Mon, Apr 06, 2020 10:29होमपेज › Aarogya › स्लीप डिस्कच्या वेदनांपासून मुक्ती, 'हा' आहे उपाय!

स्लीप डिस्कच्या वेदनांपासून मुक्ती, 'हा' आहे उपाय!

Last Updated: Mar 02 2020 7:20PM
डॉ. भारत लुणावत

मणक्यांच्या चकतीची बाहेरची रिंग कमजोर होते  किंवा फाटते आणि अंतर्गत मऊ भागाला बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. वयानुसारही हा त्रास होऊ शकतो. काही कामे केल्यास स्लीप डिस्कचा त्रास होऊ शकतो. कोणतीही जड वस्तू उचलताना वळतो तेव्हा ही चकती आपल्या जागेवरून बाहेर येऊ शकते.

शरीरातील मणका ताठ तर शरीर ताठ राहते असे म्हणतात. हा मणका एकसंध नव्हे तर साखळी स्वरूपात असतो. मणक्याच्या हाडांमध्ये वरून खाली सर्व्हायकल मणक्यामध्ये सात, थोरेसिक मणक्यात 12 आणि लंबर मणक्यामध्ये पाच हाडांचा समावेश असतो. ही सर्व हाडे चकतीने एकमेकांना जोडलेली असतात. रोजच्या जगण्यात उठता, बसताना, फिरताना जे झटके लागतात शोषण्याचे काम ही चकती करते आणि हाडांचे रक्षण करते. प्रत्येक चकतीमध्ये दोन भाग असतात. एक नरम अंतर्गत भाग आणि एक कडक बाहेरचा भाग. कोणतीहा जखम किंवा अशक्‍तपणा यामुळे चकतीचा अंतर्गत भाग बाहेरच्या रिंगमधून बाहेर येऊ शकतो. त्याला स्लीप डिस्क किंवा हर्निएटेड डिस्क म्हटले जाते.

स्लीप डिस्कची कारणे ः 

मणक्यांच्या चकतीची बाहेरची रिंग कमजोर होते  किंवा फाटते आणि अंतर्गत मऊ भागाला बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो. वयानुसारही हा त्रास होऊ शकतो. काही कामे केल्यास स्लीप डिस्कचा त्रास होऊ शकतो. कोणतीही जड वस्तू उचलताना वळतो तेव्हा ही चकती आपल्या जागेवरून बाहेर येऊ शकते. जिममध्ये व्यायामादरम्यान जास्त वजन उचलताना मणक्यांच्या खालच्या बाजूला तणाव वाढू शकतो. त्यामुळे स्लीप डिस्कचा त्रास होऊ शकतो. जास्त वजन असणार्‍या व्यक्‍तींमध्ये स्लीप डिस्क होण्याची शक्यताही अधिक असते. कारण, त्यांच्या मणक्यांच्या चकतीवर जास्त वजनाचा भार पडत असतो. अशक्‍त स्नायू आणि सुस्त जीवनशैली हीदेखील स्लीप डिस्क होण्याचे प्रमुख कारण आहे. वाढत्या वयात स्लीप डिस्क होण्याची शक्यता अधिक असते. 

स्लिप डिस्कचे निदान ः 

स्पाईन सर्जन सर्वात पहिल्यांदा शारीरिक तपासणी करतात. व्यक्‍तीला होणार्‍या वेदना आणि गैरसोयीचे नेमके स्थान कुठे आहे त्याची तपासणी करतात. त्यामध्ये मज्जासंस्था आणि स्नायू यांच्या ताकदीची तपासणी केली जाते. मणक्यांचे डॉक्टर रुग्णाकडून त्याचा वैद्यकीय पूर्वेतिहास आणि लक्षणे याविषयी जाणून घेतात. त्याशिवाय, पहिल्यांदा कोणते लक्षण जाणवले आणि सर्वाधिक त्रास कोणते काम करताना होते, तेदेखील जाणून घेतले जाते. त्याशिवाय, इमेजिंग परीक्षणाने ज्या भागाला इजा झाली आहे, त्याची ओळख करून घेणे सोपे जाते. इमेजिंग चाचण्यांमध्ये एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन आणि डिस्कोग्राम यांचा समावेश होतो. 

