Tue, Jun 15, 2021 12:59
समस्या ल्यूकोपेनियाची

Last Updated: Jun 09 2021 10:10PM

डॉ. महेश बरामदे

रक्‍तातील पांढर्‍या पेशींची संख्या कमी होणे म्हणजे ल्यूकोपेनिया होय. सामान्यतः प्रौढ व्यक्‍तीच्या रक्‍तात पांढर्‍या पेशींची संख्या प्रतिमायक्रोलिटर 4000 पेक्षा कमी झाल्यास अनेक प्रकारचे आजार त्या व्यक्‍तीला होऊ शकतात. आजारांची जोखीम कमी करण्यासाठी ल्यूकोपेनियाचे निदान वेळेवर होणे आवश्यक असते. एखाद्या आजाराचा किंवा आजारावरील औषधांचा परिणाम म्हणूनही ल्यूकोपेनिया होऊ शकतो.

ल्यूकोसाईट्स म्हणजे रक्‍तातील पांढर्‍या पेशींची संख्या कमी होणे. या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘ल्यूकोपेनिया’ असे म्हणतात. पांढर्‍या पेशींना आपण ‘सैनिक पेशी’ म्हणतो. कारण, त्या विविध आजारांपासून आपले संरक्षण करतात. आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्‍ती पांढर्‍या पेशींच्या संख्येवर ठरते. ल्यूकोपेनिया झालेल्या व्यक्‍तीला संसर्गजन्य रोगांचा धोका सर्वाधिक असतो. सामान्यतः प्रौढ व्यक्‍तीच्या रक्‍तात पांढर्‍या पेशींची संख्या प्रतिमायक्रोलिटर 4000 पेक्षा कमी झाल्यास अनेक प्रकारचे आजार त्या व्यक्‍तीला होऊ शकतात. आजारांची जोखीम कमी करण्यासाठी ल्यूकोपेनियाचे निदान वेळेवर होणे आवश्यक असते. रक्‍ताची विशिष्ट प्रकारची चाचणी करून ल्यूकोपेनियाचे निदान केले जाते. या चाचणीला पूर्ण रक्‍तगणना किंवा कम्प्लीट ब्लड काऊंट (सीबीसी) असे म्हणतात. व्यक्‍ताच्या रक्‍तात अनेक प्रकारच्या पेशी असतात. ल्यूकोसाईट्स किंवा पांढर्‍या रक्‍तपेशी संसर्गापासून व्यक्‍तीचा बचाव करतात. रोगप्रतिकारक यंत्रणेचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. ल्यूकोसाईट्सची कमतरता म्हणजे ल्यूकोपेनिया होय. 

पांढर्‍या रक्‍तपेशींची रक्‍तातील संख्या प्रतिमायक्रोलिटर सरासरी 4000 ते 11000 च्या दरम्यान असते. 4000 पेक्षा कमी पेशी आढळून आल्यास ल्यूकोपेनिया झाल्याचे गृहित धरून उपचार केले जातात. शरीरात पाच प्रकारच्या पांढर्‍या रक्‍तपेशी असतात. न्यूट्रोफिल, लिम्फोसाईट, मोनोसाईट, इयोस्नोफिल्स आणि बासोफिल्स असे हे पाच प्रकार होत. त्यामुळेच विशिष्ट प्रकारच्या पांढर्‍या रक्‍तपेशी कमी होण्यावरून ल्यूकोपेनियाचेही पाच प्रकार पडतात. न्यूट्रोपेनिया, लिम्फोसायटोपेनिया, मोनोसायटोपेनिया, बोसोबेनिया आणि इयोस्नोपेनिया हे ल्यूकोपेनियाचे पाच प्रकार होत. पांढर्‍या रक्‍तपेशी कमी झाल्यामुळे कोणतेही विशिष्ट लक्षण दिसून येत नाही, तरीही अशा व्यक्‍तीला एखादा संसर्ग झाल्यास लक्षणे दिसू लागतात. ताप येणे, घाम येणे, थंडी वाजून येणे, तोंडात चट्टे पडणे, घशात खवखव, वजन कमी होणे, लघवी करताना वेदना किंवा जळजळ अशी लक्षणे दिसू शकतात.

काही आरोग्यविषयक समस्या अस्थिमज्जेतील पांढर्‍या रक्‍तपेशींच्या उत्पादनात हस्तक्षेप करतात आणि त्यामुळे ल्यूकोपेनिया होऊ शकतो. इतर समस्या पांढर्‍या रक्‍तपेशी नष्ट होऊ लागल्यामुळे उद्भवतात. एखाद्या आजाराचा किंवा आजारावरील औषधाचा परिणाम म्हणूनही ल्यूकोपेनिया होऊ शकतो. कर्करोगावरील उपचार सुरू असताना त्या उपचारांमुळे पांढर्‍या पेशी नष्ट होऊ शकतात आणि ल्यूकोपेनिया होऊ शकतो. या उपचारपद्धतींमध्ये किमोथेरपी, किरणोत्सर्गी उपचार, अस्थिमज्जा प्रत्यारोपण यांचा समावेश आहे. याखेरीज इंटरफेरॉन, फिट्सवर दिले जाणारे लॅमोट्रिजिन आणि सोडियम वॅल्प्रोएट, याखेरीज बुप्रोपियन हे अँटिडिप्रेसन्ट औषध, क्लोजापीन हे अँटिसायकोटिक औषध, मीनोसायक्लिन हे प्रतिजैविक, सिरोलिमस, मायकोफेनोलेट मोफेटिल, टॅक्रोलिमस, सायक्लोस्पोरिन यासारखी इम्यूनोसप्रेसन्ट, स्टेरॉइड, पेनिसिलिन आदी औषधांमुळेही ल्यूकोपेनिया होऊ शकतो.

वरील सर्व औषधांचे सेवन करताना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आणि काळजी घेऊनच केले पाहिजे. पांढर्‍या रक्‍तपेशींचे प्रमाण घटण्याच्या स्थितीत सामान्यतः कोणतेही लक्षण वरकरणी दिसून येत नाही. त्यामुळेच ल्यूकोपेनिया झाल्याची शंका आल्यास डॉक्टर रक्‍तचाचणी करायला सांगतात. रक्‍तातील पाचपैकी कोणत्या प्रकारच्या पांढर्‍या पेशी कमी झाल्या आहेत, हे समजल्यानंतर त्या प्रकारच्या पेशी वाढविण्याच्या द‍ृष्टीने उपचार सुरू केले जातात. याखेरीज पूर्वी सुरू असलेल्या औषधांपैकी एखाद्या औषधामुळे ल्यूकोपेनियाची लक्षणे दिसून आली असतील, तर संबंधित औषध बंद करण्याचा सल्ला डॉक्टर देऊ शकतात किंवा त्या औषधाला पर्यायी औषध देतात. रक्‍तातील पांढर्‍या पेशींचे प्रमाण वाढविण्यासाठी डॉक्टर काही औषधांची शिफारस करतात. याखेरीज पांढर्‍या रक्‍तपेशी घटण्यास कारणीभूत ठरणारे जिवाणू संक्रमण आणि फंगल इन्फेक्शन यावर इलाज करण्यासाठी अनुक्रमे अँटिबायोटिक आणि अँटिफंगल औषध सेवन करण्याचा सल्ला देतात.