Wed, Apr 01, 2020 01:28होमपेज › Ahamadnagar › पोटनिवडणुकीतून काँग्रेस-राष्ट्रवादीची माघार

पोटनिवडणुकीतून काँग्रेस-राष्ट्रवादीची माघार

Last Updated: Jan 24 2020 2:11AM
नगर : प्रतिनिधी

‘प्रभाग 6 अ’च्या पोटनिवडणुकीसाठी अखेरच्या दिवशी भाजपकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर शिवसेनेकडून अनिता दळवी यांना उमेदवारी जाहीर करुन, त्यांच्या अर्जाला एबी फॉर्म जोडण्यात आला आहे. भाजपकडून वर्षा सानप व पल्लवी जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, सानप यांचा अर्ज बाद होण्याची शक्यता असून, जाधव या पर्यायी उमेदवार असणार आहेत.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे पुन्हा भाजपला साथ देणार की अलिप्त राहणार, याबाबत आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
पुढील महिन्यात 6 फेब्रुवारीला पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी शिवसेनेकडून अनिता लक्ष्मण दळवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

दळवी यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या उमेदवारीचा एबी फॉर्म जमा करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक अनिल शिंदे, योगीराज गाडे, गणेश कवडे, संभाजी कदम, अनिल बोरुडे, संजय शेंडगे आदी उपस्थित होते. 

भारतीय जनता पार्टीने दोन उमेदवारांचे अर्ज दाखल केले आहेत. वर्षा रोहन सानप व पल्लवी दत्तात्रय जाधव या दोघांनीही भाजपकडून अर्ज दाखल केले आहेत. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे, सभापती लता शेळके, अभय आगरकर, सुनील रामदासी, वसंत लोढा, सचिन पारखी, नगरसेवक रवींद्र बारस्कर, मनोज कोतकर, मनोज दुलम, संजय ढोणे, सतीश शिंदे, अजय चितळे, विलास ताठे, उदय कराळे आदी उपस्थित होते. 

वर्षा सानप यांचे नाव विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या मतदार यादीमध्ये समाविष्ट नाही. मात्र, सध्याच्या यादीत आहे. विधानसभेच्या यादीत नाव समाविष्ट करुन उमेदवारीसाठी परवानगी मिळावी, यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे छाननीवेळी त्यांचा अर्ज बाद झाल्यास पर्यायी उमेदवार म्हणून पल्लवी जाधव यांचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून उमेदवार न देण्यात आल्यामुळे मनपा वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राज्यात शिवसेना व दोन्ही काँग्रेसची महाआघाडी असली, तरी नगरमध्ये तशी परिस्थिती नाही. शहरात महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला जाहीर पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार नसल्याने आमदार संग्राम जगताप यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

आमदार जगताप ठरवतील तीच आमची भूमिका, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सांगत आहेत. मात्र, महापौर निवडणुकीप्रमाणे यंदाही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा ‘भाजप’लाच साथ देऊन शिवसेनेला एकाकी पाडेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अथवा संग्राम जगताप यांच्याकडून मात्र, अद्यापही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही.

छाननीनंतर भाजपचा उमेदवार स्पष्ट होणार

पोटनिवडणुकीसाठी प्राप्त अर्जांची आज छाननी होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने वर्षा सानप यांना उमेदवारी देण्यात आली असली, तरी त्यांच्या मतदार यादीतील नावाबाबत उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे. छाननीपर्यंत त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यास त्यांचा अर्ज वैध ठरेल. मात्र, त्यांचा अर्ज अवैध ठरल्यास पल्लवी जाधव या भाजपच्या अधिकृत उमेदवार असतील, असे चित्र आहे. त्यामुळे भाजपचा उमेदवार छाननीनंतरच स्पष्ट होणार आहे.