Sat, Oct 31, 2020 12:59होमपेज › Aarogya › गंभीर रूग्णांसाठी भूलतज्ज्ञांचे वरदान

गंभीर रूग्णांसाठी भूलतज्ज्ञांचे वरदान

Last Updated: Oct 14 2020 8:38PM
डॉ. आरती घोरपडे

16 ऑक्टोबर हा जागतिक भूलशास्त्र दिन म्हणून पूर्ण जगभर साजरा केला जातो. रुग्णाला तातडीच्या वेळी कृत्रिम श्वास देणे, नंतर तो सामान्य ठेवणे, ऑक्सिजनची उपलब्धता करणे, त्याचबरोबर रुग्णाचा रक्तदाब, श्वासावर नियंत्रण ठेवणे, त्यासाठी आवश्यक औषधोपचार, व्यायाम व आहार याही जबाबदार्‍या वेळोवेळी भूलतज्ज्ञास पार पाडाव्या लागतात.

दरवर्षी भूलतज्ज्ञ भूल देण्याचे आणि ICU (व्यवस्थापन) वेदनाशमनाचे कार्य प्रामाणिकपणे आणि चोखपणे बजावत असतातच; पण 2019-2020 वर्ष जरा वेगळीच आरोग्याची गणिते घेऊन समोर आले. डिसेंबर 2019 पासून आरोग्याची गणिते घेऊन समोर आले. डिसेंबर 2019 पासून चीनच्या वुहान प्रांतातून सुरू झालेल्या कोरोना विषाणूने मार्च 2020 अखेर सर्व जगभर थैमान घालून कोव्हिड-19 या आजाराची साथ सर्व जगभर पसरली. त्यामुळे त्यास Covid 19 असे म्हटले गेले. केवळ हस्तस्पर्शातून या आजाराची साथ पसरत असल्यामुळे या आजाराची सर्वत्र खूप धास्ती निर्माण झाली. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी सर्व आरोग्य यंत्रणा निकराचे प्रयत्न करू लागली. या आजाराशी दोन हात करून मुकाबला देणारे डॉक्टर्स कोरोना वॉरियर ठरले. यामध्ये फिजिशियन चेस्ट फिजिशियन, भूलतज्ज्ञ रेडिऑलॉजिस्ट, नाक-कान-घसा तज्ज्ञ, सुक्ष्मजीवशास्त्र तज्ज्ञ व इतर सर्वत्र चिकित्सालयीन, अचिकित्सालयीन तज्ज्ञ डॉक्टर्स रात्र-दिन  झटून या रोगाशी सामना करू लागले.

कोव्हिड- 19  या आजाराचा मृत्यूदर थोडा कमी राहिला तरी, त्याचा प्रादुर्भाव, प्रसार खूप झपाट्याने होत गेला. त्यावर लस उपलब्ध न झाल्यामुळे त्यावर प्रतिबंध हाच एक उपाय शिल्लक राहिला. नंतरच्या काळात रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही खूप वाढत गेले आणि गंभीर रुग्णांवर पटकन कौशल्यपूर्ण उपचार करणे ही तर भूलतज्ज्ञांची खासियत! त्यामुळे भूलतज्ज्ञाविना हे उपचार अपूर्ण हे निश्चित कोव्हिड काळामध्ये जे डॉक्टर्स कोरोना योद्ध्ये ठरले. त्यामध्ये भूलतज्ज्ञांची क्रमवारी  खूपच वरती असेल. रुग्ण गंभीर होऊ लागला की, त्याची ICU  management बहुतांश वेळी भूलतज्ज्ञांना करावी लागते. या आजाराचे mild किरकोळ, moderate गंभीर, severe अतिगंभीर (अत्यवस्थ) असे वर्गीकरण केले तर गंभीर अथवा अतिगंभीर स्वरुपाचे रुग्ण Tertiary care center ला जिथे ICU ची व्यवस्था असते. तिथे भरती करावे लागतात. कोव्हिड आजाराची सुरुवातीची लक्षणे जसे घशामध्ये खवखव, अंगदुखी, ताप ही काही रुग्णांमध्ये पाहता पाहता गंभीर स्वरूप घेतात. वयस्कर रुग्ण, ज्यांना आधीपासून इतरही व्याधी असतात जसे मधुमेह, उच्चरक्तदाब, यकृत मूत्रपिंडाचे विकार, दमा, हृदयरोग, थायरॉईडचे विकार ई. यांच्यामध्ये कोव्हिड आजार जर योग्य वेळेत योग्य ती काळजी घेतली नाही तर रौद्ररूप धारण करायला फार वेळ लागत नाही. हे रौद्ररूप म्हणजे लगेचच वाढत जाणारा ज्वर, पाहतापाहता धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे. xray hrct द्वारे फुफ्फुसांमध्ये दोष दिसून येणे, रक्ताच्या चाचण्या (ज्याला वैद्यकीय परिभाषेत markers असे म्हणतात) केल्या असता त्यामध्ये विकोपाला गेलेले दोष दिसून येतात. अशा रुग्णांवर ICU मध्ये उपचार केले जातात.( cytoking storm ) 

