दिवाळी झाली आता आरोग्य सांभाळा! 

Last Updated: Nov 07 2019 2:06AM
Responsive image


डॉ. अनिल मडके

सण झाला की मागे ऋणही राहता कामा नये आणि कुणाच्या घरात रुग्णशय्याही अंथरली जाता कामा नये. असे सकारात्मक बदल सर्वांनी स्वीकारायला हवेत. दिवाळीनंतरच्या काही दिवसांत दिवाळीत झालेली दुकानातली गर्दी आता दवाखान्यांत दिसू लागली आहे, हा अनुभव नवा आहे का? हाच अनुभव आपण वारंवार घेत राहणार आहोत का?

‘दिन दिन दिवाळी, गायी-म्हशी ओवाळी’ ही बालपणीच्या दिवाळीची कविता अनेकांना दर दिवाळीला आठवून जाते. आता मात्र तिची फक्‍त आठवणच. ती ओवाळणीही विरली आणि गायीगुरांनी समृद्ध गोठेही भाग्यवंतांच्याच नशिबी उरले. आता ‘हॅऽऽपी दिवाली’ असे स्वर आणि शब्द व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या भिंतींवर म्हणजे वॉलवर दिसतात. कालाय तस्मे नमः म्हणायचे, हे खरेच कारण कालागणिक जे वेगाने बदल झाले, ते दिवाळीसारख्या महोत्सवात झाले नसते तरच नवल!

काही जणांच्या बाबतीत दिवाळी येऊन गेली की आजारपण येते आणि त्यांना उत्साहहीन, अगदी दीन करून जाते. ही संख्या दुर्दैवाने वाढत आहे. दिल्लीत कशी गुदमर चालली आहे, तिच्या बातम्या आपल्याला टीव्हीवरून दिसत आहेत आणि प्रदूषणाबद्दल किती सावध व्हायला हवे याचे इशारेच त्या देत आहेत. आपणही वेळीच सावध व्हायला हवे. सण झाला की मागे ऋणही राहता कामा नये आणि कुणाच्या घरात रुग्णशय्याही अंथरली जाता कामा नये. असे सकारात्मक बदल सर्वांनी स्वीकारायला हवेत. दिवाळीनंतरच्या काही दिवसांत दिवाळीत झालेली दुकानातली गर्दी आता दवाखान्यांत दिसू लागली आहे, हा अनुभव नवा आहे का? हाच अनुभव आपण वारंवार घेत राहणार आहोत का?

दिवाळी म्हणजे सणांचा राजा. राजापासून रंकापर्यंत सर्वांच्या घरी प्रकाशाचा, दिव्याचा, आनंदाचा उत्सव मिरवणारा हा सण. फार पूर्वी नाही, अगदी दोन-तीन दशकांपूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीच्या जमान्यात घराघरांत दिवाळीचे अनेक पदार्थ म्हणजे फराळाचे पदार्थ आनंदाने, उत्साहाने बनविले जायचे. लाडू, चिवडा, चकली, करंज्या, शेव, शंकरपाळी, अनारसे असे एक ना अनेक रुचकर पदार्थ घरीच बनवले जायचे. त्यामुळे साहजिकच हे पदार्थ बनवताना दर्जा, स्वच्छता या सर्व गोष्टींकडे बारीक लक्ष दिले जायचे. आता काळ बदलला. कुटुंबे चौकोनी झाली. काही ठिकाणी ती ‘अणुकुटुंबे’ म्हणजे ‘मॉलिक्युलर’ झाली. घरातील स्त्री कामानिमित्त बाहेर पडली आणि करिअरमुळे घरातील कामाचा ताण वाढला. घरातल्या नेहमीच्या स्वयंपाकासाठी घरात स्वयंपाकीण आली. ती काम करताना आपल्याइतकी सावध-दक्ष असेल का? आणि सणाच्या कालावधीत आपल्या विश्‍वासाच्या या स्वयंपाकीण बाईलासुद्धा सुट्टी निकडीची झाली. अशा अनेक कारणांमुळे दिवाळीचे पदार्थ घरी बनवणे जिकिरीचे झाले. साहजिकच दिवाळीचा फराळ, दिवाळीचे पदार्थ बाजारातून विकत घेतले जाऊ लागले आणि येथूनच आरोग्याचे प्रश्‍न सुरू झाले. बाहेरचे खाद्यपदार्थ घरी आणणे हे एका परीने, आजारांना निमंत्रण देणे असते.

बाजारात मिळणारे फराळाचे पदार्थ कुठे तयार होतात? ते बनवणारे कोण असतात? त्यांची स्वच्छतेची जाण किती? असे पदार्थ जिथे बनविले जातात, तो परिसर कसा असतो? त्याची स्वच्छता किती? याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे अशा पदार्थात वापरलेले जिन्‍नस कोणत्या दर्जाचे असतात? तिथल्या तेलाचा दर्जा काय? वेगवेगळ्या जिन्‍नसांतील भेसळ किती आणि कशी हे आरोग्याच्या द‍ृष्टीने खूप महत्त्वाचे असते.

