Sun, Jan 17, 2021 05:58
गुडघ्याचा संधिवात

Last Updated: Jan 13 2021 10:12PM
डॉ. आनंद ओक

काही विकारांत सुरुवातीला तात्पुरती औषधे घेऊन कामचलावू उपचार केले जातात. आजार वाढल्यानंतर मग आयुर्वेदीय उपचारांकडे कळले जाते. अशा विकारांपैकी एक विकार म्हणजे गुडघेदुखी.

सर्वसामान्यपणे अशा पेशंटकडून विचारले जाणारे प्रश्न म्हणजे ‘डॉक्टर माझा एक गुडघा का दुखतो?’ ‘डॉक्टर हा संधिवात आहे का?’ ‘अमूक एक औषध आमच्या नातेवाईकांनी घेतले, त्याचे गुडघे दुखणे कमी आले; पण त्याच्या औषधांनी माझे गुडघे दुखणे कमी का येत नाही?’ ‘डॉक्टर, वजन वाढल्याने गुडघे दुखतात असे म्हणतात आणि वजन कमी करण्यासाठी मी चालावे म्हटले तर शक्य होत नाही. याला काय करणार?’ ‘डॉक्टर, माझ्या गुडघ्यात पाणी तर झाले नाही ना?’ असे भीतीयुक्त प्रश्नसुद्धा काही जणांकडून केले जातात.

प्रत्येक पेशंटची वेगवेगळी अवस्था असते. कोणाचे लहानपणापासून गुडघे दुखत असतात, तर कोणाचे इतर सांध्यांच्या जोडीला गुडघे दुखत असतात. काहींना चालण्याने बरे वाटते, तर अनेकांना चालण्याने वाढते. कोणाच्या गुडघ्यावर सूज असते, तर कोणाच्या गुडघ्यावर अजिबात सूज नसते. कोणाला तेल लावल्याने, शेकल्याने बरे वाटते, तर कोणाला वाटत नाही. कोणी गुडघ्याचे व्यायाम करतो, तर कोणी कॅप वापरत असतो. एकाच गुडघेदुखीच्या या अनेक अवस्था असण्याचे कारण म्हणजे गुडघेदुखी ही तक्रार एक दिसत असली तरी ती वेगवेगळ्या कारणांनी, वेगवेगळ्या आजारांच्या परिणामी होत असते.

रुग्णाची अवस्था

काहीजण नियमित वेदनाशामक औषधे घेत असतात. यामध्ये काहींना स्टेरॉइडसारख्या औषधांनी सवय जडलेली असते आणि विविध दुष्परिणामही झालेले असतात. काहीजणांनी गुडघ्यातील इंजेक्शनचा वापर केलेला असतो. कोणी विशिष्ट लेप लावत असतात, तर कोणी जाहिरातीला भुलून एखाद्या आयुर्वेदीय गोळ्या किंवा काढा घेत असतात. काहीजण नुसते गुडघे शेकत असतात. आयुर्वेदिक औषध असे म्हणून प्रत्यक्षात गुपचूप इंग्लिश गोळ्या कुटून त्याचे मिश्रण करून देणार्‍या ‘भोंदू वैद्यांकडून’ फसलेले आणि अशा भेसळयुक्त औषधांचे कालांतराने दुष्परिणाम झालेले पेशंटही आहेत. गुडघे दुखत असतानाही ‘कायमचे चालणे बंद होईल’ या भीतीने किंवा ‘व्यायाम केल्यावर गुडघेदुखी बरी होईल’ या गैरसमजाने किंवा ‘जोडीची मैत्रीण चालायला जाते म्हणून’ क्रेझ म्हणून स्वतःच्या गुडघेदुखीचा विचार न करता फिरायला जाणार्‍या आणि आजार वाढविणार्‍या भगिनीही आढळतात.

गुडघेदुखीची कारणे : आघात झाल्याने, गुडघ्यांतील हाडांची झीज झाल्यामुळे गुडघ्यांतील वंगण कमी झाल्यामुळे, गुडघ्यांतील आतील आवरणाला सूज आल्यामुळे गुडघ्यांमध्ये जंतुसंसर्ग झाल्यामुळे, गुडघ्यांमध्ये पाणी झाल्यामुळे, र्‍हुमॅटॉईड, आरथ्रॉयटीसमुळे, रक्तातील युरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे, अति स्थूलपणामुळे सातत्याने उभे राहून ताण आल्यामुळे, आदी विविध कारणांमुळे गुडघेदुखी ही तक्रार होत असते. गुडघेदुखीवर शास्त्रीय आयुर्वेदिक उपचार करताना या कारणांची निश्चिती करूनच उपचार केले जातात. प्रत्येकाची गुडघेदुखी वेगवेगळ्या कारणांमुळे असते. त्यामुळे उपचारही प्रत्येकाचे भिन्न असतात.

