Thu, Jun 24, 2021 12:26
अहमदनगर : ज्‍येष्‍ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकरांच्‍या मुलीसह नातवाचा कोरोनाने मृत्यू 

Last Updated: Jun 02 2021 2:17PM

संगमनेर ; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे मागील आठवड्यात कोरोनाने निधन झाले होते. तोपर्यतच कांताबाई यांची मोठी मुलगी अनिता आणि नातू बबलू या दोघांचे कोरोनाने निधन झाले. यामुळे संपूर्ण सातारकर-खेडकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

महाराष्ट्रातील नामांकित असलेल्या तमाशा सम्राज्ञी कांताबाई सातारकर यांचे आठ दिवसांपूर्वी कोरोनाने निधन झाले होते. त्या अगोदर कांताबाई सातारकर आणि तुकाराम खेडकर यांची मोठी कन्या अनिता उर्फ बेबीताई यांचे कोरोनाने निधन झाले होते. रायगडची राणी अर्थात पन्हाळगडाचा नजर कैदी या वगनाट्यात अनिता खेडकर यांनी नकारात्मक छटा असलेली सोयराबाईंची भूमिका साकारली होती. 

वाचा : आंतरराष्ट्रीय सेक्स वर्कर्स डे : 'या' अभिनेत्रींनी साकारली वारांगनाची स्मरणीय भूमिका  

यादरम्यान अनिता यांचा मुलगा बबलू ऊर्फ अभिजीत (वय ३८) यांच्यावर नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्‍यांनी आजी आणि आई यांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्‍यात आली नव्‍हती. ही माहिती त्‍यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी समजली. यानंतर त्याची तब्येत आणखीण खालावली. अखेर मंगळवारी सायंकाळी नाशिकमधील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना बबलू यांचे निधन झाले. 

वाचा : वाढदिवस विशेष : अभिनयासोबतचं खासगी आयुष्यावरूनही चर्चेत आली होती तेजश्री प्रधान 

बबलू हा उत्तम गायक, अभिनेता, वादक आणि तंत्रज्ञ होता. तमाशातील ध्वनी व प्रकाश योजना तो सांभाळत होता. त्याच्यावर बुधवारी संगमनेर येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. बबलू यांच्या पश्चात पत्नी अमृता व अडीच वर्षांची मुलगी आहे. काही दिवसातच कांताबाई सातारकर, मोठी मुलगी अनिता आणि नातू बबलू असे तिघा जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने सातारकर-खेडकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने तमाशा कला क्षेत्रात फार मोठी शोककळा पसरली आहे.