Wed, Aug 12, 2020 08:47होमपेज › Ahamadnagar › राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह ४२ जण हजर

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह ४२ जण हजर

Published On: May 22 2018 1:23AM | Last Updated: May 21 2018 11:12PMनगर : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसह 42 कार्यकर्ते सोमवारी सकाळी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी अटकेची प्रक्रिया पूर्ण करून, या आरोपींना दुपारी न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने सर्व आरोपींना तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अटक केलेल्यांत नगरसेवक आरिफ शेख, संपत बारस्कर, समद खान, कुमार वाकळे, निखील वारे, अविनाश घुले, दीपक सूळ, महेश बुचडे, केरप्पा हुच्चे, सय्यद अब्दुल वाहिद, अशोक रोकडे, आवी इराबत्तीन, सागर शिंदे, धिरज उर्किडे, सुनील त्रिंबके, बबलू सूर्यवंशी, मन्सूर सय्यद, सुरेश मेहतानी, सुहास शिरसाठ, मतीन सय्यद, प्रकाश भागानगरे, वैभव ढाकणे, कुलदिप भिंगारदिवे, दत्तात्रय तापकिरे, बाबासाहेब गाडळकर, बीर ऊर्फ दिलदार सिंग, फारुक रंगरेज, चंद्रकांत औशिकर, अरविंद शिंदे, सत्यजित ढवण, वैभव जाधव, राहुल शर्मा, मयूर बांगरे, किरण पिसोरे, घनश्याम बोडखे, बाबासाहेब जपकर, राजेंद्र ससे, वैभव दारुणकर, अक्षय डाके, मयूर कुलथे, संदीप जाधव यांचा समावेश आहे.

गुन्ह्याचे तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी कविता नावंदर यांच्यासमोर हजर केले. सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना डॉ. गोर्डे व सरकारी वकील अ‍ॅड. वर्षा असलेकर म्हणाल्या की, आरोपींनी पोलिस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केलेला आहे. गुन्ह्याचे स्वरुप गंभीर आहे. आरोपी पोलिस अधीक्षक कार्यालयावर जमावाने येत असताना वाहनांचा वापर केलेला आहे. ती वाहने हस्तगत करायची आहेत. गुन्हा कसा केला, याची चौकशी करायची आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणार्‍या अनोळखी व्यक्तींची नावे निष्पन्न करण्यासाठी त्यांच्याकडे चौकशी करायची आहे. त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्यात यावी.

आरोपीच्या वकिलांनी बचावाचा प्रयत्न करून आरोपींना पोलिस कोठडी देण्याची आवश्यकता नाही, असे म्हणणे मांडले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने सर्व 42 आरोपींना गुरुवारपर्यंत (दि.24) पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.