स्लीप डिस्कवर उपचार ः 

स्लीप डिस्कच्या उपचाराचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. रुग्णाला किती आणि कोणत्या पातळीपर्यंतचा त्रास होतो आहे आणि चकती आपल्या जागेवरून किती लांब गेली आहे, या सर्व गोष्टींवर उपचार कोणते करायचे, हे अवलंबून आहे. बहुतांश लोकांचा हा त्रास व्यायाम करून कमी होतो. पाठ आणि आसपासच्या स्नायूंचे प्रसरण करण्यास मदत होते आणि त्यामुळेच ते मजबूतही होतात. नियमित व्यायाम करूनही वेदनांपासून मुक्‍ती मिळत नसेल तर डॉक्टर काही औषधे लिहून देतात. डॉक्टरी सल्ल्याने या औषधांचे सेवन केल्यास वेदनांपासून मुक्‍ती मिळू शकते. 

शस्त्रक्रियेचाही होतो फायदा ः 

स्लीप डिस्कच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी मायक्रोडिस्केटोमी शस्त्रक्रिया हा एक उत्तम पर्याय आहे. या शस्त्रकियेदरम्यान संपूर्ण चकती हटवण्याऐवजी जिथे इजा झाली आहे तिथलाच भाग हटवला जातो. खूप गंभीर इजा असल्यास मात्र कृत्रिम डिस्क रिप्लेसमेंट सर्जरीचा पर्याय स्वीकारावा लागतो. त्यामध्ये इजा झालेली चकती काढून कृत्रित चकती बसवली जाते. या शस्त्रक्रियेनंतर व्यक्‍तीला पुढे-मागे वाकणे तसेच इतर कार्य करण्यामध्ये त्रास होत नाही. मणक्यांची लवचीकता पूर्वीसारखी होते. मणक्यांना लागणारे धक्के पचवण्याची क्षमता वाढते. कृत्रिम चकती बसवल्याचा फायदा म्हणजे ती तहहयात काम करते. एंडोस्कोपिक डिस्क शस्त्रक्रियेने देखील स्लीप डिस्कपासून सुटका मिळवू शकतो. ही शस्त्रक्रिया लोकल भूल देऊन केली जाते. एंडोस्कोपिक ट्युबच्या मदतीने इजा झालेल्या चकतीपर्यंत पोहोचता येते. या प्रक्रियेत ऑपरेशन थिएटरमध्ये असलेल्या फ्लुरोस्कोपी एक्स-रे किंवा सीटी स्कॅनची मदत घेतली जाते. शस्त्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी एन्डोस्कोपिक ट्युबबरोबर एक कोल्ड लेजरही जोडले जाते. 

स्लिप डिस्कपासून बचावासाठी...

स्लीप डिस्क होणे थांबवता येत नाही; पण काही गोष्टींत सावधानता बाळगली तर स्लीप डिस्क होण्याचा धोका टाळू शकतो. जास्त वजन उचलणे टाळावे. वजन उचलताना योग्य तंत्राचा वापर करावा, वजन संतुलित असावे, योग्य पद्धतीने बसावे, कॉम्प्युटरसमोर बसताना योग्य पद्धतीने बसावे. दीर्घ काळ एकाच जागी बसणे टाळावे, स्नायूंच्या मजबुतीसाठी रोज नियमित व्यायाम करावा. आहाराकडे विशेष लक्ष द्यावे. धूम्रपान आणि दारू पिऊ नये. 

स्लीप डिस्कची लक्षणे ः शरीरामध्ये एकाच बाजूला वेदना आणि बधीरता येणे. कंबरेत असह्य वेदना होणे, रात्री कंबरेतील वेदना वाढणे, उभे राहिल्यास किंवा बसताना वेदना होणे, चालण्या फिरण्यास त्रास होणे, स्नायूंमध्ये अशक्‍तपणा येणे,  मणक्याजवळ खेचल्यासारखे वाटणे.