Mon, Sep 21, 2020 11:00होमपेज › Ahamadnagar › विषारी मासेमारी, प्रशासनाला जाग

विषारी मासेमारी, प्रशासनाला जाग

Published On: May 01 2018 1:14AM | Last Updated: May 01 2018 1:07AMराहुरी : प्रतिनिधी 

मुळा धरणाच्या पाण्यात विषारी औषधाच्या मदतीने मासेमारी सुरू असल्याचे वृत्त ‘पुढारी’ने प्रकाशित केल्यानंतर पोलिस व पाटबंधारे विभाग खडबडून जागा झाला आहे. याप्रकरणी निलेश म्हस्के (रा. राहुरी), दत्तू गायकवाड, लखन माळी (रा. मुळानगर), पिनू बापू मधे (रा. दरडगाव), दत्तात्रय गवळी (रा. म्हैसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना अटक केली आहे. 

दक्षिण नगर जिल्ह्यातील नगर शहरासह राहुरी, देवळाली पालिका भागासह शेकडो गावांना पिण्याचा पाण्याचा पुरवठा मुळा धरणातून केला जातो. जनसामान्यांच्या जीवनासाठी महत्त्वाच्या असणार्‍या मुळा धरणात काही विघ्नसंतोषी लोकांकडून विषारी औषध टाकल्यानंतर मृत झालेले मासे पकडण्याचे कार्य सुरू झाल्याचे समोर आले आहे. 

पाण्यात रात्रीच्या वेळी विषसदृष्य द्रव्य टाकून दिल्यानंतर त्याचा परिणाम पाण्यात असणार्‍या माशांवर होऊन मृत मासे पहाटेपर्यंत तटाला येऊन पडतात. तेच मासे पहाटेच्या वेळी गोळा करून राहुरी, नगर, श्रीरामपूर भागांत जाऊन विक्री करण्याचे कुटिल कारस्थान काही अवैध मत्स्य व्यवसायिकांकडून होत असल्याचे वृत्त ‘पुढारी’तून प्रकाशित करण्यात आले होते. 

दरम्यान, ‘पुढारी’च्या वृत्तामुळे पोलिस, पाटबंधारे विभागाने दखल घेत अवैध प्रकार मासेमारी करणार्‍यांविरोधात फास आवळण्यास प्रारंभ केला आहे. पोलिसांकडून मुळा धरण भागात अवैध मासेमारी करून माशांसह संपूर्ण मानवजातीसाठी धोकादायक ठरेल, असे कृत्य करणार्‍यांना पकडण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानुसार नुकतेच दोन व्यक्‍तिंना मुळा धरणाचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांच्या मदतीने पकडून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मुळा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्यामराव बुधवंत यांनी मुळा धरणात विषारी औषध टाकणे, जिलेटिनचा स्फोट करून मासेमारी करणे आदी प्रकार होत असल्याचे मान्य केले आहे. मात्र, मुळा धरणाचा ठेका मुंबई येथील मे.ब्रिज फिशरिज कंपनीला देण्यात आला असून त्यांनाच धरणाच्या तटासह पाण्याचा वापर ठेक्यानुसार देण्यात आला आहे. मुळा धरणात असा प्रकार घडत असल्याने ठेकेदार कंपनीने तात्काळ पाटबंधारे विभागाशी संपर्क साधल्यास कारवाई हाती घेत मुळा धरण परिसरातील लाखो लोकांच्या जीवाशी खेळणार्‍यांचा बंदोबस्त केला जाईल, अशी माहिती बुधवंत यांनी दिली आहे. 

मुळा धरणाचा भिंतीचा परिसर सुमारे 50 कि.मी. पर्यत व्यापलेला आहे. ठेकेदार कंपनीने बहुतेक ठिकाणी आपले शेड उभारलेले आहे. मात्र, काही स्थानिक मत्स्य व्यावसायिकांकडून ठेकेदारांनाही त्रास देण्याचा प्रकार होत आहे. यामुळे पोलिसांसह पाटबंधारे विभागाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिस व महसूलने संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी लाभार्थी गावांमधून करण्यात येत आहे.