मणक्याच्या विकारामुळे गुडघेदुखी : 

काहीवेळा गुडघेदुखीच्या रुग्णांत कंबर फारशी दुखत नसतानादेखील एक्स-रे केल्यानंतर अथवा एमआरआय केल्यानंतर मणक्याची सूज, मणक्याची झीज, मणक्यात गॅप आलेला असणे, चकती सरकलेली असणे असे दोष आढळून येतात. ज्यामुळे कंबरेतून खाली येणार्‍या शिरांवर दाब पडत असतो व त्यामुळे गुडघेदुखी जास्त जाणवते. अशावेळी मणक्याच्या विकारावर उपचार केल्यानंतर गुडघेदुखीला आराम मिळतो, असे अनुभवास येते. त्यामुळे गुडघेदुखीवर पुरेसे उपचार करूनदेखील आराम मिळत नसल्यास एकवेळा हा मणक्याचा तर आजार नसेल ना? असे समजून मणक्याच्या तपासण्या करून घ्याव्यात.

उपचार : शास्त्रीय आयुर्वेदीय उपचार करताना पेशंटचे वय किती आहे? त्याचा व्यवसाय कोणत्या प्रकारचा आहे? पूर्वी केलेली कष्टाची कामे अथवा आघात, त्याचा दैनंदिन आहार, त्याची प्रकृती, वजन, स्थूलपणा अथवा कृशपणा तो राहतो तो प्रदेश, पाण्याशी अथवा थंडीशी असणारा संपर्क, त्याची सर्वसाधारण शरीरशक्ती, पचनशक्ती, चालू असणारा ऋतू, मानसिक अवस्था, आदींचे परीक्षण करून तसेच असणारी विविध व्यसने, शरीरातील मधुमेह किंवा रक्तदाब, आदी इतर विकार व त्यावरील चालू असणारे उपचार, ताणतणाव, गुडघेदुखीसाठी घेतले गेलेले विविध उपचार या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती घेऊन आणि नंतरच गुडघेदुखीचे कारणे निश्चित करून मगच त्यावर उपचार केले जातात.

उपचार करताना पोटातील वातशामक औषधे, स्थानिक उपचार, आहारामधील पथ्ये आणि योग्य असे व्यायाम यांचा एकाचवेळी सांघिक वापर केला जातो. होणारा उपयोगही लवकर होऊन जास्त काळ टिकणारा मिळतो.

स्थानिक उपचार : शतावरी, अश्वगंधा, दशमूळ, निर्गुडी, लसूण, एरंड, कण्हेर, प्रसारिणी, बला, सुंटी, रास्ना, आदी वातशामक औषधांनी सिद्ध केलेळ्या वेगवेगळ्या तेलांनी मसाज करणे आणि नंतर वाफेने अथवा काढ्यांनी ते अथवा तेलाने अथवा पाल्याने शेकणे, तर काही वेळा विविध वनस्पतींच्या चुर्णाचे लेप लावणे, हे स्थानिक उपचार केले जातात. गुडघ्यातील हाडांची झीज झालेली असल्यास आयुर्वेदातील बस्ती हा पंचकर्म उपचार केल्याने खूप चांगला आराम मिळतो.

पोटातील औषधे : वर सांगितलेल्या वातशामक वनस्पतीत औषधांचे काढे, घनसार आणि गुग्गुळ आणि अभ्रक, माक्षिक लीठ, गोंदती, नाग, सुवर्ण, रौप्य, कुकुटकांडत्वक, आदी भस्मे यांच्या एकत्रीकरणातून झालेल्या विविध संयुक्त गोळ्या पेशंटची प्रकृती, वय, आजाराची तीव्रता आदींचा सर्वांगीण विचार करून वापरले जातात.

आहार : आयुर्वेदिक उपचारांच्या जोडीलाच वात प्रकोप करणारा आहार टाळणे महत्त्वाचे असते. दूध, सुठ, पांढरे तीळ, बाभळीच्या डिंकाची पावडर, उडीद डाळ, आले, लसूण, मेथ्या आदींचा वैद्यांच्या सल्ल्याने उपयोग करावा. आपल्या दैनंदिन कष्टाचा विचार करून योग्य असे व्यायाम करावेत. गुडघ्याला आधार देण्यासाठी नी कॅप अवश्य वापरावी. थंड वारा गारठा, ओलेपणा, पाण्यातील काम, ए.सी., सतत उभे राहणे, जास्त चालणे यापासून गुडघ्याचे रक्षण करावे.