ICU  मध्ये उपचार करणार्‍या डॉक्टरांना intersivist म्हणतात. भूलतज्ज्ञ हे काम अतिशय कौशल्याने करू शकतात. तातडीच्या वेळी कृत्रिम श्वास देणे आणि नंतर श्वास  सामान्य करणे यामध्ये भूलतज्ज्ञांचा हातखंडा असतो. अर्थात intersivist हे  physician ही असू शकतात. जी रुग्णालये फक्त कोव्हिड रुग्णालये म्हणून घोषित केली गेली, तेथील सर्व चिकित्सालयीन डॉक्टर कोव्हिड आजाराचे उपचार देऊ लागले; पण ICU manegment ही बहुतांशवेळी भूलतज्ज्ञांनीच पार पाडली. कारण काही रुग्ण अगदी थोड्याच वेळात गंभीर होतात, अशावेळी ही जबाबदारी भूलतज्ज्ञांवरच असते. 

कोव्हिड- 19 
कोव्हिड आजाराच्या औषध उपचाराबरोबर रुग्णांसाठी ऑक्सिजनचे उपचार करणे हे  काम भूलतज्ज्ञ पार पाडतात. काही रुग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था करणे, केवळ ऑक्सिजन पुरेसा नसल्यास रुग्णांना ventilator वरही ठेवावे लागते व त्याद्वारे कृत्रिम श्वास देणे. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण सामान्य करणे इ. जोखमीचे उपचार भूलतज्ज्ञ पार पाडतात. त्याचबरोबर ICU मधील रुग्णांचा आहार, स्वच्छता या गोेष्टींचीही काळजी घ्यावी लागते. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती टिकून राहते. तसेच रुग्णाचा रक्तदाब, इतर चाचण्या सामान्य ठेवणे 

त्यानंतरची अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारी म्हणजे रुग्णांना हळूहळू  ventilator वरून बाजूला घेणे, ventilator विना रुग्णांचे श्वसन सामान्य करणे. काही रुग्ण ऑक्सिजनवर अवलंबून होऊन जातात. कारण फुफ्फुसामध्ये एक प्रकारचा कडकपणा (fibrosis) सुरू होतो. हे सर्व होऊ न देणे, रुग्ण बाह्य ऑक्सिजनवर अवलंबून राहणार नाही, याची दक्षता घेणे, त्यासाठी वेगळे औषधोपचार, श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम या सर्वांवर लक्ष ठेवणे अथवा प्रत्यक्ष करवून घेणे इ. महत्त्वपूर्ण जबाबदार्‍या भूलतज्ज्ञ पार पाडीत असतात. जेणेकरून रुग्णास लवकरात लवकर घरी डिस्चार्ज करता येईल. बाह्य ऑक्सिजन विना, धाप न लागता, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी न होता, रुग्ण सलग 3 ते 5 मिनिटे चालू शकत असल्यास त्यास घरी जाण्यास परवानगी दिली जाते.

कोव्हिड काळामध्ये भूलतज्ज्ञांची आणखी एक महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणजे, कोरोना झालेल्या रुग्णांवर जर काही तातडीचे ऑपरेशन करावे लागले तर अशा ऑपरेशनसाठी भूल देणे. अ‍ॅक्सिडेंट, मार लागणे, सिझेरियनद्वारे प्रसूती ही काही तातडीच्या ऑपरेशनची उदाहरणे.

icu manegment  असो किंवा तातडीच्या ऑपरेशनसाठी भूल देणे असो, पीपीई किट, मास्क, हँडग्लोव्हज घालून स्वत:ला कोव्हिड किटमध्ये आलेला घाम याची तमा न करता स्वत:च्या कुटुंबीयांपासून दूर राहून, प्रसंगी स्वत:  क्वारंटाईन राहून स्वत:ला जीवाची बाजी लावून भूलतज्ज्ञांनी जिद्दीने प्राणपणाने कोरोनाशी मुकाबला केला. तरी यावर्षी आलेल्या कोव्हिड -19 या साथीच्या रोगाने भूलतज्ज्ञांवर एक वेगळीच जबाबदारी टाकली आणि भूलतज्ज्ञांनी ती अतिशय यशस्वीपणे पेलली.

 सध्या या रोगाचा प्रादुर्भाव थोडा कमी होत असला तरी मास्क हँड सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग ही  त्रिसूत्री सर्वांनी पाळायला हवी. बाहेर अनावश्यक गर्दी करणे, कारणाविना घराबाहेर पडणे टाळले पाहिजे, कारण अजूनही आपण कोरोनाच्या विळख्यातून सुटलो, असे म्हणून शकत नाही.

तज्ज्ञांच्या मते कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा  एकदा डिसेंबर, जानेवारीला येऊ शकतो. काळजी करायची नाही तर काळजी घ्यायची गरज आहे.

 "