Mon, Jul 06, 2020 04:20होमपेज › Aarogya › नार्कोलेप्सी : दिवसा झोप येण्याचा आजार

नार्कोलेप्सी : दिवसा झोप येण्याचा आजार

Last Updated: Nov 28 2019 1:44AM
डॉ. संतोष काळे

झोप हा आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पुरेशी झोप झाली नाही तर आपल्या आरोग्याचे अनेक प्रश्‍न उभे राहतात. रात्रीची झोप तर आवश्यकच असते; पण जर तुम्हाला दिवसाही खूप जास्त आणि गाढ झोप लागत असेल तर तोही एक आजार आहे. त्याकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. मुळात आपण झोप या विषयाला फारसे महत्त्व देत नाही. आणि असा कुणी झोपाळू माणूस दिसला की, त्याची काळजी वाटण्यापेक्षा चेष्टाच जास्त होते; पण दिवसा सारखी गाढ झोप लागणे हा नार्कोलेप्सी नावाचा आजार आहे आणि त्यावर वेळेत उपचार होण्याची गरज आहे.

नार्कोलेप्सी हा एक मेंदूचा आजार आहे. यात रुग्णाचे त्याच्या झोपेवर आणि जागे राहण्यावर नियंत्रण राहत नाही. हा आजार असलेल्या लोकांना दिवसा प्रमाणापेक्षा जास्त झोप येते आणि ही झोप सतत येत असते, त्यावर त्यांचे काही नियंत्रण नसते. एखादे काम करत असताना मधेच त्यांना झोपेचा झटका येतो. आपल्याला वाटते हा माणूस झोपाळू आहे; पण तसे नसते. त्याची ही झोप म्हणजे आजार आहे आणि त्याला उपचारांची गरज असते. 

सर्वसामान्यपणे आपण जी झोप घेतो, तिचे एक चक्र असते. आपल्याला झोप येते तेव्हा सुरुवातीच्या टप्प्यातील साधारण सावध झोप आणि त्यानंतर गाढ झोपेचा टप्पा आणि त्यानंतर साधारण 90 मिनिटांचा डोळ्यांची जलद हालचाल होण्याचा (आरईएम) टप्पा असतो. नार्कोलेप्सीच्या रुग्णांमध्ये हा आरईएमचा टप्पा हा झोपेच्या चक्रात जवळजवळ लगेच येतो. त्याचप्रमाणे जागण्याच्या वेळेतही वारंवार त्यांना अशी गाढ झोप लागते. या आरईएम टप्प्यात आपल्याला स्वप्ने पडतात आणि याच टप्प्यात आपले स्नायू शिथिल पडलेले असतात. यातून आपल्याला नार्कोलेप्सीच्या काही लक्षणांचे स्पष्टीकरण दिसून येते. 

नार्कोलेप्सी साधारणपणे वयाच्या 15 ते 25 वर्षे वयोगटात होतो; पण तसा तो कोणत्याही वयात होऊ शकतो. नार्कोलेप्सीच्या बहुतांश रुग्णांबाबत निदानच होत नाही. त्यामुळे त्यावर उपचार होत नाहीत. 

नार्कोलेप्सी विकार जडण्याची कारणे

नार्कोलेप्सी जडण्याची कारणे शास्त्रज्ञांना माहिती नाहीत; मात्र हा आजार जडण्यासाठी कारणीभूत ठरणारी जनुके ओळखण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. ही जनुके मेंदूतील झोप आणि जागे होण्याच्या चक्राला इशारा देणार्‍या रासायनिक द्रव्यांना नियंत्रित करतात. काही शास्त्रज्ञांच्या मते मेंदूकडून जेव्हा हायपोक्रेटीन नावाचे केमिकल योग्य प्रमाणात निर्मिले जात नाही, तेव्हा हा आजार जडतो. त्याचबरोबर आरईएम झोपेचे नियमन करणार्‍या मेंदूतील विविध भागांत निर्माण झालेला बिघाडही या आजाराला कारणीभूत ठरतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या बिघाडांमुळे या आजाराची लक्षणे विकसित व्हायला मदत होते. थोडक्यात, नार्कोलेप्सीचा विकार जडण्यामागे मेंदू आणि आरईएम झोपेतील बिघाडाशी निगडित अनेक घटक कारणीभूत असतात. 

