Wed, Aug 12, 2020 12:13



होमपेज › Aarogya › पावसाळ्यातल्या फ्लूचं काय?

पावसाळ्यातल्या फ्लूचं काय?

Last Updated: Jul 29 2020 8:28PM




रेणुका कल्पना

जगभरात दरवर्षी 65 हजार लोक सिझनल फ्लूने मृत्युमुखी पडतात. पावसाळा सुरू झाला, की भारतातही या सिझनल फ्लूची साथ पसरू लागते. यंदा भारतात ही साथ येईल तेव्हा कोरोना व्हायरसचा धोका आणि सोबतच आरोग्य व्यवस्थेवरचा ताण आणखी वाढेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली होती; पण आता कोरोनाच्या साथीमुळे सिझनल फ्लू येणारच नाही, अशी चर्चा सुरू झालीय.

मान्सून सुरू झाला रे झाला, की आपल्या आसपासचं कुणीतरी शिंकायला सुरवात करतं. चार पाच दिवसांनी ऑफिसमधला एक सहकारी, शाळेतला किंवा कॉलेजमधला एखादा मित्र सर्दी-पडशाने आजारी पडलेला असतो. बघता बघता हे सर्दी पडसं, तापाचं दुखणं आपल्या घरातही येऊन पोहोचतं आणि ‘काळजी घ्या रे बाबांनो, फ्लूची साथ सुरू झालीय’ असे शब्द आपल्या कानावर पडतात.
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार दरवर्षी जगभरात सुमारे 6 लाख लोक या सिझनल फ्लूमुळे मृत्युमुखी पडतात. कितीतरी लोकांना या फ्लूची लागण होत असते. यावेळी मात्र कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आपण करत असलेल्या उपाययोजनांमुळे फ्लूच्या रुग्णांमध्ये घट झाल्याचं दिसून आलंय.

वर्षातून दोनदा येतो फ्लू

पावसाळ्यात अनेकदा आपल्याला ताप येतो. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणं, अंगदुखी अशी काही लक्षणं आपल्याला दिसू लागतात. गंमत म्हणजे, आपण काहीही औषध घेतलं नाही, तरी दोन ते तीन दिवसांत आपण एकदम बरे होऊन पुन्हा कामावर, शाळेत वगैरे जाऊ लागतो. आपल्याला आजारी पाडणारे हे व्हायरस इन्फ्लुएन्झा या नावाने ओळखले जातात. वर्षातून दोनदा हे व्हायरस जास्त सक्रिय होतात. एकदा जूनमधे पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात हिवाळा सुरू होतो तेव्हा आणि दुसर्‍यांदा डिसेंबरमधे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू होतो तेव्हा.

हिवाळ्यातल्या या आजारपणाला सिझनल फ्लू असंही म्हटलं जातं. सिझनल फ्लूचे पेशंट हिवाळ्यात उच्चांक गाठत असले, तरी त्याची सुरुवात त्याआधीच झालेली असते. भारत पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात येणारा देश आहे. भारतात सिझनल फ्लूचे जास्तीत जास्त पेशंट साधारण डिसेंबर, जानेवारी महिन्यात सापडतात. मार्चमधे उन्हाळा सुरू झाला, की ही साथ ओसरते आणि पुन्हा मान्सून आला, की जून महिन्यात या साथीची सुरुवात होते.

यंदा भारतात ही साथ येईल तेव्हा कोरोना व्हायरसचा धोका आणखी वाढलेला असेल, असं मत अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलं होतं. जूनमधे भारतात कोरोना व्हायरसची दुसरी लाट येणार असल्याची चर्चाही केली जात होती. आधीच बिकट अवस्थेत असलेल्या आरोग्य व्यवस्थेवरचा ताण यामुळे आणखी वाढू शकतो, अशी भीती वाटत होती. आता मान्सून सुरू झालाय. त्यामुळे सरकार, आरोग्य व्यवस्था, तज्ज्ञ काय होईल, याकडे डोळे लाऊन बसलेत खरे; पण आता सिझनल फ्लू येणारच नाही, अशीही चर्चा सुरू झालीय.

फ्लू झालाय बंदिस्त

‘द वॉल स्ट्रीट जर्नल’च्या एका बातमीनुसार यंदा पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात हा सिझनल फ्लू आलाच नाही. दक्षिण गोलार्धात साधारण जून महिन्यात हिवाळ्याला सुरुवात होते; मात्र उत्तर गोलार्धातून अनेक लोक स्थलांतरित झाल्याने जानेवारीपासूनच तिथे सिझनल फ्लूचा प्रसार व्हायला सुरुवात होते. यंदा दक्षिण गोलार्धातल्या अर्जेंटिना, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांनी फ्लूच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाल्याचं स्पष्ट केलंय.
‘कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी आपण करत असलेल्या उपाययोजना हे फ्लूचे पेशंट कमी होण्यामागचं कारण आहे,’ असं मत पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन या संस्थेच्या हेल्थ इमर्जन्सिज विभागाचे उपसंचालक सिल्व्हिन अल्डीघेरी यांनी मांडलंय. कोरोना व्हायरस ज्या मार्गाने पसरतो त्याच मार्गाने हे सिझनल फ्लूचे व्हायरसही पसरतात. लागण झालेल्या माणसाच्या संपर्कात आल्याने त्याच्या सर्दी किंवा खोकल्यातून किंवा त्याच्याशी खूप वेळ बोलल्यामुळेच सिझनल फ्लू पसरतो.

कोरोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून अनेक देश लॉकडाऊनमधे आहेत. देशाच्या सीमाही आपण बंद केल्यात. कोणताही आंतरराष्ट्रीय प्रवास गेल्या चार महिन्यांत झालेला नाही. साधा ताप आलेले, सर्दी, खोकला झालेले प्रवासी प्रवास करणं टाळताहेत. प्रवाशांचं तापमान तपासलं जातंय. त्यामुळे कुणाला फ्लूची लागण झाली असेल, तर ती लगेचच ओळखता येते.

आपण सगळे आपापल्या घरात बंदिस्त आहोत. आपण बाहेर पडतोय तेसुद्धा तोंडावर मास्क घालूनच. बाहेर पडल्यावर शारीरिक अंतर पाळणं बंधनकारक आहे. उगाचच चेहर्‍याला, नाकाला हात लावण्याची सवय आपण हळूहळू मोडतोय. वारंवार हात धुवायलाही आपण विसरत नाही. या सगळ्यामुळे दक्षिण गोलार्धातल्या देशात सिझनल फ्लूला आळा घालणं शक्य झालंय.

इतरही रोग होताहेत कमी

पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातही फ्लूचे पेशंट दिसत नाहीत, असं नेचर डॉट कॉम या वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या लेखात सांगण्यात आलंय. ‘स्थानिक संस्थांनी पुरवलेल्या माहितीनुसार न्यूयॉर्कमधेही फ्लूच्या पेशंटमधे घट झाल्याचं दिसून येतं. न्यूयॉर्कमधे नेहमीपेक्षा एखादं-दुसरा आठवडा आधीच फ्लूची सुरुवात झाली; पण फ्लू व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या खूप कमी होती आणि नेहमीपेक्षा सुमारे पाच आठवडे आधीच ही साथ संपली. हाँगकाँगमधेही यंदा एन्फ्लुएन्झा फ्लूचे रुग्ण 63 टक्क्यांनी कमी झाले. या प्रकारची घट 2003 मध्ये सार्स साथरोग आला होता तेव्हाही दिसली होती,’ अशी माहिती या लेखात देण्यात आलीय.

हाँककाँग, न्यूयॉर्क ही शहरं पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात येतात. जानेवारीपासून तिथेही फ्लूचे पेशंट कमी झाल्याचं दिसून आलंय. नुसते फ्लूचेच नाही तर इतर अनेक आजारांची संख्याही कमी होतेय. 2016 नंतर पहिल्यांदा गोबर, रुबेला या आजारांवर नियंत्रण मिळवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. यंदा आतापर्यंत गोवरचे जगभरातून फक्त 36 रुग्ण सापडले आहेत. विशेषतः लहान मुलांना हे आजार धरतात; पण कित्येक महिने शाळा बंद असल्याने हे आजार लहान मुलांपर्यंत पोहोचत नाहीत.

फ्लू विरोधातली लस टोचून घ्या

हे सगळं पाहता यंदा भारतातही फ्लू सुट्टी घेईल, अशी शक्यता वर्तवली जातेय. फ्लू आणि कोरोना व्हायरस असं एकत्र आल्यावर भारताच्या आरोग्य व्यवस्थेचं काय होणार, याची काळजी करणार्‍यांना दिलासा देणारीच ही गोष्ट आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी म्हणजेच एआयव्ही या पुण्यातल्या संस्थेनं 5 वर्षांत केलेल्या 10 शहरांच्या अभ्यासानुसार भारतातल्या वेगवेगळ्या शहरांत या सिझनल फ्लूचे वेगवेगळे उच्चांक असतात. श्रीनगरसारख्या बर्फाळ प्रदेशात साधारण डिसेंबर ते एप्रिल या दिवसांत फ्लूचे जास्तीत जास्त रुग्ण आढळतात. दिल्ली, लखनऊ, कोलकाता, पुणे अशा मध्यवर्ती शहरांमधे जुलै, ऑक्टोबर या महिन्यात फ्लूचे रुग्ण दिसतात. हिवाळा सुरू झाला, की दिल्ली, नागपूर, पुणे अशा शहरात एकदम उच्चांक गाठला जातो. चेन्नई, वेल्लोर या दक्षिण भारतातल्या शहरांत नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात फ्लू सक्रिय होतो.

एआयव्हीचा हा अहवाल लक्षात घेता लॉकडाऊनमुळे फ्लू सिझन टाळण्यात आपण यशस्वी झालो असलो, तरी लॉकडाऊन संपल्यावर फ्लू रोखण्यासाठी आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. ही काळजी कशी घ्यावी, यासाठी जगभरातल्या आरोग्य संस्थांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जगात सर्वाधिक कोरोनाबाधित सापडलेल्या अमेरिकेतल्या आरोग्य नियंत्रण संस्थेनंही सूचना जारी केल्या आहेत.
पहिलं म्हणजे, दरवर्षी साधारण ऑक्टोबर महिन्यात फ्लूविरोधातली लस टोचून घ्यायला हवी. लहान मुलं, वृद्ध, गरोदर महिला यांच्यासाठी ही लस अतिशय महत्त्वाची ठरते.

दुसरं म्हणजे, आपल्या आसपास असणार्‍या असंख्य व्हायरसपैकी प्रत्येकाला ही लस प्रतिबंध करू शकणार नाही. त्यामुळे यासोबत वारंवार हात धुणं, खोकताना, शिंकताना रुमाल वापरणं, शारीरिक अंतर पाळणं गरजेचं आहे.
याशिवाय चुकूनमाकून आजारी पडलोच तर डॉक्टरकडे जाऊन डॉक्टरांनी दिलेली सगळी औषधं व्यवस्थित घेणं हासुद्धा फ्लूला आपल्यापासून लांब ठेवण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे. अशा काही सोप्या पद्धतींनी आपण फ्लूसोबतच कोरोनालाही पळवून लावू शकतो.