Fri, Nov 27, 2020 22:59होमपेज › Ahamadnagar › मोफत विजेचा विषय अजेंड्यावरच नाही

मोफत विजेचा विषय अजेंड्यावरच नाही

Last Updated: Nov 21 2020 10:28PM

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरेनगर : पुढारी वृत्तसेवा

राज्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन कॉमन मिनिमम प्रोग्राम बनविला आहे. त्यामध्ये 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता. कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी केवळ तशी इच्छा व्यक्‍त केली होती, असे स्पष्टीकरण ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्‍त तनपुरे यांनी शनिवारी दिले.

राऊत यांच्या इच्छेनुसार या प्रकरणात समितीही नेमण्यात आलेली आहे. आता या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल. सर्व पक्षांचे त्यावर एकमत झाले आणि राज्याला आर्थिकद‍ृष्ट्या येणारा खर्च झेपणार असेल, तर नक्‍कीच त्याबाबत योग्य निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

राज्यात शेतीच्या कामासाठी रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा केला जातो. शेतकर्‍यांकडून वारंवार दिवसा वीज देण्याची मागणी करण्यात येत आहे. ही मागणी लक्षात घेता आगामी तीन वर्षांमध्ये शेतकर्‍यांना शेती कामासाठी दिवसा वीजपुरवठा करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सौरवाहिनी योजनेतून मोठ्या प्रमाणावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
शेतीसाठी सौरऊर्जेचा वापर वाढल्यानंतर त्याचा फायदा इतर उद्योगांना होणार आहे. औद्योगिक वीज ग्राहकांना सद्यस्थितीत दोन रुपये अतिरिक्‍त भार लावण्यात आलेला आहे. हा अतिरिक्‍त भार कमी झाल्याने उद्योजकांचे वीज बिल कमी होईल, असे त्यांनी सांगितले.