Fri, May 29, 2020 18:15होमपेज › Aarogya › जाणून घ्या बायपास शस्त्रक्रियेविषयी

जाणून घ्या बायपास शस्त्रक्रियेविषयी

Last Updated: Oct 09 2019 8:32AM
डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी

बायपास हा शब्द नुसता कानावर पडला तरी मनात अत्यंत नकारात्मक विचार सुरू होतात आणि जगातील सर्वात कणखर व्यक्‍तीही तथाकथित पर्यायी औषधोपचारांचा विचार करू लागते. जेव्हा हृदयाच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये अधिक प्रमाणात, सर्वच रक्‍तवाहिन्यांमध्ये अवरोध असेल किंवा मुख्य धमनीमध्ये अवरोध असेल किंवा ज्या अवरोधाची अँजिओप्लास्टी करणे अशक्य किंवा धोकादायक आहे, अशा वेळी वैद्यकीय औषधोपचारासोबत बायपास सर्जरीचा सल्ला दिला जातो. महानगरांतील रुग्णालयांचा सगळाच्या सगळा वैद्यकीय लवाजमा संरक्षणासाठी आणि कठीण परिस्थितीत काळजी घेण्यासाठी सज्ज असूनही तेथे बसलेल्या रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना एकाएकी अत्यंत असुरक्षित व हतबल वाटू लागते. 

सीएबीजी किंवा बायपास शस्त्रक्रिया गेल्या 40-50 वर्षांपूर्वीपासून केली जात आहे. दिवसागणिक अधिकाधिक प्रगत होत जाणार्‍या वैद्यकीय व शास्त्रीय ज्ञानामुळे आज एकट्या भारतात 1.5 ते 2 लाख हृदय शस्त्रक्रिया केल्या गेल्या आहेत. या शस्त्रक्रियेचे फायदे व परिणामकारकतेवर अनेक क्लिनिकल ट्रायल्स व संशोधन निबंधांमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. लक्षावधींचे प्राण वाचवण्याची, रुग्णांच्या चेहर्‍यावरील स्मितहास्य परत आणण्याची आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना आयुष्य जगण्याची आणखी एक संधी देण्याची किमया या शस्त्रक्रियांनी साधली आहे. 

ही शस्त्रक्रिया स्पीड ब्रेकरसारखी आहे. तुम्हाला स्पीड ब्रेकर पार करून जावे लागते आणि मग तुम्ही गाडीचा वेग वाढवू शकता. बहुतेक रुग्ण शस्त्रक्रिया झाल्यानंतर 7 दिवसांच्या आत 500 मीटर चालतात किंवा जिना चढतात. रुग्ण 4 आठवड्यांत बैठे काम पूर्वीप्रमाणे सुरू करू शकतो आणि 3 महिन्यांत गाडी चालवू शकतो. (अर्थातच सीट बेल्ट लावून). शस्त्रक्रियेच्या वेदना पहिल्या दोन किंवा तीन दिवसांतच खूप कमी होतात आणि रुग्णाला केवळ क्रोसिनची एखादी टॅब्लेट देऊन वेदना कमी केल्या जाऊ शकतात. काही रुग्णांना छातीमध्ये ओढल्यासारखी (टाइटनेस) भावना काही दिवस येते; पण फिजिओथेरेपीने ही समस्या दूर केली जाऊ शकते. सर्वात सुरक्षित तसेच उत्तम नोंद ठेवण्यात आलेल्या ओपन हार्ट प्रक्रियांपैकी एक असलेल्या या शस्त्रक्रियेला होणारा विरोध गोंधळात टाकणारा आहे. अगदी मधुमेह, रक्‍तदाब, मूत्रपिंडाचे सौम्य स्वरूपाचे आजार, हृदयाच्या कार्यातील बिघाड आदी वैद्यकीय अवस्थांमधून जाणार्‍या रुग्णांवरही बायपास केली जाऊ शकते. ही शस्त्रक्रिया तुलनेने सुरक्षित व परिणामकारक आहे. यामुळे बर्‍या होणार्‍या रुग्णांचे प्रमाण 98 ते 99 टक्के आहे. उरलेल्या एक किंवा दोन टक्के रुग्णांमध्ये उपचारांना यापूर्वीच झालेला विलंब किंवा काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी ठरत नाही.

