Mon, Jan 25, 2021 15:08होमपेज › Aarogya › अतिरक्‍तस्त्राव रोखण्यासाठी...

अतिरक्‍तस्त्राव रोखण्यासाठी...

Last Updated: Nov 07 2019 2:06AM
डॉ. प्राजक्‍ता पाटील

इजा झाल्यावर रक्‍त येणारच, पण खूप जास्त वेळ रक्‍त वाहतच राहिले तर घाबरायला होणारच; पण घाबरून जाऊ नका, काही साध्या परिणामकारक घरगुती उपायांनी रक्‍तस्त्राव त्वरित बंद होऊ शकतो. 

इजा होणे ही काही मोठी गोष्ट नाही, पण इजा झाल्यानंतर वाहणारे रक्‍त योग्य पद्धतीने न थांबवता आल्यास मात्र ही जखम संसर्गाचे कारण ठरू शकते. आपल्याला जेव्हा जखम होते तेव्हा आपण ती पाण्याखाली धरतो किंवा त्यावर पट्टी बांधतो, पण अगदी लहानशा जखमेतून रक्‍त वाहत राहिलं तर ते थांबवणे कठीण नाही. घरगुती उपायांनी ते सहजपणे नियंत्रणात आणता येते; पण जखम खोल असेल तर मात्र डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. हलक्या जखमेतून निघणारे रक्‍त कसे रोखता येते पाहूया.

* हळद लावा : हळद हा घटक नैसर्गिक जीवाणूरोधक आहे. रक्‍त वाहत असताना त्यावर हळद लावली तर रक्‍त थांबतेच; पण जखम भरून येण्यासही मदत होते. जखम झाली की ती स्वच्छ करून त्यावर हळद लावावी. त्यामुळे रक्‍त वाहणे बंद होईलच; परंतु संसर्ग होण्याचा धोकाही राहणार नाही. 

* कॉफी पावडर : कॉफी हा पेय पदार्थ आहेच, पण रक्‍त थांबवण्याचे गुणही कॉफीमध्ये असतात. कॉफीमध्ये अ‍ॅस्ट्रीजंट सारखे गुण असतात. त्यामुळे जखम लवकर भरून येण्यासही मदत होते. मग आता कधी जखम झाल्यास त्यावर कॉफी पावडरही लावू शकता. त्यामुळे रक्‍त वाहणे बंद होईल. 

* टी बॅग : गरम पाणी असेल आणि टी बॅग असेल तर कुठेही चहा तयार करून पिऊ शकतो, पण टी बॅगचा रक्‍त थांबवण्यासाठीही उपयोग होतो हे तुम्हाला माहीत नसेल. जखम झाली तर थंड पाण्यात टी बॅग बुडवून ठेवा. मग जखमेवर ती टी बॅग ठेवून हाताने दाबा. त्यामुळे रक्‍त वाहणे त्वरित बंद होईल. 

* टूथपेस्ट लावावी : टूथपेस्ट केवळ दात स्वच्छ करण्यासाठीच नव्हे तर इतरही काही गोष्टींमध्ये करता येतो. जखम झाल्यानंतर वाहणार्‍या रक्‍तावर टूथपेस्ट लावल्यास रक्‍त वाहणे बंद होते. एवढेच नव्हे तर जखमेवर टूथपेस्ट लावल्याने ती लवकर बरी होते. पुन्हा काही जखम झाली तर त्यावर टूथपेस्ट लावावी. 

* बर्फाचे तुकडे : वाहणारे रक्‍त गुठळी झाल्याशिवाय थांबत नाही. रक्‍ताची गुठळी तेव्हाच होते जेव्हा त्याला थंडावा मिळतो. त्यासाठी बर्फाचा वापर करावा. जखम झाल्यानंतर रक्‍त येत असेल त्यावर बर्फ लावावा त्यामुळे वाहणारे रक्‍त बंद होते.