होमपेज › Ahamadnagar › ‘चार्जशीट’ दाखल; आरोपी सापडेनात!

‘चार्जशीट’ दाखल; आरोपी सापडेनात!

Published On: Jun 18 2018 1:08AM | Last Updated: Jun 18 2018 12:32AMनगर : प्रतिनिधी

गेल्या डिसेंबर महिन्यात शनी शिंगणापूर येथे गुंड गणेश भुतकर याची सिनेस्टाइल हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी तपास करून पोलिसांनी न्यायालयात दीड महिन्यापूर्वी दोषारोपपत्र सादर केले. स्थानिक गुन्हे शाखेमार्फत या प्रकरणाचा तपास सुरु आहे.  राज्यभरातून गुन्हेगारांना पकडणार्‍या स्थानिक गुन्हे शाखेला या प्रकरणातील दोघे पसार आरोपी सापडत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

शनिशिंगणापूर येथील गुंड गणेश भुतकर याची 20 डिसेंबर 2017 रोजी हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. भूतकर त्याच्या हॉटेलवर आला असता, स्काँर्पिओतून त्याचा मित्र अविनाश बानकर व त्याचे साथीदार आले. त्यांनी भूतकर याच्यावर कुर्‍हाडीसह धारदार हत्यारांनी वार केले. त्यात गंभीर जखमी झाल्याने भुतकरचा मृत्यू झाला होता.घोडेगाव रस्त्यावरील इको बँकेसमोरच्या दत्तू बानकर यांच्या पार्किंगमध्ये सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे.या घटनेतील मयत गणेश याच्याविरूध्द देखील विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना मारहाण करणे, शनी चौथर्‍यावर जाऊन कर्मचार्‍यांना धमकावणे, मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना धमकावणे, गावठी कट्टे बाळगणे असे विविध गुन्हे त्याच्यावर होते. त्यामुळे भूतकारला तडीपार करण्यात आले होते. तडीपार असताना शनी शिंगणापुरात आल्यानंतर त्याची हत्या करण्यात आली होती.

या प्रकरणी पंकज बानकर, मयुर हारकळ, अर्जुन महाले या तीन आरोपींना पोलिसांनी दोन दिवसांमध्येच अटक केली होती. या प्रकरणातील दोघे आरोपी गंगापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे कारवाई करत लखन नामदेव ढगे व भाऊसाहेब उर्फ दादासाहेब रायभान ढमाले दोघांना अटक केली. या प्रकरणात अविनाश बानकर व गणेश सोनवणे हे दोन प्रमुख आरोपी पोलिस दफ्तरी अद्यापही पसारच आहेत. मात्र हे दोघेही पसार आरोपी शनिशिंगणापूर परिसरातच असल्याची चर्चा आहे.+

‘मोस्ट वॉन्टेड’ सापडले, हे दोघेच राहिले

स्थानिक गुन्हे शाखेचा पदभार स्वीकारल्यानंतर पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ‘मोस्ट वॉन्टेड’ असलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. सोपान गाडे, प्रवीण रसाळसारखे ‘खतरनाक’ आरोपी गजाआड केले. मात्र दिवसाढवळ्या गजबजलेल्या वस्तीत हत्या करून पसार झालेले अविनाश बानकर व गणेश सोनवणे हे दोघेच अद्यापही ‘एलसीबी’ला ‘चकवा’ देत आहेत! पोलिसांना ते किती दिवस चकवा देणार? हे पहावे लागेल.