Wed, Jan 20, 2021 22:22
तीन दशकांपासून बिनविरोध झालेल्या हिवरेबाजारमध्ये उडाला निवडणुकीचा धुरळा 

Last Updated: Jan 14 2021 2:25PM
हिवरेबाजार (अहमदनगर) : पुढारी वृत्तसेवा

सुमारे तीन दशकानंतर अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव हिवरेबाजार येथील ग्रामपंचायत निवडणूक नव्या पिढीसाठी नवीनच गोष्ट असणार आहे. प्रचाराचा धुरळा व घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटींमुळे गावातील संपुर्ण वातावरण निवडणूकमय झाले. विरोधकांना निचांकी मते मिळतील, यासाठी पोपटराव पवार यांच्या गटाकडून प्रत्येक मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत, तर विरोधी किशोर संबळे गटाकडून या निवडणुकीत चमत्कार घडवून गावात परिवर्तन घडणार असल्याचा दावा केला जात आहे.

हिवरेबाजार हे पैलवानांचे गाव म्हणून ओळखले जाते. जुन्या काळात या गावात पवार, ठाणगे गटात मोठ्या प्रमाणात संघर्ष होत होता. सन १९८५  ते ८९ या कालावधीत या निवडणुकीतील विरोधी उमेदवार किशोर संबळे यांचे वडील उत्तमराव संबळे हे सरपंच होते. राष्ट्रीय स्तरावर क्रिकेटच्या माध्यमातून नावलौकिक मिळवलेल्या पोपटराव पवार यांनी गावातील पारंपरिक वैरभाव मिटवण्यासाठी सन १९८९ साली बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूकीचा पायंडा सुमारे तीन दशके कायम ठेवला. तेव्हापासून पोपटराव पवार यांनी सरपंच किंवा उपसरपंच पदावर काम करून देशपातळीवर गावाचे नाव झळकावले. 

मध्यंतरीच्या काळातही गावातील भावकीच्या सुप्त संघर्षाची धग कायम होती. प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीवेळी उफाळून येणारी ही धग माघारीच्या दिवसापर्यंत शमवण्यात पोपटराव पवार यांच्यासह जुन्या जाणत्यांना यश येत होते. उत्तमराव संबळे यांना अलिकडच्या काळात तेरा वर्षे विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन ठेवले होते. यावेळी मात्र उत्तमराव संबळे यांचे चिरंजीव शिक्षक असलेले किशोर संबळे यांनी पवारांच्याच भावकीतील एका गटाला बरोबर घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. त्यामुळे १९८९ नंतर गावात प्रथमच जाहीर प्रचार सुरू झालेला आहे. 

मागील तीन दशकांपासून लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गावात जाहीर प्रचार झाला नाही. उमेदवार गावाच्या वेशीवर येऊन आपली भूमिका मांडत होते. त्यानुसार ग्रामस्थ मतदान करत होते. यावेळी मात्र गावात पहिल्यांदाच किशोर संबळे यांच्या गटाकडून उमेदवारांची पॉम्प्लेट वाटत रिक्षा फिरली. वाद्यसंगीत व परिवर्तनाच्या घोषणाबाजीमुळे गावातील वातावरण निवडणूकमय झाले होते. गावातील नवीन पिढीसह बाया-बापड्यांना हा प्रकार नवीनच वाटत होता. 

पोपटराव पवार यांनी गल्लोगल्ली जाऊन मतदारांच्या बैठका घेतल्या. समारोपाच्या सभेत त्यांनी सांगितले की, निवडणुकीमुळे गावाचे वातावरण बिघडू देऊ नका. निवडणुकीनंतरही गावातील वातावरण असेच राहू द्या. कुणी विरोध केला म्हणून त्याच्याशी वैरभाव ठेवू नका. गावाचे विकासासाठीची विरोध करणाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी काम करणार्‍यांना सुद्धा निवडणुकीत पाडले जाते. आपल्या गावात मात्र काम करणाऱ्यांना निवडून दिले जाते ही परंपरा कायम ठेवत राज्याला नवा आदर्श दाखवायचा आहे, असे सांगितले. 

किशोर कांबळे यांनी सत्ताधारी पोपटराव पवार यांच्या गटावर हुकुमशाहीचा आरोप करत परिवर्तन अटळ असल्याचा दावा केला. सत्ताधारी गटाकडून ग्रामस्थांना मत मांडू दिले जात नाही. अभी नही तो कभी नही असे सांगत यावेळी हिवरेबाजारमध्ये परिवर्तन घडविण्याचा चंग बांधला. ग्रामपंचायतीची सत्ता आल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने आणखी मोठे काम करू असा विश्वास किशोर कांबळे यांनी व्यक्त केला.

निवडणुकीच्या काळात हिवरेबाजार गावात दारू व अर्थकारणाचे प्रकार घडत नाहीत. यावेळी मात्र एका गटाकडून लक्ष्मी दर्शनाची तयारी सुरु केल्याची कुणकूण दुस-या गटाला लागली. त्यामुळे दुस-या गटाने सजग होत रात्रंदिवस त्या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. गावात निवडणुकीच्या काळात जर अर्थकारण सुरू झाले तर गाव पुन्हा जुन्या वळणावर जाण्याची भीती ज्येष्ठांनी व्यक्त केली.