Wed, May 12, 2021 01:39
कोव्हिडनंतर हृदयविकाराची समस्या?

Last Updated: Apr 29 2021 2:44AM

डॉ. प्रमोद नरखेडे

पोस्ट कोव्हिड रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित अडचणींमध्ये तीव्र वाढ झाल्याचे दिसून येते. 50 वर्षांवरील वयोगटामध्ये श्‍वासोच्छवासाची समस्या, छातीत दुखणे, अचानक धडधडणे (एरिथिमियस, विकृती) यासह दीर्घकालीन हृदयाचा त्रास होतो. हृदयाचा ठोका, जळजळ होण्याचे प्रमाण वाढणे आणि पोस्ट कोव्हिड कालावधीत हृदयविकाराचा झटका, हृदयाची पंपिंग क्षमता कमी-अधिक होणे आदी समस्या दिसून येतात. हृदयविकाराच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊन गुंतागुंत आणखी वाढू शकते.

कोव्हिडनंतरच्या काळात रुग्णाने नियमितपणे आपली हृदय तपासणी करणे अतिशय आवश्यक आहे. कोरोना व्हायरस हा केवळ आपल्या फुफ्फुसांवर, मेंदूवरच नव्हे, तर हृदयावर देखील परिणाम करत आहे. एका 45 वर्षीय व्यक्तीला कोरोना संसर्ग झाल्यानंतर एका महिन्याने छातीत दुखणे आणि श्‍वास लागणे आदी समस्या उद्भवू लागल्या आणि त्यानंतर त्या व्यक्‍तीने उपचाराकरिता रुग्णालयात धाव घेतली. तपासणीदरम्यान करण्यात आलेल्या ईसीजी चाचणीत हृदयविकाराच्या झटक्याने या व्यक्‍तीला अशा प्रकारची समस्या उद्भवत असल्याचे दिसून आले. त्या व्यक्‍तीने अ‍ॅस्पिरीन घेणे बंद केले होते. त्याच्या इकोकार्डिओग्राफीने हृदयाच्या कार्याची चाचणी करण्यात आली. त्या रुग्णावर त्वरित उपचार करून त्याची एंजिओप्लास्टी करण्यात आली. रुग्णाच्या दोन्ही धमन्यांवर यशस्वीरीत्या अँजिओप्लास्टी करून 2 दिवस रुग्णाला अतिदक्षता विभागात देखरेखेखाली ठेवण्यात आले. त्यानंतर रुग्णाला घरी सोडण्यात आले. त्याच्यासारखे बरेच रुग्ण आहेत, ज्यांना अशा प्रकारे कोव्हिड बरे झाल्यानंतर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर न्युमोनिया आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे 30 ते 50 वर्षे वयोगटातील रुग्णाला श्‍वास घेण्यात अडचणी, दम लागणे आणि खोकला तसेच हृदयाच्या समस्या दिसून आल्या. कोव्हिडची लागण होण्यापूर्वी निरोगी असलेल्या व्यक्‍तींमध्येही गंभीर प्रकारची पोस्ट कोव्हिड लक्षणे, हृदयासंबंधी विकार आदी समस्या दिसून येऊ लागल्या आहेत. यामध्ये उच्च रक्‍तदाब, किरकोळ पॅल्पिटेशन, गंभीर जीवघेणा एरिथमिया, हृदयविकाराचा झटका, हार्ट फेल्युअर, तीव्र फुफ्फुसीय रोग होण्यापर्यंतचा धोका असू शकतो.

कोव्हिड संसर्गातून बरे झाल्यानंतर दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये अशा समस्या दिसून येतात. रुग्णालयात येणार्‍या 10 पैकी 5 रुग्णांना हृदयासंबंधी तक्रारी उद्भवत असल्याचे दिसून येते. ज्यांना आधीच हृदयाच्या समस्या आहेत, त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

हृदयाचे नुकसान होण्यामागील कारण एखाद्याच्या शरीरात पसरलेला संसर्ग ज्यामुळे हृदयासह काही निरोगी उतींचे नुकसान होते. कोव्हिड संसर्गामुळे रक्‍तवाहिन्या आणि हृदयाच्या स्नायूंवर विपरीत परिणाम होतात. ज्यामुळे हृदय आणि शरीराच्या इतर भागात रक्‍तप्रवाहास अडथळे निर्माण होतात. चक्कर येणे, डोकेदुखी होणे, अचानक धडधडणे, उच्च रक्‍तदाब, उलट्या होणे, घाम येणे आणि श्‍वास लागणे, छातीत दुखणे यासारखे लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लवकर निदान आणि त्वरित उपचार  हे मृत्यू दर कमी करण्यास मदत करेल. आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी, फायबर आणि प्रथिनेयुक्त आहार घ्या. ताजी फळे, भाज्या, धान्य, शेंगदाणे, आणि डाळी यांचे सेवन करा. मसालेदार, तेलकट, प्रक्रिया केलेले किंवा जंकफूड खाऊ नका. उच्च रक्‍तदाब आणि कोलेस्ट्रॉलचे नियमितपणे परीक्षण करून त्याचे योग्य व्यवस्थापन करा.

दररोज व्यायाम करा, योग्य वजन राखा, अल्कोहोल आणि धूम्रपानचे सेवन करणे टाळा. कोव्हिडनंतर हृदयाच्या कार्यप्रणालीवर नजर ठेवण्यासाठी रुग्णांनी ईसीजी, इकोसारख्या हृदयाच्या तपासण्या करून घ्यायला हव्यात.