Wed, Feb 19, 2020 09:34होमपेज › Aarogya › पोटावरची चरबी कमी करायचीय?

पोटावरची चरबी कमी करायचीय?

Published On: Aug 22 2019 1:39AM | Last Updated: Aug 21 2019 8:29PM
सतीश जाधव

वजन कमी करताना शरीराची ठेवण योग्य राहावी म्हणूनही काही प्रयत्न करावे लागतात. त्यात पोटावरील आणि कंबरेवरील चरबी कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात. बसून काम करणार्‍या व्यक्‍तींचे पोट लवकर सुटते. त्यामुळे पोट आणि कंबरेवरील चरबी कमी करण्यासाठी योगासनेही उपयुक्‍त ठरतात. नियमित योगासने वजन कमी करण्यासही मदत करतात. 

ज्या व्यक्‍तींचे वजन जास्त असते, त्यांचे पोट आणि कंबर दोन्ही सुटलेले असते. शरीराचा स्थूलपणा कमी करण्यासाठी व्यायाम तर केलाच पाहिजे; पण कंबर आणि पोट यांच्यावरील चरबी कमी झाल्यास शरीराची ठेवणही व्यवस्थित दिसते. योगासनांमधील दोन योगासने रोज दहा मिनिटे केल्यास वेगाने चरबी वितळेल आणि वजन कमी करण्यास मदत करते. स्थूलपणाने ग्रस्त व्यक्‍तींनी रोज योगासने करणे नक्‍कीच फायदेशीर ठरते. स्थूलपणा आणि थुलथुलीत शरीर कोणालाच आवडत नाही. कारण, स्थूलतेमुळे अनेक समस्या भेडसावतात. पोट आणि कंबर यांच्यावरील चरबी कमी करून शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगासने मदत करतात. खालील दोन योगासने केवळ 10 मिनिटे केली, तर शरीराची ठेवण अधिक चांगली होते. 

सेतुबंधासन ः यामध्ये व्यक्‍तीचे शरीर एखाद्या पुलासारखे होते. रोज सेतुबंधासनाचा सराव केल्यास पोट आणि चरबी कमी करण्यास मदत होते. त्याशिवाय, पाय आणि मांड्या मजबूत होतात. कंबरदुखी आणि पाठदुखीची समस्या भेडसावणार्‍या व्यक्‍तींनाही सेतुबंधासनाचा फायदा होतो. 

कसे करावे आसन? ः सेतुबंधासन करण्यासाठी चटईवर आडवे पाठीवर झोपावे. पायात थोडे अंतर असावे. हाताचे तळवे जमिनीकडे असावे. गुडघ्यातून पाय वाकवावा. 
हाताने कंबरेच्या बाजूला घट्ट आधार द्यावा किंवा घट्ट पकडून ठेवावे. 
या स्थितीत राहून पाठीपासून पायापर्यंतचे शरीर वर उचलावे. 
 एखाद्या पुलाप्रमाणे शरीराची आकृती तयार होईल. या स्थितीत 10 ते 30 सेकंद किंवा जितका वेळ शक्य आहे तितका वेळ थांबावे. मग पुन्हा पूर्वस्थितीत यावे, हेच सेतुबंधासन.
सेतुबंधासनाचा सराव रोज 10-12 वेळा किंवा जितका वेळ करणे शक्य असेल तितका करावा. 
त्यामुळे पोटाची चरबी कमी होऊन वजनही कमी होईल. 

नौकासन - पोटावरील चरबी कमी करण्यासाठी नौकासन हे उत्तम योगासन आहे. या आसनामध्ये पोटावर दाब येतो आणि पोटाची चरबी कमी होते. नौकासन केल्याने पोटातील वायू बाहेर पडतात, तसेच बद्धकोष्ठता राहात नाही. त्यामुळे बद्धकोष्ठतेच्या रुग्णांनाही फायदा होतो. त्याशिवाय नौकासनामध्ये हात, पाय, मांड्यादेखील मजबूत होतात. 

नौकासन करण्याची पद्धत ः सर्वात पहिल्यांदा चटईवर सरळ झोपावे. हात मांडीच्या जवळ ठेवा.
आता श्‍वास घेत बूड जमिनीवर टेकवत बाकी शरीर वरच्या बाजूला उचलावे. 
हातही वर उचलत छातीच्या समोर सरळ ठेवावे. 
या स्थितीत 5-10 सेकंद किंवा जितका वेळ थांबता येईल तेवढे थांबावे. हळूहळू श्‍वास सोडत पूर्वस्थितीत यावे.
नौकासनाचा सराव रोज 10-12 वेळा किंवा जितक्या वेळा करता येईल तितका करावा. 
हे आसन केल्याने पोटाची आणि कंबरेची चरबी वेगाने कमी होते.