नार्कोलेप्सीची लक्षणे

दिवसा अती झोप येणे : रात्री व्यवस्थित झोप झाली तर आपल्याला दिवसा झोप येत नाही. दुपारी वामकुक्षी म्हणून थोडावेळ झोपणे, हेही सामान्य आहे; पण नार्कोलेप्सीच्या रुग्णाला रात्री पुरेशी झोप झालेली असली तरी दिवसा झोप येत राहते. अशा लोकांमध्ये कायम झोपाळूपणा दिसतो. त्यांच्यात ऊर्जा नसते आणि ते कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. त्यांची स्मरणशक्‍ती कमी असते. त्यांचा मूड नैराश्यपूर्ण असतो आणि / किंवा ते प्रचंड थकलेले असतात. 

कॅटाप्लेक्सी : हे लक्षण या रुग्णांमध्ये आढळते. कॅटाप्लेक्सी म्हणजे स्नायूंतील बळ अचानक नाहीसे होणे. त्यामुळे थकल्याची भावना येते आणि स्नायूंवरील ताबा सुटतो. मग बोलण्याची शक्‍ती जाण्यापासून माणूस कोसळण्यापर्यंत काहीही होऊ शकते. कोणत्या स्नायूंवरील ताबा सुटला आहे, यावर ते अवलंबून असते. त्याशिवाय, भावनातिरेक हेही या आजाराचे एक लक्षण आहे. त्यात एकदम चकीत होणे, हसत राहणे किंवा खूप चिडणे असे घडू शकते. रुग्णाचे हातपाय लुळे पडतात किंवा तो चालता चालता एकदम कोसळतो. तो जागा असतो; पण आपले शरीर हलवू शकत नाही. 

भास होणे : काही वेळा आपल्याला भास होतात, झोपेत स्वप्न पडते आणि ते खरे असल्याचा आभास होतो. नार्कोलेप्सीच्या रुग्णांमध्ये असे भास होण्याचे प्रमाण झोपेत असताना आणि जागेपणीही जास्त असते. 

स्लीप पॅरालिसीस : झोपेत किंवा जागेपणी बोलण्याची किंवा हालचाल करण्याची क्षमता काही काळापुरती हरवून बसणे म्हणजे स्लीप पॅरालिसीस. असे अगदी थोड्या काळासाठी घडते, म्हणजे काही सेकंदापासून काही मिनिटांपर्यंत. एकदा हा झटका येऊन गेला की रुग्ण अगदी झपाट्याने आपली बोलण्याची आणि हालचाल करण्याची क्षमता मिळवतो. 
एखाद्या व्यक्‍तीला दिवसा प्रमाणाबाहेर झोपताना आपण पाहत असू तर त्याची चेष्टा न करता त्याला डॉक्टरांकडे जाण्यासाठी उद्युक्‍त करणे आवश्यक आहे. 
नार्कोलेप्सीवर अद्याप उपचार नाहीत; पण झोपेवर नियंत्रण आणण्यासाठी औषधे दिली जातात आणि त्यामुळे हा आजार बर्‍यापैकी आटोक्यात येतो. 
चहा-कॉफीचे अतिसेवन टाळणे, मद्यपान न करणे, धूम्रपान न करणे, जास्त मसालेदार, पचायला जड असा आहार न घेणे, झोपेचे वेळापत्रक निश्‍चित करणे, दिवसाही दहा-पंधरा मिनिटांची वामकुक्षी घेणे, जेवणाच्या वेळा निश्‍चित करणे, नियमित व्यायाम करणे हे सगळे हा आजार होऊ नये, यासाठी करणे आवश्यक आहे.