Mon, Sep 28, 2020 13:45होमपेज › Ahamadnagar › दूध बंदीमुळे दुग्धजन्य पदार्थांवर भर!

दूध बंदीमुळे दुग्धजन्य पदार्थांवर भर!

Published On: Jul 19 2018 1:36AM | Last Updated: Jul 18 2018 11:54PMवाळकी : वार्ताहर

राज्यभरात दूध दरवाढीसाठी उत्पादक शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांनी दूध विक्रीसाठी दूध संकलन केंद्राकडे न पाठवता घरीच दुग्धजन्य पदार्थ बनवित आहेत. शिल्लक राहिलेले दूध गावातील गरिबांना वितरण करत आहेत. त्यामुळे शहरी भागात दुधाचा पुरवठा कमी कमी होत चालला असल्याने शहरी जनतेला दूध टंचाईचा सामना करावा लागत आहे . 

काहींना तर दूधही मिळेनासे झाले असल्याने कोरा चहा पिण्याची वेळ शहरी जनतेवर ओढावली आहे. ग्रामीण भागात दूध संकलन केंद्रच बंद असल्याने दुधाचे करायचे काय ? असा प्रश्‍न दूध उत्पादक शेतकर्‍यांपुढे निर्माण झाला आहे. यातून मार्ग काढत शेतकरी घरीच दुग्धजन्य पदार्थ बनवित असून, शिल्लक राहिलेले दुध गोरगरीब नागरिकांना वाटप करत आहेत. त्यामुळे गरीबांच्या चुलीवर दुधच दूध असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे .

सध्या राज्यभरात दुधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान मिळावे, या मागणीसह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. याविषयी विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असले तरी चर्चेतून अद्यापही काही तोडगा निघु शकला नाही. त्यामुळे सर्वत्रच दुधसंकलन बंद झाले आहे . दुधसंकलनच बंद झाल्याने शहराकडे येणार्‍या दुधात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांना दूध टंचाईला सामोरे जावे लागत आहे. परिणामी नागरिकांना आलेला थकवा घालविण्यासाठी चहाची तल्लफ झाली तर ती बिगर दुधाच्या (कोर्‍या) चहावर भागविण्याची वेळ ओढावली आहे .

शहरी भागात दुधाची टंचाई वाढत असली तरी ग्रामीण भागात उलट चित्र दिसत आहे. दूध संकलनच बंद असल्याने येथील दूध उत्पादक शेतकर्‍यांना निघणार्‍या दुधाचे काय करावे? हा प्रश्‍न सतावत आहे. दूध साठवून ठेवावे तर खराब (नासल्या) शिवाय राहत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी निघणार्‍या दुधापासून घरातच तुप, लोणी, दही, खवा यासारखे दुग्धजन्य पदार्थ बनविण्यास सुरुवात केली आहे. लहान मुलही भरपूर दूध खायला मिळत असल्याने उत्साहात दिसत आहेत .दूध आंदोलनाबाबत काय निर्णय लागतोय तो लागेल पण सध्या शहरातील जनतेवर कोरा चहा पिण्याची वेळ ओढावली आहे. ग्रामीण भागात गरिबांना दूध जास्त झाल्याने चुलीवर उतू चालल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे .