होमपेज › Ahamadnagar › केडगाव दगडफेक प्रकरण; जामिनावर झाली सुटका

शिवसेनेचे १० जण पोलिसांत हजर

Published On: Jun 02 2018 2:00AM | Last Updated: Jun 02 2018 12:29AMनगर : प्रतिनिधी

केडगाव येथे पोलिसांवर दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी असलेले 10 शिवसैनिक काल (दि. 1) कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांच्या अटकेची कार्यवाही करून पोलिसांनी दुपारी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर सायंकाळी सुटका करण्यात आली.

हजर झालेल्यांमध्ये संग्राम शेळके, अनिल सातपुते, मुकेश गावडे, सागर गायकवाड, अंगद महानोर, नयन गायकवाड, नितीन चोभे, शुभम परदेशी, नरेश भालेराव, मनोज चव्हाण यांचा समावेश आहे. याबाबत माहिती अशी की, केडगाव येथील दुहेरी हत्याकांडानंतर पोलिसांवर दगडफेक करून धक्काबुक्की करण्यात आली होती. तसेच परिसरातील दुकाने, सरकारी वाहने यांची तोडफोड केली होती. वाहतुकीस अडथळा करण्यात आला होता. याप्रकरणी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात फरार असलेले 10 आरोपी शुक्रवारी सकाळी कोतवाली पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून अटकेची कार्यवाही केली. त्यानंतर आरोपींना दुपारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

पोलिसांनी न्यायालयाकडे आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. आरोपीच्या वकिलांनी बचावाचा प्रयत्न केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आरोपीच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज केला. न्यायालयाने सर्व 10 आरोपींना प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या ऐपत प्रमाणपत्रावर जामीन मंजूर केला. जामीनाची पूर्तता करून सायंकाळी आरोपींची सुटका करण्यात आली.