Wed, Aug 12, 2020 20:48होमपेज › Ahamadnagar › नेत्यांच्या समन्वयातून राजकारणाला दिशा

नेत्यांच्या समन्वयातून राजकारणाला दिशा

Published On: Feb 18 2018 1:54AM | Last Updated: Feb 17 2018 11:35PMश्रीरामपूर : प्रतिनिधी

नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांमधील राजकीय समन्वयच राज्यातील राजकारणाला नवी दिशा देण्याचे काम करेल, असा विश्‍वास व्यक्‍त करतानाच ज्येष्ठ नेते अण्णासाहेब म्हस्के यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा उद्याच्या राजकारणासाठी समन्वयाचा  संदेश देणारा  असल्याचे सूचक वक्‍तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. 

माजी मंत्री म्हस्के यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभा निमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी भाषणात व्यक्त केलेल्या भावनांवर खा. चव्हाण यांनी मार्मिक राजकीय भाष्य करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या समन्वयाची गरज व्यक्त केली. हा समन्वय घडविण्याची जबाबदारी आम्ही घेऊ, आशी ग्वाही देतानाच हा महाराष्ट्र मोठ्या अपेक्षेने आपल्या सर्वांकडे पाहात आहे. या राज्याला पुढे घेऊन जाण्याचे मोठे काम नगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनीच केले आहे. या सर्व नेत्यांच्या समन्वयातून पिछाडीवर गेलेला महाराष्ट्र पुन्हा पुढे घेऊन जाण्याचे काम एकत्रित येऊन करावेच लागेल, असे ठामपणे सांगतानाच सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत खा.चव्हाण यांनी े मत व्यक्त केले. 

म्हस्के यांना मागील अनेक वर्षे मी पाहत आलो आहे. व्यक्तिमत्त्वात आणि विचारात थोडाही बदल न करता लोकांमध्ये राहणे त्यांनी पसंत केले. लोकाभिमुख नेता हीच त्यांची ओळख कायम असल्याचे नमूद करून खा.चव्हाण म्हणाले की, हा सत्कार थांबण्याचा नाही, तर उद्याची या जिल्ह्याची वाटचाल अधिक जबाबदारीने पुढे घेऊन जाण्यासाठी असल्याचे सूचित केले. मंत्री म्हणून केलेल्या कामाची आठवण आजही सामान्य माणसाच्या ह्दयात आहे हे महत्त्वाचे असल्याचा उल्लेख चव्हाण यांनी आवर्जून केला. 

विरोधी पक्षनेते विखे यांनी अण्णासाहेब आणि विखे परिवाराचा स्नेह विषद करून खासदार विखेंच्या निधनानंतर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाणारे अण्णसाहेब एक निस्वार्थी व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. या जिल्ह्यातील पाण्याचा संघर्ष करताना त्यांची मिळणारी साथ मोलाची असल्याचे सांगतानाच या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेत्यांनीच आता प्रश्नासाठी एका विचाराची मोट बांधून मार्गदर्शन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

ज्येष्ठ नेते  गडाख यांनी आपल्या भाषणात अण्णसाहेब म्हस्के यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत पद मिळविली. पण स्वतःमधील कार्यकर्ता त्यांनी जिवंत ठेवला. आज राजकीय क्षेत्रात व्यक्तिद्वेशी भावना मोठ्या प्रमाणात वाढली असल्याची खंत व्यक्त करतानाच, जुन्या जाणत्या नेत्यांनी मतभेद विसरून एकमेकात समन्वय कायम ठेवला, ही भूमिका आता नव्या पिढीला जोपासावी लागेल असे नमूद करुन गडाख यांनी खा. चव्हाण यांच्याकडे कटाक्ष टाकत हा समन्वय ठेवण्याचा सल्‍ला ना.राधाकृष्ण विखे यांना खासगीत द्यावा, असे सूचक वक्तव्य केले. 

म्हस्के यांनी संपूर्ण राजकीय वाटचालीचा आढावा घेतानाच स्व.शंकरराव चव्हाण, बाळासाहेब विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळाली. एका विश्वासाने मिळालेल्या जबाबदार्‍या पार पाडत गेलो. संपूर्ण राज्यात पाणी प्रश्नावर काम करण्याची मिळालेली संधी ही मोठी होती सांगितले.याप्रसंगी  ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, प्रतापराव वाघ, पांडुरंग अभंग, उद्धव महाराज, रामदास जाधव महाराज, माजी खा.दादा पाटील शेळके यांची भाषणे झाली. स्वागत डॉ.सुजय विखे यांनी केले. समितीच्यावतीने अण्णासाहेब म्हस्के आणि सुशिलाताई म्हस्के  यांचा विठ्ठलाची मूर्ती आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 

कार्यक्रमास आ. भाऊसाहेब कांबळे,  आ. स्नेहलता कोल्हे, जि. प. अध्यक्षा शालिनीताई विखे, आ. नंदकुमार झावरे, संभाजीराव फाटके, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे  आदी उपस्थित होते.