Fri, Jul 03, 2020 17:02होमपेज › Aarogya › चहा : क्षणिक फायदा, दूरगामी तोटाच!

चहा : क्षणिक फायदा, दूरगामी तोटाच!

Last Updated: Nov 28 2019 1:44AM
डॉ. संजय गायकवाड

आजकाल भारतीय लोकांमध्ये सर्व वयोगटांमध्ये चहा पिण्याचे प्रमाण खूपच वाढलेले आढळते. साधारणतः दिवसातून तीन-चार किंवा त्याहूनही जास्त चहा घेणारे लोक सरसकट आढळतात. पाहुणचारासाठी चहाचा वापर भरपूर प्रमाणात आढळतो. विशेष म्हणजे, एक-दोन वर्षांच्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्व जण चहा आवडीने पितात. असा हा सर्वांना आवडणारा व अमृततुल्य वाटणारा चहा खरंच शरीराच्या दृष्टीने कितपत फायदेशीर आहे, याविषयी हा सविस्तर लेख. 
चहाच्या  क्षणिक फायद्यापेक्षा दूरगामी तोटेच अधिक प्रमाणात आहेत, हेच या लेखांमधून सुचवायचे आहे.

चहा हा अम्लीय पदार्थ आहे. चहामध्ये टॅनिन, कॅफिन इ. घटक विपुल प्रमाणात आढळतात. हे घटक मेंदूवर उत्तेजक कार्य करतात. चहा गरम असताना घेतल्याने क्षणिक ताजेतवाने वाटते. भारतीय लोक तर दूध व साखर मिश्रित चहा घेतात. साखरही त्वरित ऊर्जा देणारी आहे. या सर्वच गोष्टींमुळे वारंवार चहा घेण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळेच चहाचे एक प्रकारचे व्यसनच  लागते.

दूध घातलेला चहा जास्त प्रमाणात पिण्यामुळे अग्‍निमांद्य (भूक मंदावणे), अल्सर, मलावरोध, आम्लपित्त, पचनशक्‍ती बिघडणे, पोटफुगी, हाडांचा ठिसूळपणा, उष्णता वाढून वारंवार तोंड येणे, मळमळ, डोकेदुखी इत्यादी विकार उद्भवू शकतात.

साखरयुक्‍त गोड चहामधून प्रत्येक एक कप चहा मागे अंदाजे 40 ते 50 कॅलरीज मिळतात. म्हणून बैठे काम करणार्‍या व्यक्‍ती तसेच मधुमेही, हृदयविकार, स्थौल्य आणि कोलेस्टेरॉल (चरबी) जास्त असणार्‍या रुग्णांनी चहा घेऊच नये. दूधविरहित कोर्‍या चहानेही पचनसंस्थेचे विकार व कॅन्सर उद्भवू शकतात. 

चहा हा कफ व पित्त वाढवणारा असून शरीरातील उष्णता वाढवतो. अतिचहापानामुळे निद्रानाश, चिडचिडेपणा, स्मृतिनाश इत्यादी मानसिक विकार उद्बवू शकतात. उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबर महिन्यात चहापान केल्यामुळे शरीरातील उष्णता वाढते. पाश्‍चिमात्य देशांच्या तुलनेत भारत हा समशितोष्ण प्रदेश असल्याने भारतात जास्त चहापान योग्य नाही. 

तसेच बर्‍याच वेळा चहाबरोबर बिस्किट्स, ब्रेड, टोस्ट इत्यादी पदार्थ खाल्ल्याने शरीरामध्ये जादाच्या कॅलरीजची भर पडते व त्यामुळे शरीराचे वजन वाढून रक्‍तदाब, मधुमेह इत्यादीचा झोका अनेक पटींनी वाढतो. 

वरील सर्व गोष्टींचा विचार केल्यावर असे लक्षात येते की, उत्तम आरोग्य हवे असल्यास चहापान बंद करणे योग्य ठरेल. उसापासून कारखान्यांमध्ये साखर निर्मिती प्रक्रियेमध्ये गंधक आणि इतर वेगवेगळे जवळपास 23 ते 25 केमिकल्स वापरले जातात. अशी ही केमिकलयुक्‍त साखर ही एक प्रकारचे विष असून तिचे प्रचंड दुष्परिणाम आढळतात. त्यामुळे अनेक विकारांना व्यक्‍ती बळी पडू शकतो.

भारतामध्ये पूर्वापार चहापानाची पद्धत नव्हती. साधारणतः दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांच्या आगमनानंतर भारतात चहापान सुरू झाले. आता तर शहरे तसेच गावांमध्ये दुकानांमधूनसुद्धा चहा मिळतोय. दैनंदिन कामांचा वाढता ताण व हाकेच्या अंतरावर चहाची उपलब्धता यामुळे वारंवार चहापान घडून येते. वारंवार उकळलेली चहापत्ती विषारी गुणधर्म दाखवते. अशा प्रकारे चहा हा मरगळ घालवून क्षणिक ताजेपणा देत असला तरी त्याचे तोटे मात्र प्रचंड आहेत. म्हणूनच, भारतीयांमधील चहा पाण्याचे प्रमाण कमी किंवा बंद होण्याची गरज आहे.