Mon, Sep 28, 2020 15:00होमपेज › Ahamadnagar › ‘जिल्हा वाहतूक शाखा’ नावापुरतीच

‘जिल्हा वाहतूक शाखा’ नावापुरतीच

Published On: Jul 14 2018 12:48AM | Last Updated: Jul 14 2018 12:48AMश्रीरामपूर : प्रतिनिधी

शहरातील वाहतुकीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाल्याने श्रीरामपुरात जिल्हा वाहतूक शाखेची स्थापना करण्याचा निर्णय जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी घेतला. मोठ्या थाटामाटात या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. शहरात स्वतंत्र वाहतूक शाखा झाल्याने वाहतुकीला शिस्त लागणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु या आनंदावर थोड्याच दिवसांत विरजण पडले. शहरात सध्या ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत असल्याने ही वाहतूक शाखा नावापुरतीच उरली असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. 

जानेवारी महिन्यात वाहतूक शाखेची स्थापना करण्यात आली. वाहतूक निरीक्षक म्हणून ललित पांडुळे यांची नियुक्ती करण्यात आली.  शाखा सुरू होताच वाहतूक पोलिसांनी आपली कामगिरी करण्यास सुरूवात केली. रस्त्यावर लागणार्‍या बेशिस्त वाहनांवर कारवाया सुरू केल्या. तसेच रस्त्यावर लावण्यात आलेले अनेक दुकानांचे फलक उखडून टाकले. बेलापूर रस्त्यावरील भगतसिंग चौक, मेनरोडवरील गांधी पुतळा, शिवाजी चौक, तसेच महत्त्वाच्या ठिकाणी संध्याकाळी वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे वाहतुकीला अत्यंत चांगल्या प्रकारची शिस्त लागली होती. 

याच काळात पोलिस उपअधीक्षक म्हणून सोमनाथ वाकचौरे यांचीही या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनीही वाहतुकीबाबत गांभीर्याने दखल घेत वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने ठिकठिकाणी कारवाया केल्या. रेल्वे स्थानकासमोर रस्त्यावरच हातगाड्या लागत होत्या. या गाड्यांना त्यांनी जागा फिक्स करून दिली. वाकचौरे हे स्वतः संध्याकाळी फिरून वाहतुकीचा आढावा घेत होते. त्यामुळे वाहतूक अगदी सुरळीत झाली होती.

परंतु गेल्या दोन महिन्यांपासून वाहतूक शाखेचे कामकाज थंडावले असल्याचे चित्र दिसत आहे. या शाखेतील वाहतूक पोलिस केवळ बस स्थानक परिसरात घिरट्या घालताना दिसत आहेत. अवैध वाहतूक रोखण्याचे मोठे काम त्यांचे असताना अवैध वाहतूक करणार्‍या वाहन चालकांशीच ते गप्पा मारताना दिसत आहेत. संध्याकाळी शिवाजी चौक, मेनरोडवरील भगतसिंग चौक आदी ठिकाणी वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होत आहे. मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे. भगतसिंग चौकात एक चहाचे दुकान आहे. या दुकानात संध्याकाळी चहा पिण्यासाठी अनेक नागरिक येतात. ते आपली वाहने या हॉटेलसमोरच लावतात. त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतुकीची कोंडी होत आहे. वाहतूक शाखा सुरू झाल्यानंतर येथे कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यामुळे वाहने व्यवस्थित पार्क केली जात होती. परंतु आता पोलिसांनीच दुर्लक्ष केल्याने पुन्हा वाहने बेफिकरपणे पार्क करण्यात येत आहेत. संगमनेर रस्त्यावर महेंद्र कोटक, आयसीआय, एचडीएफसी आदी बँका आहेत. या ठिकाणी नागरिक बँकेच्या कामकाजासाठी येत असतात. ते आपली वाहने रस्त्यावरच पार्क करतात. त्यामुळे येथे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. 

वाहतूक नियंत्रक दिवे धूळखात

शहरात वाहतूक शाखेची स्थापना होण्यापुर्वी शिवाजी चौक, गांधी चौक, बेलापूर चौक या ठिकाणी पालिकेच्यावतीने वाहतूक नियंत्रक दिवे बसविण्यात आले होते. या दिव्यांची निगा राखण्याचे काम पोलिसांकडे सोपविण्यात आली होती. काही दिवस हे दिवे कार्यान्वीत होते. परंतु काही दिवसानंतर ते बंद झाले. आजही ते बंद अवस्थेत आहेत. वाहतूक शाखेने हे दिवे सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.