Wed, Aug 12, 2020 10:00होमपेज › Ahamadnagar › शिवसेना,राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत धुमश्‍चक्री

शिवसेना,राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत धुमश्‍चक्री

Published On: May 06 2018 1:06AM | Last Updated: May 05 2018 11:06PMपारनेर : प्रतिनिधी

सेवा संस्थेच्या निवडणुकीत झालेल्या वादाच्या रागातून तालुक्यातील पठारवाडी येथे शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दोन गटात शुक्रवारी सायंकाळी जोरदार धुमश्‍चक्री झाली. त्यात 7 जण गंभीर जखमी झाले असून 29 जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  6 आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांना 11 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

पठारवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी सामुदायिक विवाह सोहळा होता. विवाह लागल्यानंतर इतर विधी सुरू असताना एकमेकांच्या अंगावर बर्फाचे गोळे फेकण्याच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली. दोन गटांत धक्‍काबुक्‍की तसेच किरकोळ मारहाण झाली. हा वाद मिळविण्यात आल्यानंतर तासाभराने दोन्ही गट तयारीनीशी समोरासमोर आले. दगड, विटांचा एकमेकांवर मारा करण्यात येऊन चॉपर, गज, लाकडी दांडके तसेच धारदार शस्त्रांसह दोन्ही गट एकमेकांना भिडले. तब्बल तासभर सुरू असलेल्या या धुमश्‍चक्रीमुळे वर्‍हाडी मंडळी मात्र सैरभैर झाले. कारमध्ये (एम एच 16 बी एम 3332) बसलेल्या काही तरूणांना काचा फोडून बाहेर काढण्यात आले. त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. एकमेकांच्या डोक्यात, तोंडावर, हात तसेच पायांवर लोखंडी गज, दांडके तसेच धारदार शस्त्रांनी प्रहार करण्यात आले. ही धुमश्‍चक्री सुरू असतानाच पारनेर पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली.

पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे, उपनिरीक्षक संजय मातोंडकर घटनास्थळी पोहोचल्यानंतर धुमश्‍चक्री आटोक्यात आली. दरम्यानच्या काळात काही जमखींना शिरूर (जिल्हा पुणे) येथे उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिस घटनास्थळी आल्यानंतरही हातात कुर्‍हाड घेऊन दहशत निर्माण केल्याप्रकरणी प्रशांत सहादु पठारे यास तात्काळ कुर्‍हाडीसह ताब्यात घेण्यात आले. हाणामारीत सुभाष सदाशिव पठारे, निवृत्‍ती शंकर पठारे, ज्ञानदेव बाळू पठारे, शंकर महादू पठारे, तान्हाजी सुपेकर, मोहन सुपेकर व भास्कर सुपेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी भास्कर सुपेकर, मोहन सुपेकर, विश्‍वास सुपेकर, निवृत्‍ती पठारे, ज्ञानदेव पठारे व प्रशांत पठारे यांना अटक केली. न्यायालयाने त्यांना दि. 11 पर्यंत कोठडी देण्यात आली आहे.

शिवसेनेचे शंकर महादू पठारे (रा. पठारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विशाल रघू पठारे, नितीन पांडुरंग पठारे, नीलेश मारूती पठारे, स्वप्निल सुभाष पठारे, दत्‍ता मारूती पठारे, सुभाष सदाशिव पठारे, निवृत्‍ती शंकर पठारे, पांडुरंग सदाशिव पठारे, मारूती आनंदा पठारे, ज्ञानदेव बाळू पठारे, अनिल नामदेव पठारे, गणेश हरिभाऊ पठारे व प्रशांत सहादु पठारे (सर्व रा. पठारवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

राष्ट्रवादीचे सुभाष सदाशिव पठारे (रा. पठारवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भास्कर हरिभाऊ सुपेकर, मोहन हरिभाऊ सुपेकर, चंदर बबन सुपेकर, विश्‍वास रामदास सुपेकर, शंकर महादेव सुपेकर, दिनेश महादेव सुपेकर, दत्‍तात्रय बबन पठारे, नाथा बबन पठारे, रामदास गंगाराम सुपेकर, शंकर केरू पठारे, तान्हाजी मारूती सुपेकर, पांडुरंग रघुनाथ सुपेकर, नितीन किसन सुपेकर, दीपक सदाशिव सुपेकर, मारूती रखमा सुपेकर, अमोल खंडू सुपेकर (सर्व रा. पठारवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags : nagar, Fight, Shivsena, NCP, activist,