Fri, Apr 23, 2021 13:43
अतिलठ्ठ व्यक्तींना कोरोनाचा धोका अधिक, अभ्यासातून स्पष्ट

Last Updated: Apr 06 2021 12:00PM

file photo
वॉशिंग्टन : पुढारी ऑनलाईन

अतिलठ्ठपणा हा अत्यंत गंभीर आजार असल्याचे वैद्यकशास्त्राने याआधीच स्पष्ट केले आहे. लठ्ठपणामुळे हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह हे आजार वाढतात. आता अतिलठ्ठ व्यक्तींमध्ये कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे मृत्यू होण्याचा धोका वाढत असल्याचे नवीन एका अभ्यासात आढळून आले आहे. अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेशन संस्थेने याबाबत संशोधन केले आहे. अतिलठ्ठ व्यक्तींना कोरोनाचा धोका वाढत असल्याचे त्यात म्हटले आहे.

वाचा : पनीरचे फायदे माहीत आहे का?

बीएमआय म्हणजेच, बॉडी मास इंडेक्स. हा माणसाची उंची आणि वजन यांच्यातील प्रमाण सांगणारा निर्देशांक आहे. योग्य प्रमाणात बीएमआय असणे हे चांगल्या आरोग्याचे लक्षण मानले जाते. सामान्यपणे १८.५ ते २४.९ हा बीएमआय नॉर्मल समजला जातो. पण ज्यांचा बीएमआय ४५ आणि त्याहून अधिक असतो ते अतिलठ्ठ समजले जातात. त्यांना इतरांपेक्षा आजारपणाचा धोका ३३ टक्के अधिक असू शकतो आणि नॉर्मल वजन असलेल्यांपेक्षा ६१ टक्के मृत्यूचा धोका होण्याची शक्यता अधिक असते, असेही संशोधनात आढळून आले आहे.

वाचा : चक्‍कर येतेय? तर मग काय काळजी घ्यावी?

ज्या अतिलठ्ठ व्यक्ती कोरोनामुळे आजारी आहेत त्यांची विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचा सल्ला देण्यात आला आहे. कमी वजन असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना देखील इतरांपेक्षा अधिक धोका असल्याचे अभ्यास अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या संशोधनासाठी अमेरिकेतील रुग्णांलयामध्ये गेल्या वर्षी मार्च ते डिसेंबरमध्ये कोरोनाचे निदान झालेल्या आणि उपचार घेतलेल्या १ लाख ४८ हजार ४९४ प्रौढ रुग्णांच्या डाटाबेसचा अभ्यास करण्यात आला. संशोधन करणाऱ्या टीमने प्रत्येक रुग्णाचा बीएमआय तपासून पाहिला आणि त्यातून बीएमआय आणि त्याचे शरिरावरील परिणाम याचा संबंध शोधला.

वाचा : उन्हाळ्यात का खावे कलिंगड, जाणून घ्या फायदे

ज्या रुग्णाचा बीएमआय ३० आणि त्याहून अधिक आहे त्यांना आजारपणाचा आणि मृत्यूचा धोका अधिक उद्भवू शकतो. ज्यांचा बीएमआय ३० ते ३४.९ दरम्यान आहे त्यांना केवळ ७ टक्केच आजारपणाचा धोका आहे. तर इतरांपेक्षा मृत्यूचा धोका ८ टक्क्यांनी अधिक आहे. बीएमआय वाढला की आजारपणाचा धोकाही वाढतो, असे अभ्यास अहवालात आढळून आले आहे.

दरम्यान, यापूर्वीच्या अभ्यासात प्रौढ व्यक्तींचा लठ्ठपणा आणि कोरोनाचा काही संबंध असल्याचे आढळून आले नव्हते. 

वाचा : मूळव्याध की कोलोरेक्टल कॅन्सर?