विशेषत:, मधुमेही रुग्णांच्या रक्‍तवाहिन्यांमध्ये 3-4 मोठे अडथळे (ब्लॉक्स) असतानाही सीएबीजी (बायपास) हा सर्वात प्रभावी व दीर्घ काळ टिकणारा पर्याय ठरल्याचे दिसून आले आहे. शस्त्रक्रिया झालेल्या 95 टक्के रुग्णांमध्ये हार्ट अ‍ॅटॅक येण्याचे प्रमाण कमी झाले आहे, त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागलेले नाही आणि त्यांची आयुर्मर्यादा वाढली आहे, असे अनेक शास्त्रशुद्ध संशोधनांतून दिसून आले आहे. शिवाय, या शस्त्रक्रियेचा परिणाम सुमारे 10-15 वर्षे टिकून राहतो. त्यामुळे व्यक्‍तीच्या कौटुंबिक व वैयक्‍तिक आयुष्याच्या दृष्टीने ही शस्त्रक्रिया विशेष मोलाची ठरते. प्रादुर्भावामुळे निर्माण होणार्‍या गुंतागुंतीचा धोका टाळण्यासाठी मधुमेह नियंत्रणात ठेवण्याची साधी तंत्रे पुरेशी असतात. (खर्चाबाबत संवेदनशील असलेल्या भारतासारख्या विकसनशील देशात पुन्हपुन्हा रुग्णालयात दाखल व्हावे लागणे आणि उपचारांची पुनरावृत्ती हे टाळले गेले तरी दीर्घकालीन बचतीमध्ये मोठी भर पडते आणि अर्थातच हृदयाची कार्यात्मकता व चैतन्य हरवले तर ते कितीही पैसा मोजला तरी परत येऊ शकत नाही. त्यामुळे वेळेवर केलेली उपचार प्रक्रिया  दीर्घकाळापर्यंत तुमची गाडी रुळावर ठेवू शकते व यासाठी कमीतकमी त्रास तुम्हाला सोसावा लागतो.) 

या गोष्टी लक्षात ठेवा

* लवकर निदान व गरज भासल्यास शस्त्रक्रिया
* डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार धूम्रपान किंवा तंबाखू टाळणे, यासारखे जीवनशैलीतील बदल.
* रक्‍तदाब व मधुमेह नियंत्रणात ठेवणे
* शस्त्रक्रिया झाल्यानंतर 3 महिन्यांच्या आत दररोज 5 किलोमीटर्स चालण्यासारखा व्यायाम सुरू करणे
* सुमारे 5-10 किलो वजन कमी करणे (रुग्णानुरूप बदलते) आणि ते वजन आयुष्यभर कायम राखणे
* काम लवकर सुरू करणे
* तणावमुक्‍त वातावरण व आराम

या काही गोष्टी केल्यास रुग्णाला व त्याच्या कुटुंबीयांना शस्त्रक्रियेनंतर आयुष्य पूर्वपदावर आणण्यात मदत होईल.

मिनिमली इन्व्हेसिव्ह बायपास शस्त्रक्रिया

छातीच्या डाव्या बाजूला 6-7 सेंटिमीटर एवढा छोटा छेद देऊन केली जाणारी मिनिमली इन्व्हेसिव्ह बायपास शस्त्रक्रिया हा अलीकडील काळात निर्माण झालेला पर्याय बहुतेक रुग्णांबाबत लाभाचा ठरत आहे. या प्रकारात रक्‍तस्राव तसेच वेदना तर कमी होतातच; शिवाय रुग्णाची प्रकृती जलद गतीने पूर्वपदावर येते. तसेच यात प्रादुर्भावाचा धोका जवळपास नसतो. साधारणपणे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर 6 दिवसांत घरी जाण्यास परवानगी देण्यात येते.