Mon, Aug 03, 2020 14:52होमपेज › Ahamadnagar › स्वीकृत संचालकांच्या सत्कारात टोलेबाजी

स्वीकृत संचालकांच्या सत्कारात टोलेबाजी

Published On: Jul 30 2018 1:28AM | Last Updated: Jul 30 2018 12:44AMनगर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील दक्षिण व उत्तरेतील खासदार ठरविण्यात आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आमदारकीसाठी ते विठ्ठल आहेत.संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण आज त्यांच्याभोवती फिरत आहे. त्यांच्यामुळे आमच्या मतदारसंघातील विकासकामे मार्गी लागत असल्याची स्तुतीसुमने भाजपासह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उधळली.निमित्त होते नगर तालुका बाजार समितीच्या स्वीकृत संचालकांच्या सत्कारचे! या कार्यक्रमात काँग्रेसचे डॉ. सुजय विखे, भाजपाचे माजी मंत्री बबनराव पाचपुते, आ. बाळासाहेब मुरकुटे, राष्ट्रवादीचे आ. राहुल जगताप यांनी टोलेबाजी केली. 

बाजार समितीच्या स्वीकृत संचालकपदी संदीप कर्डिले, जगन्नाथ मगर, रावसाहेब साठे, कानिफनाथ कासार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी कॉग्रेसचे डॉ. सुजय विखे, आ.राहुल जगताप, आ.बाळासाहेब मुरकुटे, आ.अरुण काका जगताप, बबनराव पाचपुते, जि.प.सदस्य सुभाष पाटील, अंबादास पिसाळ, दादाभाऊ कळमकर, भाजपा जिलहाध्यक्ष भानुदास बेरड, रेवणनाथ चोभे, अक्षय कर्डिले, अभिलाष घिगे, दिलीप भालसिंग,  देवळाली प्रवराचे नगराध्यक्ष सत्यजित कदम उपस्थित होते. 

याप्रंसगी आ. जगताप म्हणाले की, आ. कर्डिले गुरू आहेत. त्यांच्यामुळेच मी आज आमदार आहे. साखर कारखाना चालविण्यासाठी आ.कर्डिले यांची मोठी मदत होते. तात्यानंतर मला कर्डिलेंनी मोठा आधार दिला. श्रीगोंदा मतदार संघातील अनेक विकासकामे त्यांच्यामुळेच मार्गी लागत आहेत.  विखे आणि कर्डिले यांच्यामुळे नेवाशातून आमदार होण्याची संधी मिळाली, असे सांगत आ. मुरकुटे यांनी त्यांचा विश्‍वास सार्थ ठरवू, अशी ग्वाही दिली. 

डॉ. सुजय विखे  म्हणाले की, कर्डिले-विखे ही आघाडी अभेद्य राहणार आहे.  आ.कर्डिले यांच्या आशिर्वादानेच राहुरी साखर कारखान्याची वाटचाल सुरू आहे. आपण पक्ष मानत नाही.पक्षाची धारेणे पाळत नाही. मला सगळयांची गरज आहे मी नक्की कोणत्या पक्षात आहे, मलाच माहीत नाही. सगळेजण सोयीचे राजकारण करीत आहेत.  आ.कर्डिले म्हणाले की,  दिवंगत खा.बाळासाहेब विखे माझे राजकीय गुरू होते. निवडणुकीपुरताच पक्षाचा मी विचार करतो. तुम्ही सर्वजण मला जिल्हयाचा नेता म्हणता, पण मला हरभर्‍याच्या झाडावर चढवू नका. त्याचा मला पुढे त्रास होईल. सुजय विखेंनी माझा सल्ला ऐकला तर ते नक्कीच खासदार होतील. त्यांनी द्विधा मनस्थितीत राहू नये. मी लोकसभा लढविणार नाही, तुम्ही काळजी करू नका, असे सांगत त्यांनी सर्वांना चिमटे काढले. 

यावेळी माजी मंत्री पाचपुते, प्रा. बेरड, दादाभाऊ चितळकर, सुभाष पाटील, अक्षय कर्डिले यांची भाषणे झाली. प्रास्ताविक संदीप कर्डिले यांनी केले. सभापती विलास शिंदे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन राजेंद्र टाक यांनी केले.