Wed, Dec 02, 2020 09:20होमपेज › Ahamadnagar › महापौरांच्या अधिकारावर प्रभारी आयुक्‍तांची गदा!

महापौरांच्या अधिकारावर प्रभारी आयुक्‍तांची गदा!

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 10:32PMनगर : प्रतिनिधी

गाळेधारकांच्या प्रश्‍नावर बोलाविण्यात आलेल्या कालच्या (दि.20) विशेष सभेत मनपातील बुहतांशी अधिकारी, विभागप्रमुख मनपात असूनही गैरहजर राहिल्याने आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे. महापौर तथा पीठासीन अधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय व त्यांना पूर्वकल्पना न देताच प्रशासकीय अधिकार्‍यांनी हा निर्णय घेतल्यामुळे महापौर तथा पीठासीन अधिकार्‍यांच्या अधिकारावर आयुक्‍तांनीच गदा आणल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी नगरसेवकांनीही याबाबत सपशेल ‘मौन’ बाळगल्याने हा चर्चेचा विषय ठरला होता.

महापौर कार्यालयाच्या अखत्यारित असलेल्या नगरसचिव विभागामार्फत महापौरांच्या आदेशाने सभेचा अजेंडा काढला जातो. कालच्या सभेत केवळ गाळेधारकांचा विषय असला तरी नगरसचिव कार्यालयाने प्रशासनातील सर्व विभागांना कालच्या सभेचा अजेंडा पाठविला होता. मनपातील आजतागायत झालेल्या सर्व सभांमध्ये विषय नसला तरी सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित राहतात. मात्र, कालच्या सभेत बहुतांशी अधिकारी गैरहजर होते. सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक दिलीप सातपुते यांनी हा मुद्दा उपस्थित केला. अशा प्रकारे अधिकारी गैरहजर राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही महापौरांनी निक्षून सांगितले. हा विषय सुरु असतांनाच प्रभारी आयुक्‍त राहुल द्विवेदी सभागृहात उपस्थित झाल्यावर त्यांनी ज्या विषयावर सभा आहे, त्या विभागाचे अधिकारी उपस्थित असल्याचे व तेवढेच उपस्थित राहतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे आयुक्‍तांच्या सूचनेनुसारच अधिकारी गैरहजर असल्याचे दिसून आले. 

महापालिका अधिनियमातील कलम 43 (3) नुसार कोणत्याही सभेस अधिकार्‍यांना उपस्थित राहण्यासाठी महापालिकेला फर्मावता येईल, अशी स्पष्ट तरतूद आहे. तसेच कलम 44 नुसार पालिका सदस्याला शहरातील पालिकेच्या कारभाराबाबत कोणत्याही बाबींसंदर्भात प्रश्‍न विचारता येईल, अशीही तरतूद आहे. महासभेत पीठासीन अधिकार्‍यांचे स्थान सर्वोच्च असून त्यांच्या नियंत्रणाखालीच सभेचे कामकाज चालते. त्यामुळे नगरसचिव विभागाने सर्व विभागांना अजेंडा पाठविल्यानंतर सर्व अधिकारी, विभागप्रमुखांनी सभेला उपस्थित राहणे, बंधनकारक आहे. असे असतांना महापौर तथा पीठासीन अधिकार्‍यांच्या परवानगी शिवाय सभेला अनुपस्थित राहण्याबाबत व तशा सूचना त्यांना देतांना पीठासीन अधिकार्‍यांना पूर्वकल्पना देणे आवश्यक मानले जाते. कालच्या सभेत अधिकार्‍यांच्या उपस्थितीबाबत आयुक्‍तांनीच परस्पर निर्णय घेतल्यामुळे त्यांनी महापौरांच्या अधिकारावर गदा आणल्याची चर्चा मनपा वर्तुळात रंगली होती. सत्ताधारी नगरसेवकांकडूनही आयुक्‍तांच्या या भूमिकेला आक्षेप न घेण्यात आल्यामुळे व त्यांनी सोयीस्कर मौन बाळगल्यामुळे महापौर एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले होते.

सर्व विभागांना अजेंडा पाठविला होता : नगरसचिव

महापालिकेच्या सर्वसाधारण व विशेष सभेचा अजेंडा सर्व अधिकारी, विभागप्रमुख, प्रभाग अधिकार्‍यांना पाठविला जातो. महापौरांच्या आदेशानुसार कालच्या (दि.20) विशेष सभेचा अजेंडाही सर्वांना पाठविण्यात आला होता. फक्‍त विषयाशी संबंधित अधिकार्‍यांनीच उपस्थित रहावे, अशा सूचना या कार्यालयाकडून देण्यात आल्या नव्हत्या, असे नगरसचिव एस.बी.तडवी यांनी ‘पुढारी’शी बोलतांना सांगितले.