Sat, Dec 14, 2019 07:43



होमपेज › Ahamadnagar › कुत्र्यांनी चितेतून ओढत नेला मृतदेह

कुत्र्यांनी चितेतून ओढत नेला मृतदेह

Last Updated: Dec 05 2019 1:32AM

नगर : अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा दहनविधी करताना नवग्रह मित्र मंडळाचे अमोल बनकर व कार्यकर्ते.



नगर : प्रतिनिधी
अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढत, बर्‍याच अंतरावर ओढत नेल्याचा धक्कादायक प्रकार नालेगाव येथील अमरधाम स्मशानभूमीत सोमवारी (दि.2) सकाळी उघडकीस आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. परिसरातील काही तरुणांनी पुन्हा या अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा दहनविधी केला. या प्रकारानंतर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी महापालिकेत बैठक घेत विद्युतदाहिनी तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले.

बैठकीस उपमहापौर मालन ढोणे, उपायुक्त सुनील पवार, डॉ. प्रदीप पठारे, उद्यान विभागाचे शशिकांत नजान, विद्युत विभागाचे पी. एल. शेंडगे, अजय चितळे, संजय ढोणे उपस्थित होते.

अमरधाम स्मशानभूमीत रविवारी (दि.1) दिवसभरात सुमारे 13 ते 14 अंत्यविधी झाले. दहन ओट्यांची संख्या कमी असल्याने काही अंत्यविधी ओट्याच्या खाली करण्यात आले होते. रात्री उशिरा एक अंत्यविधी ओट्याच्या खालीच करण्यात आला होता. सकाळी काही नागरिक दशक्रिया विधी निमित्त अमरधाममध्ये आले असता, त्यांना एक अर्धवट जळालेला मृतदेह मोकाट कुत्रे ओढत नेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे तेथे उपस्थित नागरिकांमध्ये काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते. अनेकांनी महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच नगरसेवकांना फोन करुन याबाबतची माहिती दिली. काहींनी पोलिसांनाही कळविले.

त्यानंतर नवग्रह मित्र मंडळाचे अमोल बनकर व कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. त्यांनी हा प्रकार पाहिला. सदरचा अर्धवट जळालेला मृतदेह हा भटक्या कुत्र्यांनी चितेतून बाहेर काढल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर बनकर व त्यांच्या सहकार्‍यांनी मृतदेह पुन्हा चितेवर नेवून विधिवत दहनविधी केला. या घटनेमुळे अमरधाममधील सुविधा व सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मृतदेहाची विटंबना संतापजनक बाब असून, मोकाट कुत्रे व जनावरांचा या ठिकाणी नेहमीच वावर असतो. याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी यावेळी अजय चितळे यांनी केली.

विद्युतदाहिनी तातडीने सुरू करा : महापौर
हा प्रकार समजताच महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अमरधाममध्ये जाऊन पाहणी केली. तसेच दुपारी तातडीने विद्युत विभाग, आरोग्य विभाग व उद्यान विभागाची बैठक घेतली. त्यात मंजूर असलेली 40 लाखांची कामे सुरू करावीत, बंद असलेली विद्युत दाहिनी तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. विद्युतदाहिनीचे शुल्क 1200 वरून 900 करण्याचा निर्णयही घेण्यात आला.