Sat, Sep 19, 2020 17:38होमपेज › Aarogya › फिजिओथेरपीचे महत्त्व

फिजिओथेरपीचे महत्त्व

Published On: Sep 12 2019 1:43AM | Last Updated: Sep 11 2019 9:02PM
डॉ. महेश बरामदे

कोणताही गंभीर आजार झाला की त्यातून लवकर बरे होण्यासाठी डॉक्टर फिजिओथेरेपीचा सल्ला देतात. अर्धांगवायूचा झटका आला किंवा एखादे फ्रॅक्‍चर असेल तर फिजिओथेरेपीची गरज असतेच असते. थोडक्यात, रुग्ण इस्पितळातून घरी आल्यावर त्याला लवकरात लवकर आपल्या पायांवर उभे करण्यात फिजिओथेरेपीचे योगदान मोठे असते. या फिजिओथेरेपीबद्दल जाणून घेऊ या.

आजकाल फिजिओथेरेपी हा शब्द वारंवार कानावर पडतो. आजारातून बाहेर पडलेल्या रुग्णाला लवकरात लवकर बरे करण्यासाठी फिजिओथेरेपीचा आधार घेतला जातो. अर्थात, फिजिओथेरेपीचे काम एखादी जखम झाली किंवा मान आखडली, पाय दुखतात, यातून बरे करणे एवढेच नाही तर, एकूणच तुमचे आमचे जीवन निरोगी बनवणे, हे फिजिओथेरेपीचे उद्दिष्ट असते. 

आपल्याकडे योगशास्त्र किंवा योगासने आपल्याला तंदुरुस्त राहण्यासाठी किती मदत करतात, याची आपल्याला कल्पना आहे. आजारी पडू नये म्हणून आणि आजारपणानंतरही बरे होण्यासाठी अनेक योगासनांचा उपयोग होतो. योगासने निरोगी माणसेही करतात; पण फिजिओथेरेपी रुग्णांनाच जास्त करून दिले जाते. सकृतदर्शनी फिजिओथेरेपी म्हणजे व्यायामाचेच काही प्रकार वाटतात; पण फिजिओथेरेपी हे एक शास्त्र आहे आणि त्याचे प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्‍तीकडूनच ती घेतली जाते. फिजिओथेरेपिस्टचे आधुनिक उपचार पद्धतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

फिजिओथेरेपिस्ट हा फिजिओथेरेपीमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेला तज्ज्ञ आरोग्य व्यावसायिक असतो किंवा असते. डॉक्टरांनी सांगितलेल्या उपचारांनुसार ते फिजिओथेरेपी देत असतात, याशिवाय रुग्णाच्या स्थितीचे स्वत: अवलोकन करून, त्याचे निदान करून त्या दृष्टीनेही फिजिओथेरेपी दिली जाते. रुग्णाचे योग्य ते परीक्षण केल्यानंतर कोणत्या प्रकारची फिजिओथेरेपी द्यायची, हे फिजिओथेरेपिस्ट ठरवत असतात. वेळोवेळी रुग्णाचे परीक्षण करून त्यानुसार फिजिओथेरेपीत काही बदल, सुधारणाही करतात. 

फिजिओथेरेपी सर्वात प्रथम पहिल्या महायुद्धात अस्तित्वात आली. जखमी सैनिकांचे पुनर्वसन करण्यासाठी तेव्हा याची मदत घेण्यात आली होती. प्राचीन ग्रीसमध्ये मसाज, हायड्रोथेरेपी यांच्या रूपात फिजिओथेरेपी सुरू होती. तर भारतातही प्राचीन काळापासून मसाज, शेकणे, लेप लावणे वगैरे उपायांनी फिजिओथेरेपीच एका अर्थाने प्रचलित होती. 

फिजिओथेरेपीचे प्रकार 

1. ऑर्थोपेडिक फिजिओथेरेपी ः यात हाडे, सांधे, लिगामेंट्स आणि स्नायूंना होणार्‍या दुखापतींवर ऑर्थोपेडिक फिजिओथेरेपीत लक्ष दिले जाते. आजच्या बैठ्या, तणावग्रस्त जीवनशैलीमुळे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ आणि फिजिओथेरेपिस्ट्सचे काम वाढले आहे. यातही आजाराच्या तीव्रतेनुसार दोन मुख्य प्रकार आहेत. 

अ) अल्पकालीन फिजिओथेरेपी ः यात रुग्णाला छोटी दुखापत झालेली असते. यात साधे फ्रॅक्‍चर्स, स्नायू दुखावणे असे प्रकार घडू शकतात. हे फार गंभीर नसते; पण दुर्लक्ष केले तर त्याचे स्वरूप नंतर गंभीर बनू शकते. काही काळ फिजिओथेरेपी दिल्यावर रुग्ण बरे होतात. 

ब) दीर्घकालीन फिजिओथेरेपी ः यात रूमॅटॉईड आर्थ्ररायटिस, मांडीचे हाड मोडणे, पाठीच्या कण्याला दुखापत होणे, अशा तर्‍हेचे गंभीर आजार किंवा दुखापतींचा समावेश होतो. रुग्णाला हालचाल करता येत नाही. अशा रुग्णांना दीर्घ काळ फिजिओथेरेपीची गरज असते. 