बाहेरचे दिवाळीतले किंवा तत्सम तिखटाचे चटपटीत पदार्थ तळणीतले असतात. यासाठी वापरलेले तेल निकृष्ट दर्जाचे असते. उकळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरले जाते. हृदयासाठी ते अत्यंत घातक असते. तेल वारंवार उकळल्यामुळे ट्रान्स फॅट्स तयार होतात. ट्रान्स फॅट म्हणजे धोकादायक चरबी. यामुळे हृदयविकार, उच्च रक्‍तदाब आणि मधुमेह या रोगांसाठी खतपाणी मिळते. अशा प्रकारच्या तेलामुळे घसा धरणे आणि घशातील संसर्ग यांसाठी पूरक वातावरण निर्माण होते.

मिठाईशिवाय दिवाळीच काय अगदी वाढदिवसही साजरा होत नाही. मिठाई म्हणजे गोड. मिठाई म्हणजे साखर आणि मिठाई म्हणजे खवा. मुळात अतिसाखर ही शरीरातील प्रत्येक पेशीला मारक असते. जादा साखरेचे रूपांतर चरबीत होऊन ती शरीरात साठवली जाते. पाश्‍चात्त्य देशांत साखरेच्या एक-दोन ग्रॅमच्या पुड्या, त्याही आवश्यक वाटल्या तरच घ्याव्यात, असा संकेत असतो. पण, आपण भारतीय मात्र साखरेचा अनिर्बंध वापर नेहमीच्या आहारात करत असतो.   अतिसाखरेमुळे रक्‍तवाहिन्या कठीण होण्यास हातभार लागतो. अतिसाखरेमुळे चयापचय क्रियेवर ताण येतो. मधुमेह, हृदयविकार, उच्च रक्‍तदाब यांसारखे विकार बळावतात. तोंड येणे, स्थूलपणा, अपचन हे साखरेमागोमाग येणारे विकार आहेत याचा विचार मिठाई घेताना/ खाताना आवर्जून करावा. तेलकट पदार्थ, चरबीयुक्‍त पदार्थ जितक्या जास्त प्रमाणात आपण घेऊ, तितका रक्‍तवाहिन्या कठीण होण्याचा म्हणजे अ‍ॅथेरोस्क्लेरोसिस होण्याचा धोका अधिक असतो.

रक्‍तवाहिन्या जितक्या लवचिक तितकी तुमची प्रकृती उत्तम. रक्‍तवाहिन्यांचे वय म्हणजे तुमचे वय. चरबीमुळे रक्‍तवाहिन्या कठीण होऊन कालांतराने रक्‍तवाहिनी बंद पडण्याचा धोका असतो. याचा परिणाम म्हणून हार्ट अ‍ॅटॅक, ब्रेन अ‍ॅटॅक किंवा पुढे मूत्रपिंडाच्या रक्‍तवाहिन्या बंद होण्याचा धोका असतो. हे सर्व टाळायचे असेल तर दिवाळीचा फराळ माफक प्रमाणात घ्यावा किंवा नेहमीच्या आयुष्यात व्यायामात सातत्य ठेवावे. कारण रक्‍तवाहिन्यांची आणि शरीराची एकंदर लवचिकता वाढवत राहणे महत्त्वाचे असते.

मीठ, मैदा, साखर हे पांढरे पदार्थ हृदयासाठी हानिकारक आहेत हे शुभ्र सत्य आहे. मिठाईच्या पदार्थांत मैदा आणि मीठ यांचाही पुरेपूर नव्हे, भरपूर वापर होत असतो. मीठ म्हणजे ब्लड प्रेशरला आमंत्रण. अधिक मीठ घेणार्‍या व्यक्‍तींच्या शरीरात अधिक पाण्याचा संचय होतो. रक्‍तवाहिन्या कठीण होतात, अर्थातच त्यामुळे उच्च रक्‍तदाब आणि हृदयविकाराला आमंत्रण मिळते. जसे मीठ तसा मैदा. रक्‍तवाहिन्या आणि हृदय यांच्यासाठी मैदा अत्यंत धोकादायक असतो. विशेषतः वाढत्या वयातील मुले आणि मुली यांच्या आहारातील या सर्व पदार्थांचे प्रमाण हे आटोक्यात ठेवले पाहिजे किंवा मुलांना भरपूर व्यायामासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. अधिक तळलेले किंवा अधिक तेलकट पदार्थ थंडीच्या दिवसांत घ्यावेसे वाटतात. या दिवाळीत तर थंडी आणि पाऊस या दोघांची हजेरी होती आणि अजूनही आहे. आता थंडीचे दिवस पुढे आहेत. त्यामुळे हे पदार्थ जितके खावेत तितके खावेच वाटतात. तरुण मुले-मुली असोत किंवा कोणत्याही वयाची व्यक्‍ती, असे पदार्थ खाताना पोट भरल्याची जाणीव होत नाही आणि मग खाण्यावर बंधन न राहिल्यामुळे चयापचय क्रियेवरसुद्धा ताण येतो आणि स्थूलपणा वाढण्यास वजनभार लागतो. मिठाईचे पदार्थ अनेक विक्रेत्यांकडे मिळतात. 

