत अगवान हा जबर जखमी झाला असून त्याला नाशिक येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
मयत जवान विशाल भोसले यांच्या मागे पत्नी अंकिता, आई मीनाबाई, वडील बाबासाहेब व भाऊ मयूर असा परिवार आहे. भोसले यांचा जन्म 15 जून 1990 रोजी झाला होता. यांनी येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयात शिक्षण घेतले होते.
सैन्यात जाण्याची त्यांची लहानपणापासून इच्छा होती. सहा महिन्यापूर्वी संवत्सर येथील शरद शेटे यांच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला होते. या घटनेमुळे संवत्सर परिसरावर शोककळा पसरली आहे.