Mon, Aug 03, 2020 14:18होमपेज › Aarogya › पाय मुरगळल्यास...

पाय मुरगळल्यास...

Published On: Sep 12 2019 1:43AM | Last Updated: Sep 12 2019 1:43AM
मिलिंद सोलापूरकर

पाय मुरगळल्यावर आपल्याला मोठ्या वेदना होतात. या वेदना सहन झाल्या नाहीत तर  सहन होत नाहीत. या दुखण्यावर काही घरगुती उपचार करता येतात. 

खेळताना अथवा अन्य कारणाने पाय मुरगळल्यावर कमालीच्या वेदना होतात. या वेदना काही वेळा सहन करण्यापलीकडे जातात. पाय मुरगळल्यानंतर उपचाराकरिता डॉक्टरांकडे जाण्याचे त्राणही अनेकांमध्ये राहत नाही. या दुखण्यावर काही घरगुती उपचार करता येतात. सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे, संपूर्ण विश्रांती घेणे. पाय मुरगळल्यानंतर आपल्याला हालचाली करणे अवघड जाते, अशा स्थितीत शक्य तेवढ्या कमी हालचाली करा. आपण हालचाल करत राहिलो तर पायावर आणखी ताण पडत जाईल. 

पाय मुरगळल्यानंतर लगेचच त्या जागेवर बर्फाने शेक द्यावा. बर्फाने शेक दिल्यास तो भाग सुजत नाही. वेदना होत असतील तर एक दोन तासांनी 15-20 मिनिटे इतक्या काळाकरिता बर्फाचा शेक त्या भागावर देणे. बर्फ एखाद्या कापडात गुंडाळून तो दुखर्‍या भागावर फिरवावा. जो भाग मुरगळला आहे, त्या भागाला बँडेज किंवा पट्टी बांधणे आवश्यक असते. बँडेज बांधण्याने पायाचा रक्‍तप्रवाहही सुरळीत राहण्यास मदत होते. मात्र, त्या जागेला फडके किंवा बँडेज बांधताना घट्ट बांधू नका. हलक्या हाताने फडक्याचा बँडेज बांधा. 

झोपताना पायाखाली तक्क्या, जाड उशी घेऊन झोपा. तसे झाल्याने आपला पाय उंचीवर राहील आणि एका जागेवर रक्‍त जमा होणार नाही. या प्रकाराने पायाला आलेली सूज कमी होण्यास मदत होते. 
मुरगळलेल्या भागावर हळदीचा लेप लावण्यानेही सूज कमी होते. हळदीमध्ये असलेले अँटिसेप्टिक गुणधर्म पायाला आलेली सूज कमी करण्यास उपयुक्‍त ठरतात. दोन चमचे हळद घेऊन त्यात थोडे पाणी टाकावे आणि ती पेस्ट थोडी गरम करावी आणि मगच जखमेवर लावावी. दोन तासांनी हा लेप गरम पाण्याने धुवून काढावा. त्याचबरोबर मध आणि चुना एकत्र करून त्याने पायाला मालिश करावे. सलग काही दिवस या पद्धतीने मालिश केल्यास वेदना कमी होतील. 

मुरगळलेल्या भागावर कोरफडीचा गर किंवा कोरफड जेल लावल्यास त्यामुळेही आपल्याला आराम मिळतो. मोहरीचे तेल लावल्यानेही वेदना कमी होण्यास मदत होते. मीठ आणि मोहरीचे तेल गरम करून ते मुरगळलेल्या भागावर लावावे आणि तो भाग मऊ कापडाने बांधून झोपी जावे. तुळशीच्या पानांचा रस दुखर्‍या भागावर लावल्यास आराम मिळतो. त्याचबरोबर एक चमचा ब्लॅक कॉफी घेऊन ती बँडेजवर ठेवावी आणि ते बँडेज दुखर्‍या भागावर लावावे. तसेच कोबीची पाने पाण्यात भिजवून घ्यावीत आणि ती मुरगळलेल्या पायावर ठेवावीत. दहा ते पंधरा मिनिटांकरिता ही पाने दुखर्‍या भागावर लावल्यास वेदना कमी होतात. 