आजकाल नैतिक मूल्ये सर्वत्र पायदळी तुडवली जात आहेत. ‘नफ्यासाठी वाट्टेल ते’ हा जणू दुष्टमंत्रच झाला आहे. त्यामुळे असे नफेखोर जेव्हा मेवामिठाई बनवतात, तेव्हा विविध रसायने आणि खाद्यरंग यांचा वापर मिठाईचा आकर्षकपणा वाढविण्यासाठी केला जातो. कोणत्याही ठिकाणच्या घाणेरड्या पाण्याचा वापरही होतो. अशा वाटेल त्या पद्धतीने मिठाई बनवली जाते. ग्राहकांना देताना मात्र ती चांगल्या -आकर्षक पॅकमध्ये दिली जाते; पण मिठाई ही शोभेची वस्तू नव्हे की, ती दिवाणखान्यात ठेवली. ती प्रत्यक्ष पोटात घ्यायची असते. तिचे दुष्परिणाम शरीरावर होतातच.

फराळाच्या वेगवेगळ्या पदार्थांत काही खाद्यरंग मिसळण्याची परवानगी असली तरी त्यासाठी निकष असतातच. आपल्याकडील कायदे आपल्यासाठी नाहीत अशी समजूत असते का कोण जाणे, परंतु बहुतेक वेळा ते केवळ कागदावरच असल्याचा अनुभव येतो. भ्रष्टाचाराची कीड वाळवीसारखी समाजातील कानाकोपर्‍यात पसरल्यामुळे भेसळ करणार्‍यांना ते अमर्याद वापरण्याची भीती किंवा चाड आहे असे वाटत नाही. परिणामी आपण फराळाच्या किंवा मिठाईच्या, खाद्यपदार्थांच्या नावाखाली कोणती भयंकर रसायने पोटात रिचवतो याची आपल्याला जाणीव नसते किंवा ती करून घेण्याची इच्छाही नसते.

आज आपल्याभोवती वाढणारे किडणी किंवा मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रकार म्हणजे किडणी फेल्युअर किंवा विविध प्रकारचे कर्करोग-कॅन्सर यांचे मूळ अशा वेगवेगळ्या पदार्थात आहे हे आता लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे बाहेरचे विकतचे खाद्यपदार्थ खाणे आरोग्याला किती धोकादायक आहेत हे लक्षात येईल.

बाजारातल्या खाद्यपदार्थांबद्दल अत्यंत किळसवाणी बाब म्हणजे हे पदार्थ बनविणार्‍या लोकांची मानसिकता. बर्‍याचदा अत्यंत घाणेरड्या ठिकाणी हे पदार्थ बनवले जातात; ब्रँडेड कंपन्या फक्‍त आपले लेबल चिकटवतात. क्वालिटी कंट्रोलवर किती जणांचे लक्ष आहे, कुणास ठाऊक! फेसबुक, व्हॉटस् अ‍ॅप, यू-ट्यूब यांवर अशा प्रकारचे अनेक उल्लेख आलेले असतील. दिवाळी म्हणजे फटाके, फुलबाजे, भुईचक्र, रॉकेट, पाऊस एवढेच नव्हे तर तोटे आणि सुतळी बॉम्ब अशा वेगवेगळ्या आतषबाजीचे, दारूकामाचे धूर आणि आवाज ओकणार्‍या फटाक्यांचे प्रकार आपल्याला दिवाळीत पाहायला आणि ऐकायला मिळतात. तसे ते याही दिवाळीत मिळालेच असतील. आपल्याकडे तर दारूच्या वापराला कालबंधनच नाही. निवडणुका झाल्या उडवा फटाके, उधळा गुलाल, लग्‍न आहे तर ते आतषबाजीशिवाय कसे? परंतु विविध प्रकारच्या फटाक्यांमुळे हवेचे जे प्रदूषण होते आणि कार्बन डाय ऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईडस्, नायट्रेटस् यांबरोबर वेगवेगळ्या प्रकारची रसायने, वेगवेगळ्या प्रकारचे कण आणि प्रचंड प्रमाणातला धूर हवेत मिसळला जातो त्याचा विचार कोणी करावयाचा आहे?             (पूर्वार्ध)