Sat, Jul 04, 2020 08:24होमपेज › Ahamadnagar › शिर्डीत बेमुदत बंद; साई भक्तांची गैरसोय

शिर्डीत बेमुदत बंद; साई भक्तांची गैरसोय

Last Updated: Jan 19 2020 2:46PM
शिर्डी : पुढारी ऑनलाईन 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साई बाबांच्या जन्मस्थळावरून केलेल्या वक्तव्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. आजपासून (ता.१९) शिर्डीत बेमुदत बंदचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीत दुकाने, रेस्टॉरंट्स आणि विविध व्यावसायिक प्रतिष्ठान बंद आहेत. वाहनांची सुद्धा तुरळक गर्दी दिसत आहे. साई मंदिर खुले आहे. भक्त साईंच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचत आहेत. 

अधिक वाचा : बुलेट ट्रेननंतर हायपरलूपलाही ब्रेक?

मंदिर प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री बंदला सुरुवात झाली. परंतु शिर्डी येथील साई मंदिर खुले असल्याने भाविकांनी तेथे प्रार्थना केली. शिर्डी मंदिराच्या 'प्रसादालय' आणि 'लाडू' विक्री केंद्रांवर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या. 

स्थानिक भाजप अधिकारी सचिन तांबे पाटील यांनी बंद यशस्वी झाल्याचा दावा केला. ते म्हणाले, शिर्डी शहरासह आसपासच्या गावातील व्यावसायिक दुकाने, भोजनालय आणि स्थानिक वाहतूक सेवा बंद राहिल्या. ज्या भक्तांनी आधीच हॉटेल बुक केले आहेत त्यांना तिथेच राहण्याची परवानगी आहे आणि विमानतळापासून मंदिरापर्यंत टॅक्सी सेवा देखील सामान्य आहे. इतर ठिकाणाहून येणाऱ्या राज्य परिवहन बसेसनाही शहरात प्रवेश करण्याची परवानगी आहे.

अधिक वाचा : राऊत यांच्या नव्या विधानावरून सेनेने हात झटकले

श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर म्हणाले की, बंद असूनही मंदिर खुले राहिल. स्थानिक भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्थानिक लोकांनी पुकारलेल्या बंदला पाठिंबा असल्याचे सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बैठक उद्या आयोजित करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.  

अधिक वाचा : रात्रीच्या मुंबईसाठी पोलीस बळ अपुरे!