Wed, Aug 12, 2020 02:49होमपेज › Aarogya › उन्मादाची समस्या आणि आयुर्वेद

उन्मादाची समस्या आणि आयुर्वेद

Last Updated: Jan 09 2020 2:34AM
वैद्य विनायक खडीवाले

गुरुकुल पारंपरिक उपचार : आयुर्वेदीय थोर संहिताकारांनी उन्माद आणि अपस्मार-वेडेपणा आणि फिट येणे असा काही वेळेस एकत्रित विचार केलेला आढळतो. तथाकथित उन्माद विकार आणि अपस्मारात मेंदू झोपविणे या उपचार दिशेपेक्षा इतर साम्य काहीही नसते. दिवसेंदिवस उन्माद विकाराने ग्रस्त खूप लहान वयातील मुलांपासून ते ऐंशी-नव्वदीपर्यंतची थोर थोर मंडळी मोठ्या संख्येने संबंधित डॉक्टर वैद्यांकडे येत असतात, आणली जातात. संबंधित रुग्णमित्र हे नेहमीच मोठ्याने बोलणे, आरडाओरडा, त्रागा करणे, आदळआपट करणे, तोडमोड करणे; घरातील आणि बाहेरच्यांना लहान-मोठे विसरून खूप दमबाजी करणे इत्यादी कमी-अधिक कृतींनी कुटुंबातील इतर व्यक्‍तींचे स्वास्थ्य नेहमीकरिता बिघडवत असतात. उन्माद विकार संबंधित व्यक्‍तीच्या मेंदूमध्ये खूप प्रकारचे गडबड गोंधळाचे, आक्रमकतेचे विचार, त्याचा ताबा का, केव्हा, कसा घेतात याचे उत्तर अजूनही जगातील थोर थोर वैद्यकीय संशोधक आणि मानवशास्त्रज्ञांना सापडले नाही. 

दोन-पाच वर्षांच्या मुलांपासून ते तरुण आणि वृद्ध माणसे-महिला जेव्हा निरपराधी लोकांना वेडेवाकडे बोलतात, शिव्या देतात, हाणामारी करतात, प्रसंगी खूनही करतात आणि हे सर्व उघडघड चालते तेव्हा संबंधित कुटुंबीय, शेजारी पाजारी, शासन, सगळ्यांचीच पाचावर धारण बसलेली असते. गोडगोड बोलणे, त्या रुग्णाला त्याच्या आवडत्या व्यक्‍तींकडून समजावणे, त्याचे लहान-मोठे लाड करणे इ. उपायांना उन्मादाला सरावलेले हे रुग्ण खूपखूप वेळा दाद देत नाहीत. त्यांच्याकरिता प्रारंभिक अवस्थेत डोक्यावर खोबरेल तेल, एरंड तेल, नारिकेल तेल किंवा जपाकुसुम तेल थापणे, नाकात चांगले तूप किंवा अणू तेल टाकणे, तळहात, तळपाय, कानशिले, कपाळ यांना हलक्या हाताने शतधौतघृत जिखणे, यांचा उपयोग होतो. पोटात घेण्याकरिता प्रवाळ, कामदुधा, ब्राह्यीवटी, चंदनादिवटी, लघुसूतशेखर अशांची कमी-अधिक निवड सकाळ-सायंकाळी करावी. जेवणानंतर सारस्वतारिष्ट द्यावे. सकाळ-सायंकाळच्या गोळ्यांबरोबर पंचगव्यघृत आणि रात्री निद्राकारवटी 6 गोळ्या आठवणीने द्याव्यात. शुभं भवतु! 

ग्रंथोक्‍त उपचार : उन्माद गजकेसरी सारस्वतारिष्ट, मौक्‍तिकभस्म, मौक्‍तिक, प्रवाळ, पंचगव्यघृत, जटामांसी फांट, बाह्योपचारार्थ शतधौतघृत, शतावरी घृत, शतावरी चूर्ण, चंदनखोड गंध आणि शतधौतघृत मलमाचा कानशिले कपाळ यांना युक्‍तीने लावणेसाठी कुष्मांडकावलेह, उपळसरी चूर्ण. 

विशेष दक्षता : संबंधित व्यक्‍तीची पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन त्याच्या रागाला निमित्त मिळेल असे भाषण, कृती टाळावी. अशा व्यक्‍तीला शक्यतो त्याच्या आवडत्या व्यक्‍तींच्या सहवासात ठेवावे. त्यांच्या बबलिंग एनर्जीला काम मिळेल, असे विविध छंद किंवा कामात त्यांना गुंतवावे. मर्जी सांभाळावी. 

पथ्य : मधुर रसाचे माफक पदार्थ, गाईचे दूध, लोणी, तूप, याबरोबरच ज्वारीची भाकरी, मुलांचे वरण, दुध्या भोपळा, पडवळ, दोडका, घोसाळे, कोथिंबीर, चाकवत अशा सौम्य भाज्यांचा वापर करावा. खूप धष्टपुष्टता वाढेल असा आहार टाळावा. धने ठेचून त्याचे पाणी, काळे मनुके, राजगिरा लाह्या यावर भर द्यावा. 
कुपथ्य : तिखट, आंबट, खारट, चमचमीत, मसालेदार, जेवणावर जेवण, मांसाहार, बेकरी पदार्थ, रात्री उशिरा किंवा राक्षसकाली जेवण, मद्यपान, काटाक्षाने टाळावे. 
योग आणि व्यायाम : शवासन, दीर्घश्‍वसन, प्राणायाम, भस्त्रिका, अन्‍न पचनापुरता माफक व्यायाम. 

रुग्णालयीन उपचार : शिरोधारा, शिरोपिचू, शिरोबस्ति, मात्रा आणि निरूहबस्ति. 
अन्यषष्ठि उपक्रम (पंचकर्मादि) : शतधौतघृत, लोणी, तूप, खोबरेल किंवा एरंडतेल, जपाकुसुमादि तेल यांनी तळहात, तळपाय, कानशिले, कपाळ यांची ‘सेवा’ करावी. 
चिकित्साकाल : किमान तीन महिने ते एक वर्ष. 

निसर्गोपचार : शांत आणि थंड वातावरणात आवडत्या व्यक्‍तींबरोबर राहणे, फिरणे, लहान बालकांबरोबर खेळावयाची सुसंधी देणे. 
याखेरीज पंचगव्यघृत, शतावरीघृत, अणुतेल किंवा  शतधौतघृताचे नस्य करावे. शतधौतघृताने पादपूरण, तळहात, तळपाय, कानशिले, कापळ यांना हलक्या हाताने जिरवावे.  जेवणानंतर आठवणीने किमान वीस मिनिटे फिरून यावे. शक्य असल्यास गोदुग्धावर राहावे. 

संकीर्ण : स्त्रियांचा उन्माद विकार हा वेगळ्याच तर्‍हेने हाताळावा लागतो. काही स्त्रियांना त्यांच्या सोळा ते पंचेचाळीस या काळात उन्माद विकाराने पछाडले तर त्यांच्या मासिक पाळीशी संबंधित तक्रारींची तात्पुरती आणि दीर्घकालीन उपाययोजना करावी लागते. अशा स्त्रियांना अतिरक्‍तस्राव होऊ नये म्हणून आर्तशमन उपचार करावे लागतात. त्याकरिता प्रवाळ, कामदुधा, चंदनादिवटी, उपळसरी, शतावरीघृत, शतावरी लापशी, शतावरीकल्प, मौक्‍तिकभस्म अशांची निश्‍चित मदत होते.