2. न्यूरॉलॉजिकल फिजिओथेरेपी ः 
मेंदूच्या अनेक आजारांमध्ये नियमित फिजिओथेरेपीची गरज असते. मेंदू, पाठीचा कणा किंवा मज्जासंस्थेला दुखापत झाली असेल तर त्यासाठी दीर्घकालीन फिजिओथेरेपीची गरज असते. तीव्र तणाव, भीती, विशिष्ट प्रकारचे संसर्ग, काही दोष, जीवनसत्त्व वगैरेच्या अभावामुळे होणारे आजार अशा प्रकारच्या आजारांतून बाहेर पडण्यासाठी फिजिओथेरेपीची मतद होते. 
स्नायूंचा पॅरालेसिस मग तो हेमीप्लेजिया असो वा टेट्राप्लेजिया, यावर फिजिओथेरेपी उपयुक्‍त ठरते. याचबरोबर अ‍ॅटाक्सिया, वर्टिगो, पार्किन्सन्समुळे येणारा ताठरपणा, कंप वगैरेसाठी फिजिओथेरेपी गुणकारी ठरत आहे. या सगळ्यासाठी दीर्घकालीन फिजिओथेरेपी आवश्यक असते. 

3. जेरियाट्रिक फिजिओथेरेपी
याला आपण वृद्धांसाठीची फिजिओथेरेपी म्हणू शकतो. वयाच्या 65 व्या वर्षानंतर वृद्धांमध्ये हाडांशी आणि मेंदूशी निगडित आजार उद्भवतात. तेव्हा त्यांची विशेष काळजी घ्यावी लागते. या वयात शरीराचे संतुलन राखता न आल्याने पडण्याचे आणि त्यामुळे हाडे मोडण्याचे प्रमाण वाढत असते. हे सगळे लक्षात ठेवून फिजिओथेरेपिस्ट या वयोगटातील लोकांना शरीराचे संतुलन राखण्याचे वेगवेगळे व्यायाम करायला शिकवतात. 

4. कार्डिओपुल्मोनरी फिजिओथेरेपी
या रुग्णांना सीओपीडी, ब्राँकाईल अस्थमा, फुफ्फुसांची ेसमस्या, हृदयविकार, न्यूमोनिया, किडनी प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रिया झालेले रुग्ण यांना फिजिओथेरेपीची आवश्यकता असते. 

3. बाल फिजिओथेरेपी
पोलिओ, सेरेब्रल पाल्सी यासारखे विकार असलेल्या मुलांना दीर्घ काळ फिजिओथेरेपी दिली जाते. यामुळे मुलांचे स्नायू बळकट होतात, ती स्वतंत्रपणे वावरू लागतात. 

फिजिओथेरेपीचे महत्त्व ः 

अलीकडच्या काळात फिजिओथेरेपीचे महत्त्व खूप वाढले आहे. रुग्णांना आजारातून बरे वाटल्यानंतरही बळकटी यावी यासाठी याचा उपयोग होतो. अनेक गोष्टींमध्ये फिजिओथेरेपीची मदत होते. 
फ्रोजन शोल्डर, संधिवात, स्नायू फाटणे, टेंडोनायटिस यासारख्या आजारांमध्ये खूप वेदना होतात. फिजिओथेरेपीमुळे वेदना कमी होण्यास मदत होते. अल्ट्रासाउंड, टेन्स, आयएफटी, वॅक्स बाथ अशा विविध उपायांनी वेदना कमी केल्या जातात. 

हाड फ्रॅक्‍चर झाल्यावर प्लास्टर घातले जाते. ते जुळल्यानंतर प्लास्टर काढले जाते; पण खूप वेळा प्लास्टर काढल्यानंतर फ्रॅक्‍चर झालेल्या ठिकाणी ताठरपणा येतो आणि त्याची हालचाल नीट होत नाही. त्यावेळी सांधे, स्नायू लवचीक होण्यासाठी फिजिओथेरेपी दिली जाते. 

शस्त्रक्रिया झाल्यानंतर आणि शस्त्रक्रिया होण्यापूर्वीही स्नायू बळकट करण्यासाठी फिजिओथेरेपीची आवश्यकता असते. गुडघे, मांडीच्या हाडांची शस्त्रक्रिया, फ्रोजन शोल्डर, लिगामेंट दुरुस्ती शस्त्रक्रिया वगैरेमध्ये शस्त्रक्रियेपूर्वी फिजिओथेरेपी दिली जाते. याशिवाय, अर्धांगवायूचा झटका आलेल्या रुग्णांना, मधुमेह, हृदयविकार असलेल्या रुग्णांना, खेळताना दुखापत झाल्यास, वृद्धापकाळात शरीराचे संतुलन राखता यावे यासाठी अशा विविध कारणांसाठी फिजिओथेरेपी दिली जाते. थोडक्यात, आधुनिक काळात फिजिओथेरेपी हे उपचाराचे एक अत्यंत महत्त्वाचे माध्यम आहे.