Sun, Jan 17, 2021 06:00
डिहायड्रेशन आणि  मधुमेहाचा त्रास

Last Updated: Jan 13 2021 10:21PM
डॉ. सुहास एरंडे 

आपले ‘आरोग्य हीच संपत्ती’ आहे; पण त्याचं व्यवस्थापन करणं अधिक अवघड आहे. बर्‍याचदा, आपण स्वतःची सर्वोत्तम काळजी घेण्याचा प्रयत्न केला तरी आपण दिवसातील महत्त्वाच्या आहाराच्या वेळा पाळत नाही, अनेक रात्री झोपेविना जातात, आपल्या शरीराला आवश्यक असलेला दैनंदिन शारीरिक व्यायाम आपण चुकवतो आणि आपल्या शरीराच्या हायड्रेशनच्या गरजेकडं दुर्लक्ष करतो. 

संपूर्ण दिवसभरात स्वतःला हायड्रेट न करता आपण दीर्घकालीन जीवनशैलीसंबंधी आजारांचा खजिनाच आपल्यासाठी एकप्रकारे खुला करत असतो.

मानवी शरीर हे 60 टक्के पाण्याने बनलेले असते आणि आपल्या मेंदूमध्ये जवळपास 75 टक्के पाणी असते. म्हणूनच, मानवी शरीर कार्यरत राहणे, चयापचय सक्रिय राखणे, आणि मेंदूमधील सामान्य बौद्धिक कार्ये टिकवून ठेवण्यासाठी हायड्रेशन अतिशय महत्त्वाचे असते. 

डिहायड्रेशनमुळे आपल्या शरीरात याहून गंभीर समस्या निर्माण होत असतात. डिहायड्रेशन हा रक्तातील उच्च शर्करेबाबत शरीराला मिळालेला इशारा देखील असू शकतो. जीवनशैलीशी निगडीत या दीर्घकालीन आजारांमुळे अनेक गंभीर समस्यांचा जन्म होऊ शकतो; पण डिहायड्रेशनमुळे मधुमेहावर होणारे परिणाम उलगडण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, सर्वप्रथम सामान्य मानवी शरीर आणि मेंदूवर होणारे त्याचे परिणाम समजून घेऊया.

हायड्रेशन, मधुमेह आणि अति तहान लागणे 

अभ्यासांमधून मिळणार्‍या अधिकाधिक पुराव्यातून दिसून आलं आहे की हायड्रेशनचा सौम्य अभाव असेल तर बौद्धिक कार्यांमध्ये बिघाड होतो. उदाहरणार्थ, जेव्हा खेळाडूंमध्ये बॉडी मासच्या 2 टक्क्यांहून अधिक डिहायड्रेशन होते, (सोबत उष्णता, व्यायाम इ. मुळे द्रवाचा अभाव) तेव्हा आल्पकालीन स्मृतीतील घट, गणितीय अकार्यक्षमता, शरीराच्या हालचालींमधील समन्वय आणि गतीवर परिणाम, थकवा आणि चिंता अनुभवाला येऊ शकतात. या स्थितीला ब्रेन फॉग असे सर्वसामान्यतः म्हटले जाते.

अतितहान लागणे हे दोन्ही प्रकारच्या मधुमेहांचे (टाईप 1 आणि 2) सामायिक लक्षण आहे. परंतु, तुम्हाला मधुमेहाची समस्या आहे किंवा तुम्हाला केवळ अधिक हायड्रेट करण्याची गरज आहे हे तुम्हाला कळणे गरजेचे आहे.

वैद्यकीय तज्ज्ञ आणि अधिकारी दररोज किमान 2 ते 2.5 लिटर पाणी पिण्याची शिफारस करतात. आपल्या शरीरातून घाम, लघवी, श्वास इ. द्वारे सातत्याने पाणी निघून जात असते, तेव्हा हा पाणी साठा जास्त भरलेला राखणे महत्त्वाचे असते. आपल्या मेंदूतील रिसेप्टर्स वॅसोप्रेसिन नावाचा एक हॉर्मोन स्त्रवून रक्ताचे सातत्य देखील मोजत असतात. यामुळे मूत्रपिंडांमधील पाणी टिकवून ठेवण्यात मदत होते आणि तहानेची भावना निर्माण होते. आता, डिहायड्रेशनमुळे आपल्याला लघवीला कमी लागते, त्यामुळे रक्तातील अतिरिक्त साखर आणि टाकाऊ पदार्थ लघवीद्वारे बाहेर टाकण्यापासून शरीरास रोखले जाते. असे घडते तेव्हा, रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. तुम्हाला मधुमेहाची लागण झाली असेल किंवा मधुमेही असाल तर तुम्हाला उलटी, अतिसार, मळमळ इ. समस्या देखील होण्यास सुरुवात होते. या तिन्ही समस्यांमुळे इलेक्ट्रोलाईट आणि पाण्याचे असंतुलन होऊ शकते. 

इशार्‍याकडे दुर्लक्ष नको!

आपल्यापैकी बहुतांश जण फारसा शारीरिक व्यायाम न करता घरीच असतात, हे लक्षात घेता, आणि प्रसंगी कॅफेईन आणि भरपूर साखर घातलेली कॉफी, एनर्जी ड्रिंक, गोड सोडा किंवा इतर पदार्थ त्याच प्रमाणात घेत असाल तर, मधुमेहाच्या इशार्‍याकडे आपले सहजपणे दुर्लक्ष होऊ शकते. 

तुमचे शरीर तहान लागण्याच्या साध्या कृतीद्वारे असे अत्यावश्यक संदेश पाठवत असेल तर, कॅफेईनचे सेवन कमी करणे, नियमितपणे द्रवपदार्थ पिण्यासाठी आठवण करून देणे आणि शरीरातील समतोल राखण्यासाठी इलेक्ट्रोलाईटस्चे सेवन करण्याची गरज असते. चेता पेशी आणि स्नायूंचे आकुंचन नियमित करणे, आम्लपित्त आणि दाबाचे व्यवस्थापन करणे, हानीग्रस्त ऊतींची पुन्हा निर्मिती आणि बरेच काही करण्यात इलेक्ट्रोलाईटचे संतुलन अत्यंत आवश्यक आहे!

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे केवळ पाणीच प्यायले पाहिजे असे नाही. असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे आरोग्यदायक, हायड्रेट करणारे आहेत, आणि तुमच्या जिभेला देखील सुखावणारे असतात ते म्हणजे नारळाच्या पाण्यापासून ते साखर-विरहित इलेक्ट्रोलाईट ड्रिंक्सपर्यंत, आपल्यासाठी हायड्रेशनचे अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. म्हणूनच कोणताही हलगर्जीपणा न करता शरीराच्या संदेशांकडे दुर्लक्ष करू नका.