होमपेज › Ahamadnagar › इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा

इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा

Last Updated: Feb 18 2020 1:51AM
नगर : प्रतिनिधी
समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर हे कीर्तनातून स्त्री-पुरुष असा भेदभाव करुन समाजाचे संतुलन बिघडविण्याचे काम करीत आहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांनी कीर्तनातून पीसीपीएनडीटी या कायद्याचे उल्‍लंघन करणारे वक्त्यव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. 

गेल्या आठ दिवसांपासून निवृत्ती महाराज इंदोरीकर चर्चेत आले आहेत. सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो, तर विषम तिथीला झाला तर मुलगी होते, असे वक्‍तव्य त्यांनी केले. या वक्‍तव्याने ते अडचणीत आले आहेत. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मुरंबीकर यांनी इंदोरीकर महाराज यांना  नोटीस बजावली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही यामध्ये उडी घेत इंदोरीकरांच्या अडचणीत भर टाकली आहे.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी काल (दि.17) प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी उदय किसवे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला. इंदोरीकर यांचे वक्‍तव्य हे कायदा व संविधान विरोधी आहे. पीसीपीएनडीटी कायदा कलम 22 अंतर्गत गर्भलिंग निदान निवडीबाबात जाहिरातीस बंदी आहे. छापिल पत्रक, एसएमएस, फोन, इंटरनेट आदींद्वारे गर्भलिंग निदान आणि निवडीची जाहिरात करण्यास बंदी आहे. असे असतानाही इंदोरीकर महाराज यांनी सदर वक्‍तव्य करुन कायद्याचे उल्‍लंघन केले आहे.  कीर्तनातून ते सतत महिलांना लज्जा आणणारे, तसेच त्यांचा अपमान करणारे वाक्य उच्चारुन स्त्रीद्वेष पसरवित आहेत. कायदा व त्यातील तरतुदीनुसार इंदोरीकर महाराजांच्या वक्‍तव्याची त्वरित दखल घेऊन, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सचिव अ‍ॅड. रंजना गवांदे यांनी जिल्हा प्रशासनाकडे दाखल केली आहे. हीच तक्रार त्यांनी प्रभारी पोलिस अधीक्षक सागर पाटील यांच्याकडे केली आहे.

जुळी मुले कशी होतात, ते सांगा!
मुलगा-मुलगी कधी होतात, हे सांगणार्‍या इंदोरीकर महाराजांनी जुळी मुले कशी होतात, त्यांचा दिवस, तारीख सम की विषम हे सांगावे. जुळ्या मुलांमध्ये काही वेळा मुलगा-मुलगी होऊ शकते. हे का होते? याचे स्पष्टीकरणही निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केले आहे.