Thu, Sep 24, 2020 09:22होमपेज › Ahamadnagar › मुळा, भंडारदराचे पहिले आवर्तन उद्यापासून

मुळा, भंडारदराचे पहिले आवर्तन उद्यापासून

Last Updated: Jan 22 2020 2:09AM
नगर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील मुळा आणि भंडारदरा धरणातील पहिले आवर्तन 22 जानेवारीला सुरू करण्याचे निर्देश राज्याचे ग्रामविकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पाटबंधारे विभागाला दिले आहेत. या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात काल (दि.20) पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, नगरविकास व  उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, आमदार सर्वश्री बबनराव पाचपुते, संग्राम जगताप, मोनिका राजळे,  डॉ. किरण लहामटे, आशुतोष काळे, लहू कानडे, नीलेश लंके,  रोहित पवार हे बैठकीस उपस्थित होते.  लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव आणि मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी आवर्तनासंदर्भात केलेल्या नियोजनाची माहिती दिली.

या बैठकीत मुळा आणि भंडारदरा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याची मागणी कालवा सल्‍लागार समितीच्या सदस्यांनी केली. पाटबंधारे विभागाने 24 जाानेवारीपासून आवर्तन सोडण्यात येईल, असे नमूद केले. परंतु, सदस्य व आमदारांनी तत्काळ पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली. यावेळी पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, यावर्षी पाऊस चांगला झाल्याने शिवारात काही प्रमाणात पाणी दिसत आहे. धरण क्षेत्रातही पाणी उपलब्ध आहे. आगामी उन्हाळा लक्षात घेऊन पाण्याचा जपून वापर करण्याची गरज आहे.  धरणांतील पाणी जपून वापरा, असे आवाहन त्यांनी केले. या दोन्ही धरणांच्याा लाभक्षेत्रातील काही भागात शेतपिकांसाठी असलेली पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन, येत्या 22 जानेवारीपासून मुळा आणि भंडारदरा धरणातून आवर्तन सोडण्यास पालकमंत्री मुश्रीफ यांनी हिरवा कंदिल दिला आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे. 

सरपंचाची निवड सदस्यांमधूनच
जनतेतून थेट सरपंच निवडीला आपला पहिल्यापासूनच विरोध आहे. आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयात बदल केला जाणार असून, सदस्यांमधूनच सरपंचपदाची निवड करण्याचा अध्यादेश जारी केला जाणार असल्याचे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले. ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे काल (दि.20) नगरला आले होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा-शिवसेना युती सरकारच्या काळात थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचा निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयाला माझा पहिल्यापासूनच विरोध होता. या निर्णयानंतर सरपंच किंवा नगराध्यक्ष एका गटाचा आणि आाणि सदस्य दुसर्‍या गटाचे, अशी परिस्थिती अनेक ग्रामपंचायती व नगरपालिकांमध्ये निर्माण झालेली आहे. या अशा विचित्र परिस्थितीमुळे गावागावांतील तसेच शहरातील विकासकामांना खीळ बसली आहे. त्यामुळे सरपंचाची निवड सदस्यांमधूनच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचा मुख्यमंत्री देखील थेट जनतेतून का निवडला जात नाही, असा सवाल उपस्थित करत, त्यांनी थेट सरपंच निवडीला विरोध केला. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय बदलला जाईल. त्यानंतर सदस्यांमधून सरपंच निवडण्याचा अध्यादेश लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. 

 "