त्याचबरोबर गरम पाण्यात लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब टाका आणि ते पाणी दुखर्‍या भागावर लावा. कांद्याचे तुकडे करून एका पातळ कपड्यात गुंडाळा आणि ते कापड मुरगळलेल्या भागावर बांधा. सूर्यफुलाच्या तेलाद्वारेही मुरगळलेल्या पायाच्या वेदना कमी करता येतात. एक कप सूर्यफूल तेल घ्यावे, त्यात एक चमचा कापराचे तेल घालून त्या मिश्रणाने मुरगळलेल्या भागावर हलक्या हाताने मसाज करावा. दररोज दोन वेळेला या पद्धतीने मसाज केल्यास सूज कमी होते आणि वेदनाही कमी होतात. पाय मुरगळल्यावर भरपूर अननस खाल्ल्यानेही वेदना कमी होतात, तसेच सूजही कमी होते. मात्र, अननस खाताना तो ताजा असला पाहिजे, याची खात्री करून घ्या. त्याचबरोबर अननसाचा ज्युस पितानाही तो ताजा आहे का, हे विचारून घ्या. 

सैंधव मीठ गरम पाण्यात टाकून त्याने दुखर्‍या भागावर मसाज केल्यास आराम मिळतो. गरम दुधात दोन चमचे हळद टाकून दिवसातून दोन वेळा घेतल्यास पायाच्या वेदना कमी झाल्याचा अनुभव येईल. एक चमचा मध आणि एक चमचा लिंबाचा रस असे मिश्रण तयार करून त्याने दुखर्‍या भागावर मसाज करावा. लिंबाची पाने आणि लोणी एकत्र वाटून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट दुखर्‍या भागावर लावावी. 

पाय मुरगळल्यावर आपल्याला काहीच हालचाली करता येत नाहीत. या घरगुती उपचारांमुळे आपल्याला थोड्या प्रमाणात आराम मिळेल. आराम मिळाल्यानंतर डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावेत. पाय मुरगळण्याचे प्रकार खेळाडूंमध्ये, लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. उंच टाचांच्या चपला वापरणार्‍या महिलांचा पाय अनेक वेळा मुरगळतो. त्यामुळेच अशा चपला न वापरण्याचा सल्‍ला दिला जातो. चालताना पाय अचानक खड्ड्यात गेल्यास पाय मुरगळतो. तसेच एखादी जड वस्तू उचलतना, व्यायाम करताना पाय मुरगळतो. यावर उपचरा करीत असताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते. केवळ वेदनाशामक गोळ्या घेऊन वेदना कमी होत नाहीत. तसेच सूजही कमी होत नाही. 

मुरगळलेल्या पायावर वेळीच उपचार केले नाहीत तर हे दुखणे वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच डॉक्टरांकडून या दुखण्यावर तातडीने उपचार करून घ्यावेत. अनेकदा उडी मारताना आपल्या पायावर शरीराचा भार पडतो. त्यामुळेही पाय मुरगळतो. पाय मुरगळल्यावर त्याचा एक्स-रे काढून घ्या. एक्स-रेमध्ये फ्रॅक्चर आहे की नाही, हे कळू शकते. आपला पाय कोणत्या पद्धतीने मुरगळला हे डॉक्टरांना व्यवस्थित सांगितले पाहिजे. 

एक्स-रेमध्ये फॅ्रक्चर नसेल तर त्यावर उपचार करणे सोपे जाते. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर आपल्या पायावर अधिक भार पडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी चालण्याकरिता व्हिलचेअरचा वापर करणे संयुक्‍तिक ठरते. संपूर्ण विश्रांती घेतली तर उत्तमच. मात्र, ज्यांना विश्रांती घेणे शक्य नाही, त्यांनी दुखर्‍या पायावर कमीत कमी वजन कसे पडेल याची दक्षता घ्यायला हवी. 

डॉक्टरांकडून दिल्या जाणार्‍या गोळ्या नियमित घेतल्या पाहिजेत. पाय मुरगळल्यावर त्यावर लावण्यासाठी अनेक आयुर्वेदिक लेप बाजारात उपलब्ध आहेत. त्याचाही वापर करा. सूज कमी झाल्यावर लगेचच चालण्याची घाई करू नका. काही दिवसांनी पूर्ण सूज ओसरेल, मगच त्या पायाने चालणे सुरू करा. सूज पूर्णपणे उतरलेली नसताना चालल्यास आपल्याला कमालीच्या वेदना होतील. वेदनाशामक गोळ्यांनी काही वेळ वेदना थांबवतात. त्यामुळे आता पाय दुखणार नाही, अशी समजूत करून घेऊ नका. सूज पूर्णपणे उतरून पाय पूर्ववत होईपर्यंत चालणे टाळले पाहिजे.