होमपेज › Ahamadnagar › पशुधन आरोग्य सुविधेबाबत हेळसांड!

पशुधन आरोग्य सुविधेबाबत हेळसांड!

Published On: Jul 18 2018 1:52AM | Last Updated: Jul 17 2018 11:12PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

जनावरांना अत्यावश्यक आरोग्य सुविधा मिळाव्यात, या हेतूने जिल्ह्यात तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाच्या इमारती कोट्यवधी रुपये खर्चून उभारण्यात आल्या आहेत. मात्र, याठिकाणी अनेक पदे रिक्त आहेत तर तेथे अत्याधुनिक मशिनरींचाही अभाव आहे. काही ठिकाणी मशीन असले, तरी त्यांना परवानगी नसल्याने जनावरांची आरोग्य सुविधांबाबत हेळसांड होत असल्याचे उदासीन चित्र पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात 14 लाख 1 हजार 1 गाय वर्ग, 2 लाख 17 हजार 802 म्हैस, 3 लाख 55 हजार 674 मेंढ्या, 7 लाख 91 हजार 756 शेळ्या इतकी जनावरे असून 50 ते 60 रुपये शासकीय शुल्र भरून या सर्व जनावरांना आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सरकारने राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, पारनेर, अकोले, राहुरी याठिकाणी तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालये उभारली आहेत. मात्र, यातील पारनेर, अकोले, राहुरी याठिकाणी प्रमुख असणारे सहायक आयुक्त पशुसंवर्धन अधिकार्‍याचे पद मंजूर असतानाही अनेक दिवसांपासून रिक्त आहे. त्यामुळे येथील पदभार पशुधन विकास अधिकार्‍यांवर सोपविण्यात आला आहे. त्यामुळे तालुका कार्यक्षेत्रातील जनावरांना आरोग्य सुविधा पुरविण्यात अडचणी येत असल्याने जनावरांना खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घेण्याची वेळ अनेक शेतकर्‍यांवर आली आहे. तसेच राहुरी व राहाता येथे येथे वरिष्ठ लिपीक पदही रिक्त आहे. तसेच अनेक कार्यालयांत फर्निचरचाही पुरवठा झाला नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे कार्यालयीन कामकाजाचाही बोजवारा उडत आहे. 

दरम्यान, राहुरी येथे सोनोग्राफी व एक्स्रे मशीन नाही, श्रीरामपूर येथे सोनोग्राफी मशीन असून, वापर सुरू करण्याच्या परवानगीअभावी, तसेच पडून आहे. एक्स रे मशीन अद्यापि उपलब्ध करून दिलेले नाही. पारनेर येथे सोनोग्राफी मशीनची नोंदणी बाकी आहे. त्यामुळे त्याचाही वापर होत नाही. अकोले येथील इमारतीचे बांधकाम सुरू असून, ते या महिन्यात पूर्ण झाल्यानंतर त्यांना मशिनरींचा पुरवठा करण्यात येणार आहे. जनावरांच्या विविध आजारांचे निदान होण्यासाठी तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयांत विविध अत्याधुनिक मशिनरींचा पुरवठा गरजेचे आहे. मात्र, बर्‍याचशा ठिकाणी एक्स रे सारख्या मशिनरी उपब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे अनेक जनावरांना जिल्ह्याच्या ठिकाणी नेण्याचा सल्ला देण्यात येतो. जिल्हा शल्य चिकित्सालयाकडून सोनोग्राफी मशीन वापरण्याबाबत परवानगी न मिळाल्याने त्या तशाच पडून आहेत. याबाबत तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयांच्या अधिकार्‍यांनी प्रस्तावही सादर केले आहेत. त्यामुळे लाखो रुपयांच्या मशिनरींचा परवानगीअभावी वापर थांबल्याने संताप व्यक्त होत आहे. सरकार दुग्ध व्यवसायाला बळीकटी आणण्यासाठी विविध योजना राबवित आहे. मात्र, पशुधनाच्या आरोग्य सुविधांबाबत आवश्यक साधनांचा पुरवठा करण्यात शासन उदासिनता असल्याचे दिसते.

पदभार पशुधन विकास अधिकार्‍यांकडे

सोनोग्राफी मशीनची नोंदणी शुल्क 25 हजार रुपये असून जिल्हा सिव्हिल सर्जन यांच्याकडून त्याची नोंदणी करून घ्यावी लागते. अकोले, पारनेर, राहुरी येथे सहायक आयुक्त पशुसंवर्धन अधिकार्‍याचे पद मंजूर असतानाही रिक्त असल्याने याठिकाणचा चार्ज पशुधन विकास अधिकार्‍यांकडे देण्यात आला आहे. 
 
- डॉ. एल.बी. भांगरे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

श्रीरामपुरात ‘श्रेय’ घेण्यासाठी दोन वेळा उद्घाटने

श्रीरामपूर शहरात कोट्यवधी रुपये खर्चून तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयांची उभारणी करण्यात आली. मात्र, तालुक्याच्या पुढार्‍यांनी केवळ श्रेय घेण्यासाठी या कार्यालयाची दोनदा उद्घाटने केली. मात्र, कार्यालयाच्या उद्घाटनानंतरही येथील सुविधा, अडचणी, विविध मशिनरींचा तुटवडा याकडे ढुकूंनही पाहिले नाही. त्यामुळे श्रीरामपुरात पुढार्‍यांचा फक्त श्रेयासाठीच आटापिटा असल्याचे दिसून येते.