Wed, Aug 12, 2020 12:18होमपेज › Ahamadnagar › मुळा धरणात  १५ टीएमसी पाणीसाठा 

मुळा धरणात  १५ टीएमसी पाणीसाठा 

Published On: Jul 26 2018 1:30AM | Last Updated: Jul 26 2018 12:05AMराहुरी, अकोले : प्रतिनिधी 

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावरही सध्या वरुणराजाची वक्रदृष्टी असल्याने धरणाकडे होणारी पाण्याची आवक काहीशी मंदावली आहे. तसेच लाभक्षेत्रावरील खरीप पेरण्या पाण्याअभावी संकटात सापडल्याने आवर्तनाची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, भंडारदरा पाणलोटात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असून घाटघर येथे 119 मि.मि. पावसाची नोंद झाली असून धरणात 12 तासांत 342 दलघफू  पाण्याची आवक झाली आहे.

मुळा धरणाचा पाणीसाठा खालावल्यानंतर यंदाच्या हंगामात पाणलोट क्षेत्रावर मान्सूनची कृपा व्हावी, अशी अपेक्षा सर्वांना होती. प्रारंभी   मुळा धरणाच्या लाभक्षेत्रावर पावसाची कृपा राहिली. मात्र, पाणलोट क्षेत्र कोरडेच होते. यामुळे  धरण साठा खालावलेलाच होता. मात्र, आर्द्रा नक्षत्राने कृपा दाखविल्याने पाणलोट क्षेत्रात  धुवाँधार पाऊस सुरू झाला.  त्यामुळे धरण पाणीसाठ्यात वाढ झाली. त्यातच आषाढ सरीही पाणलोट क्षेत्रावर चांगल्याच बरसल्या. यामुळे गत आठवडाभर धरणाकडे 15 ते 20 हजार क्यूसेकने पाण्याची आवक झाली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने अचानकपणे दडी मारली.

यामुळे धरणाकडे होणारी पाण्याची आवक मंदावत केवळ 3 ते 4 हजार क्यूसेक प्रवाहाने होताना दिसत आहे. धरणाकडे सद्यस्थितीला 4 हजार 227 क्यूसेक प्रवाहाने संथगतीने पाण्याची आवक  सुरू आहे, तर धरण साठा 15 हजार दलघफू  झाला आहे. पाणलोट क्षेत्र असलेल्या कोतूळ भागातही केवळ 1 मि.मी पावसाची नोंद आहे. तसेच लाभक्षेत्रावर पावसाने दडी मारलेली आहे. पाऊस नसल्याने लाभक्षेत्रात खरीप पेरण्या झालेल्या शेतकर्‍यांना चिंता आहे. 

मुळा धरण लाभक्षेत्रावर पावसाने उघडीप घेतल्याने लाखो हेक्टर क्षेत्रावरील खरीप पेरणी संकटात सापडलेली आहे. यामुळे शेतकर्‍यांकडून मुळा धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून खरिपासाठी आवर्तनाची मागणी केली जात आहे. शेतकर्‍यांकडून पाटबंधारे विभागाकडे आवर्तनाची मागणी होत असताना मुळा धरण कृति-समितीची बैठक होणे गरजेचे आहे. पावसाने दडी मारल्याने चिंतातूर झालेल्या शेतकर्‍यांच्या नजरा मुळा धरणाकडे लागल्या आहेत. कदाचित, वरूणराजाने दोन दिवसांत लाभक्षेत्रात पुन्हा हजेरी लावल्यास खरीपाच्या पिकांना जीवदान मिळणार आहे. त्यामुळे पावसासाठी पांडुरंगाला साकडे घातले जात आहे.

दरम्यान, भंडारदरा धरण पाणलोटात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. काल दिवसभरात केवळ 7 मि.मि. इतक्या पावसाची नोंद झाली. तर धरणात सायंकाळी 9331 दलघफू पाणीसाठा झाला होता. या धरणातून प्रवरा पात्रात 1440 क्यूसेकने विसर्ग सुरूच आहे. हा विसर्ग निळवंडे धरणात जात आहे तसेच वाकीचा ओव्हर फ्लो 556 क्यूसेकने निळवंडेच्या पोटात विसावत आहे. त्यामुळे निळवंडेत सायंकाळी 5555 दलघफू पाणीसाठा होता. 

रतनवाडी 97, पांजरे 72, भंडारदरा 69, वाकी 48 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. कृष्णावंती नदी दुथडी वाहत आहे. तसेच 303 दलघफू क्षमता असलेले टिटवी धरण ओव्हर फ्लो असल्याने त्याचे पाणी निळवंडेच्या जलाशयात विसावत असल्याचे चित्र आहे.