Mon, Aug 10, 2020 05:04होमपेज › Ahamadnagar › अहमदनगरच्या जागेवर भाजपने ठोकला दावा

अहमदनगरच्या जागेवर भाजपने ठोकला दावा

Published On: Sep 03 2019 1:43AM | Last Updated: Sep 03 2019 1:43AM
नगर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात शिवसेना व भाजपच्या ‘युती’बाबत अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. मात्र, नगर शहराची शिवसेनेकडे असलेली जागा भाजपला मिळविण्यासाठी शहरातील पदाधिकार्‍यांनी कंबर कसली आहे. शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी या संदर्भात मांडलेला ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला असून, महापौर व उपमहापौरांनीही याला संमती दिली आहे.

भारतीय जनता पार्टीने राज्यात सर्व 288 जागांवर चाचपणी सुरू केली आहे. बुधवारी (दि.4) नगर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. शिवसेनेकडे असलेल्या जागांवरही मुलाखती घेतल्या जाणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर दिलीप गांधी यांनी रविवारी (दि.1) शहरातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक घेतली. या बैठकीत नगर शहर विधानसभेची जागा भाजपलाच मिळविण्याचा ठराव त्यांनी मांडला. महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांनी या ठरावाला अनुमोदन दिल्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. तसेच महापालिका निवडणुकीत व लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या मतांचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नगरची जागा भाजपलाच मिळावी, असा ठराव प्रदेश कार्यालयाकडे पाठवत असल्याचे दिलीप गांधी यांनी बैठकीत स्पष्ट केले आहे. दरम्यान, शहर भाजपच्या ठरावामुळे जागा वाटपावरुन शिवसेना-भाजपात पुन्हा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

बैठकीस माजी शहराध्यक्ष सुनिल रामदासी, नगरसेवक भैय्या गंधे, रवींद्र बारस्कर, सुवेंद्र गांधी, अजय चितळे, उदय कराळे, संजय ढोणे, सतीश शिंदे, सरचिटणीस किशोर बोरा, माजी नगरसेवक नरेंद्र कुलकर्णी, शिवाजी दहिंडे, मनेष साठे आदी उपस्थित होते.

पदाधिकारी, नगरसेवकांनी फिरविली पाठ

नगरच्या जागेची मागणी करण्याबाबतच्या महत्वाच्या विषयासाठी बोलाविण्यात आलेल्या बैैठकीस सभागृह नेते स्वप्निल शिंदे यांच्यासह केडगाव परिसरातील नगरसेवकांनी व शहरातील काही पदाधिकार्‍यांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. गणेशोत्सवाच्या तयारीमुळे बैठकीला उपस्थित राहता न आल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.

शहरातून गांधी, वाकळे, आगरकर इच्छुक

बुधवारी भारतीय जनता पार्टीच्या मुलाखती पार पडणार असून, नगर शहरातून माजी खासदार दिलीप गांधी हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्यासह महापौर बाबासाहेब वाकळे व माजी नगराध्यक्ष अभय आगरकर यांचेही नाव इच्छुक म्हणून चर्चेत आले असून, ते मुलाखती देणार का, याकडे लक्ष लागले आहे.