Tue, Jun 15, 2021 12:44



होमपेज › Aarogya › कुठेही थुंकण्यापूर्वी विचार करा

कुठेही थुंकण्यापूर्वी विचार करा

Last Updated: Jul 29 2020 8:25PM




डॉ. प्रतिभा पाटणकर   

पुन्हा लॉकडाऊन सुरू होणार होता म्हणून खरेदीसाठी एका दुकानात गेले. अर्थात, तोंडावर मास्क होताच व भौतिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग हा शब्द पटत नाही म्हणून फिजिकल डिस्टन्सिंगचा अर्थ भौतिक अंतर) राखण्यासाठी ग्राहकांना उभारण्यासाठी चौकोन आखून दिले होते. गर्दीसुद्धा तशी बरीच होती. त्या दुकानातील एक व्यक्ती बाहेर आली व तोंडावरचे मास्क काढून पचकन थुंकून आत गेली. इतके किळसवाणे वाटले! जर तुम्हाला पान, तंबाखू, मावा खायचाच होता तर ते थुंकायचे कशाला? गिळून टाकायचं न? खरंच काहींना थुंकणे म्हणजे भूषणावह वाटते! लोकांना रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची का इतकी धन्यता वाटते?

क्रिकेट, फुटबॉलसारखे प्रतिष्ठेचे खेळ खेळतानादेखील खेळाडू मैदानावर थुंकतात. क्रिकेटमध्ये, तर चेंडूला थुंकी लावलेले पहिले की कसे तरीच वाटते. ही सवय त्यांच्या या  खेळाचा भाग आहे की काय, असा प्रश्न पडतो.

रस्त्यावर थुंकण्याच्या विरुद्ध जगभर काही चळवळी आहेत. आकाशवाणीवर दररोज वैद्यकीय  अधिकारी न थुंकण्याबद्दल प्रबोधन करतात, तसेच सामाजिक माध्यमांद्वारे देखील लोकांना आवाहन केले जाते; पण लोकांना त्याचे काहीच वाटत नाही. काही वर्षांपूर्वी बँका, टपाल कार्यालये यासारख्या अनेक सार्वजनिक सुविधा केंद्रांच्या भिंतीवर पिचकार्‍या मारून रंगवलेल्या दिसत असे. त्याच्या प्रतिबंधासाठी अशा भिंती स्वच्छ करून त्याजागी देव-देवतांची चित्रे लावली गेली; पण थुंकीबहाद्दारांनी त्या जागीसुद्धा घाण केलीच. 

सुरुवातीला क्षयरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रस्त्यांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याविरुद्ध चळवळी उभ्या राहिल्या. क्षय रोगाचंच काय; पण असे अनेक आजार आहेत जे थुंकीद्वारे पसरतात, ज्याच्यामुळे समाजाचे आरोग्य धोक्यात येते. आता कोव्हिड-19 ने तर जागतिक महामारीचे थैमानच घातले आहे. यावर औषध, लस जेव्हा येईल तेव्हा येईलच; पण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून  समाजातील प्रत्येक व्यक्तीने थुंकण्याविरुद्ध भान ठेवलेच पाहिजे. इथे प्रत्येक व्यक्तीला अशा अर्थाने की सर्वच व्यक्ती रस्त्यावर थुंकतातच असे नाही; पण त्या व्यक्ती असे किळसवाणे कृत्ये करतात त्यांचे फोटो काढणे, त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. वेळप्रसंगी अशा लोकांना कायद्याचा धाक दाखवलाच पाहिजे. या कारणाने का होईना कोव्हिड-19 सारख्या अनेक विषाणूजन्य रोगांचा समूह संसर्ग रोखता येईल. मास्क लावणे, व्यक्ती-व्यक्तींमध्ये भौतिक अंतर ठेवणे एवढेच पुरेसे नाही, तर आपले व सभोवतालच्या लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी रस्त्यावर व इतर सार्वजनिक ठिकाणी लोकांना थुंकण्यापासून परावृत्त करायला हवे. स्वच्छता ही राखायलाच हवी. कोव्हिड-19 च्या संशोधनामध्ये असे स्पष्ट झाले, की हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या थुंकीमध्ये 24 तास असतो. अशी थुंकी जर रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी पडली व निरोगी माणसाच्या कपड्यांना, चपलांना किंवा इतर वस्तूंना स्पर्श झाली, तर निरोगी माणूसदेखील संक्रमित होऊ शकतो. 

सामाजिक व सार्वजनिक आरोग्य चांगले राखण्यासाठी थुंकण्याविरूद्ध चळवळ करणे एक प्रभावी  मार्ग आहे. रस्त्यावर बोलताना, चालताना, गाडी चालवताना त्यातून बाहेर डोकावून थुंकणे म्हणजे रस्ता हा स्वतःचे बाथरूम अथवा वॅाशबेसिन असल्याच्या आविर्भावात लोक वागतात. अनेक श्वसनाचे आजार थुंकीद्वारे पसरतात म्हणूनच आता प्रत्येक व्यक्तीने काळजी घेणे काळाची गरज  आहे.