Sun, Jan 17, 2021 05:21होमपेज › Ahamadnagar › केंद्राच्या निर्देशानुसार शाळांबाबत निर्णय

केंद्राच्या निर्देशानुसार शाळांबाबत निर्णय

Last Updated: Aug 23 2020 1:33AM
नगर : पुढारी वृत्तसेवा

शाळा सुरू करायच्या की नाही, याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, अशा सूचना आम्ही शालेय समितीला दिलेल्या आहेत. मात्र, केंद्र शासनाकडूनही 31 ऑगस्टपर्यंत शाळा सुरू करू नयेत, अशा मार्गदर्शक सूचना आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या निर्देशानुसारच शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

नगर येथील शासकीय विश्रामगृहावर मंत्री गायकवाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, उपाध्यक्ष प्रताप शेळके, कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, माजी नगरसेवक दीप चव्हाण  उपस्थित होते.

मंत्री गायकवाड म्हणाल्या की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या करता आम्ही ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. ग्रामीण भागामध्ये मुलांना सुविधा मिळाल्या पाहिजेत, या उद्देशाने आम्ही यू ट्यूबच्या माध्यमातून शिक्षणाची व्यवस्था केली आहे. काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल व लॅपटॉप नाही. आजी-माजी शिक्षकांनी त्यांना शिकवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या विद्यार्थ्यांना मोबाईल व लॅपटॉप उपलब्ध करून दिले आहेत. कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, अशी आमची भूमिका आहे. सह्याद्री वाहिनीवरून शिक्षणाचा उपक्रम सुरू केला आहे. नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता सह्याद्रीच्या माध्यमातून अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे, असे त्या म्हणाल्या.

शाळा सुरू केव्हा सुरू करायाच्या, याबाबत आमची वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यासाठी समित्याही केलेल्या आहेत. सुरुवातीला शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव होता. आता ग्रामीण भागात देखील रुग्ण आढळत आहेत. अनेक ठिकाणी कन्टेन्मेंट झोन असल्यामुळे शाळा चालवायची कशी? हाही मोठा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत शाळा कधी सुरू करायची, याबाबत स्थानिक पातळीवरची सर्व परिस्थिती पाहून स्थानिक शालेय शिक्षण कमिटीने निर्णय घेणे आवश्यक आहे. तशा सूचनाही आम्ही दिल्या होत्या. काही समित्यांकडून शाळा सुरू करण्याबाबत हालचालीही झाल्या. मात्र, केंद्र शासनाकडून दरम्यानच्या काळात मार्गदर्शक सूचना आल्या. शाळा सुरू करु नये, असे त्यांनी सांगितले. केंद्राच्या निर्देशांचे आम्ही पालन करत आहोत. त्यांच्या निर्देशांनंतरच शाळा सुरू करण्याबाबत पुढील निर्णय होईल, असे गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले. 

शाळांच्या ‘फी’चा विषय न्यायालयात!

शाळा सुरू करतांना फी बाबत तक्रारी आल्या, ही वस्तुस्थिती आहे. फी घ्यावी की नाही? याबाबत धोरणात्मक निर्णय घेतला होता. मात्र, या संदर्भात आता न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. आम्ही काढलेल्या शासन निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे हा संपूर्ण विषय आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात नेला आहे. त्यामुळे याबाबत टिपण्णी करणे उचित नसल्याचे मंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केले. 

आदित्य ठाकरेंची निवड योग्यच : गायकवाड

मंत्री आदित्य ठाकरे चांगल्या पद्धतीने काम करतात. ते सक्षम आहेत. काम करण्याची जिद्द महत्त्वाची आहे व ही जिद्द ठाकरे यांच्यामध्ये दिसते. त्यामुळे त्यांची पद्म समितीच्या अध्यक्षपदी झालेली निवड योग्यच आहे, असे मत मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले. मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलँड  पोलिसांसोबत होते. त्याच मुंबई पोलिसांकडून सुशांतसिंग प्रकरणाचा तपास सुरू आहे. ते सत्य बाहेर काढतील, असे त्यांनी सांगितले.