Sun, Sep 20, 2020 06:35होमपेज › Ahamadnagar › ‘भरती रद्द’ने घेतले ४०० जणांचे बळी!

‘भरती रद्द’ने घेतले ४०० जणांचे बळी!

Published On: Mar 02 2018 1:20AM | Last Updated: Mar 02 2018 1:09AMनगर : प्रतिनिधी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची भरतीच विभागीय सहनिबंधकांनी रद्द केली. प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींवर यामुळे मोठा अन्याय झाला असून, भरती रद्द करून शासनाने एकप्रकारे 400 जणांचे बळीच घेतल्याचा आरोप परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला आहे. भरती रद्द झाल्याने अन्याय झाल्याची भावना निर्माण झालेले परीक्षार्थी शनिवारी (दि. 3) यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार आहेत.

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संघटन नसल्याने त्यांच्यावरील अन्यायाविरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी ‘पुढारी’ला दिली. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांचे संघटन करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. 

आधीच राज्यभरात कुठल्याच विभागात मोठ्या प्रमाणावर भरती होत नाही. ज्या ठिकाणी भरती सुरु आहे, त्याठिकाणी राज्य सरकारकडून गैरव्यवहार, गैरप्रकार झाल्याच्या नावाखाली भरती प्रक्रिया रद्द करण्यात येत आहे. सातारा, ठाण्यानंतर नगरमध्येही भरती रद्द करण्यात आली. रिक्त जागा दाखवायच्या, परिक्षार्थींकडून पैसा काढायचा आणि भरती प्रक्रिया रद्द करायची, असा प्रकार सद्ध्या सुरु आहे. जिल्हा बँक म्हणजे सरकारी संस्था असे वाटत होते. मुलाखतीच्या वेळेस आम्हाला संचालक मंडळ असते म्हणून कळाले. एकुण 465 जागा होत्या. त्यातील 65 जागा भरल्याच नाहीत. उरलेल्या 400 जणांपैकी समजा 50 जागांसाठी गैरव्यवहार, गैरप्रकार झाले असतील तर त्याची चौकशी करून तेव्हड्याच 50 जणांवर कारवाई होणे अपेक्षीत होते. मात्र शासनाचा हा निर्णय म्हणजे ‘चोर सोडून सन्याशाला फाशी’ असाच प्रकार आहे.

एमपीएससी परीक्षा देणार्‍या अनेक परीक्षार्थींनी जिल्हा बँकेची परीक्षा दिली. अनेक परीक्षार्थींना परीक्षा शुल्क भरण्यापासून अडचण होती. कसेबसे पैसे मिळवून शुल्क भरले, परीक्षा, मुलाखत दिली. मुलाखतीत निवड झाली आणि अचानकपणे भरतीच रद्द करण्याचा आदेश शासनाने दिला. जिल्हा बँकेवर सहकार खात्याचे नियंत्रण असतांना मग भरती प्रक्रियेच्या सुरुवातीपासूनच यावर नियंत्रण ठेवायला हवे होते, असे परीक्षार्थींचे म्हणणे आहे.

भरती प्रक्रियाचा रद्द झाल्याने प्रामाणिक परीक्षार्थीही आज गुन्हेगारच ठरले आहेत. आरोप झाल्याप्रमाने बँक संचालक, अधिकार्‍यांचे नातेवाईक दोषी असल्यास त्यांच्यावरच कारवाई होणे आवश्यक आहे. लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद येथील मुलांना संचालक, अधिकारीच माहित नसतांना ते त्यांच्या घरी जातील का? असा सवालही परिक्षार्थींनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात राजेश परकाळे यांनी पुढाकार घेतला असून, विद्यार्थ्यांच्या सहभागातून उपोषण, रास्तारोको अशी आंदोलनेही करण्यात येणार आहेत.

परीक्षार्थींचे संघटन सुरू

स्वतःवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात निवड झालेल्या परीक्षार्थींनी संघटन सुरू केले आहे. त्यानुसार काल (दि. 1) या 40 विद्यार्थ्यांनी औरंगाबादच्या खंडपीठात धाव घेतली आहे. याचिका दाखल करण्यासंदर्भात वकीलांशी चर्चा करण्यात आली. उद्या (दि. 3) आणखी 35 विद्यार्थी खंडपीठात जाणार असून, यात विद्यार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.