Wed, Aug 12, 2020 11:46होमपेज › Ahamadnagar › करंजीजवळ अपघातात एकठार; तीनजण जखमी

करंजीजवळ अपघातात एकठार; तीनजण जखमी

Last Updated: Feb 07 2020 1:50AM
करंजी ः पुढारी वृत्तसेवा
कल्याण- विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावरील करंजी गावातील अपूर्वा पेट्रोलपंपाजवळ बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल व चारचाकी यांची समोरासमोर धडक झाल्याने या अपघातामध्ये पाथर्डी येथील तरुण जागीच ठार झाला. चारचाकीमधील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

नगरहून पाथर्डीकडे मोटरसायकलवरून जात असलेला भूषण अरुण चिंतामणी (वय 30 रा. पाथर्डी) याच्या मोटरसायकलला पाथर्डीकडून देवदर्शन उरकून वसईकडे जात असलेल्या  युनोव्हा गाडीने समोरासमोर जोराची धडक दिले. या अपघातामध्ये मोटरसायकलस्वार चिंतामणी हा तरुण सुमारे 25 फूट उंच उडाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर चारचाकी गाडीने देखील महामार्गालगतच्या शेतांमध्ये जाऊन चार ते पाच पलट्या खाल्ल्या.

या गाडीतील चार प्रवाशांपैकी तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना नगरला हलविण्यात आले  मयत चिंतामणी या तरुणाचे नातेवाईक  घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या खिशातील सोने-चांदीसह, रोख रक्कम पोलिस हवालदार बाळासाहेब जंबे, सतीश खोमणे, ईश्वर बेरड यांनी नातेवाईकांच्या स्वाधीन करत या तरुणाचा मृतदेह पाथर्डीला शासकीय रुग्णालयात हलविला. या घडलेल्या अपघातामध्ये इनोव्हा कारसह मोटरसायकलचा अक्षरशः चुराडा झाला आहे. चिंतामणी या तरुणाच्या अपघाती मृत्यूमुळे पाथर्डी, तिसगाव, करंजी येथील सराफ व्यापार्‍यांनी दुकाने बंद करून या घटनेबद्दल दुः ख व्यक्त केले.