Wed, Apr 01, 2020 00:59होमपेज › Aarogya › गुडघे प्रत्यारोपण  समज आणि गैरसमज

गुडघे प्रत्यारोपण  समज आणि गैरसमज

Last Updated: Jan 08 2020 11:43PM
डॉ. मितेन शेठ

एखाद्या गोष्टीबद्दल अर्धवट माहिती असणे हे अज्ञानापेक्षा नक्‍कीच वाईट आहे. पण, कोणत्याही गोष्टीबद्दल एखादी माहिती मिळविताना त्याविषयी असलेल्या गैरसमजुती पहिल्यांदा मनातून काढून टाकणे आवश्यक आहे. गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेविषयी देखील बहुतांश लोकांमध्ये गैरसमज झाल्याचे दिसून येते. त्यामुळे या शस्त्रक्रियेविषयी मनात भीती वाटणे, शस्त्रक्रिया न करून घेणे असे प्रकार दिसून येतात. गुडघे प्रत्यारोपणाविषयी असलेल्या गैरसमजुती कोणत्या आणि त्या मागचे खरे सत्य काय? हे जाणून घेऊ.
गैरसमज - ओस्टीओआर्थरायटिस बरा होऊ शकतो.

वस्तुस्थिती - वाढत्या वयामुळे गुडघ्यावर ताण येऊन ओस्टीआर्थरायटिसचा सामना करावा लागतो आणि हा आजार वाढत्या वयामुळे गुडघ्यांची झीज झाल्याने होतो. त्यामुळे तो पूर्णतः बरा होऊ शकत नाही हेच खरे. ज्याप्रमाणे वय वाढते आणि डोळ्यांची द‍ृष्टी कमी होऊ लागते त्याचप्रमाणे गुडघेदेखील झिजू लागतात आणि यातून पूर्णपणे बरे होता येत नाहीच.
गैरसमज - शरीराचे अवयव बदलले जाऊ शकत नाहीत.

वस्तुस्थिती - एखाद्या अवयवाचे कार्य योग्यरीत्या होत नसल्यास त्यामुळे इतर अवयवांवर परिणाम होऊ नये याकरिता आधुनिक पद्धतीचा तसेच शस्त्रक्रियेचा वापर करून तो अवयव बदलून घेता येतो आणि तो पूर्णतः निकामी होऊ न देता त्याठिकाणी प्रत्यारोपणासारख्या पद्धतीचा अवलंब करून जीवनमान सुधारणे शक्य होते. गुडघ्यांसह फुफ्फुस, यकृत किंवा मूत्रपिंडांची तुलना करताना धूम्रपान, मद्यपान, मधुमेह किंवा काहीच कारण नसतानाही हे अवयव निकामी होऊ शकतात. अशा वेळी ट्रान्सप्लांट करणे, डायलिसीस सारख्या पर्यायांचा वापर करणे योग्य ठरते. तसेच गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आपल्याला गुडघ्यांना निकामी होण्यापासून वाचविण्यात मदत करते.
गैरसमज -  गुडघे प्रत्यारोपण अनेक वेळा अयशस्वी ठरते.

वस्तुस्थिती - गुडघा प्रत्यारोपण ही एक यशस्वी शस्त्रक्रिया आहे. अंदाजे 90-95 टक्के गुडघे प्रत्यारोपण 10-15 वर्षांसाठी यशस्वीपणे झाल्याचे पहायला मिळते. तर प्रत्यारोपणाच्या 85 टक्क्यांहून अधिक गुडघा शस्त्रक्रिया या 20 ते 25 वर्षे टिकतात. शरीर कृत्रिम धातूचे घटक स्वीकारते आणि मूळ हाडांमध्ये सामावून घेतले जाते. धातूची अ‍ॅलर्जी हे अपयशाचे एक अत्यंत दुर्मीळ कारण आहे. मानवी शरीरे व अशा तीन गोष्टी आहेत ज्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी कारणीभूत ठरतात.

1. रुग्णाला दिली जाणारी प्रेरणा आणि त्याचा आत्मविश्‍वास
2. शल्यचिकित्सक आणि शस्त्रक्रिया (ही सर्वस्वी रुग्णाची निवड असते)
3. देवच सर्वशक्‍तिमान (नशीब)
गैरसमज - गुडघा प्रत्यारोपण हे अतिशय वेदनादायक असू शकते.

वस्तुस्थिती - शरीरातील अकार्यक्षम झालेला अवयव पुन्हा कार्यरत होण्याकरिता थोड्याफार प्रमाणात वेदना या सहन कराव्या लागतात; मात्र यादेखील काही औषधोपचार आणि उपचारांनी कमी करता येतात. सहा महिन्यांपर्यंत रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर होणार्‍या वेदनांचा काहीसा सामना करावा लागतोच; मात्र त्या वेदना प्रसूती वेदना इतक्या मोठ्या प्रमाणात नसतात. डॉक्टर एखादी शस्त्रक्रिया करतात तेव्हा ती पूर्णपणे यशस्वी ठरेपर्यंत रुग्णाला वेदना सहन कराव्याच लागतात आणि गुडघे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतरही रुग्णाला वेदनांचा सामना करावा लागतो आणि तो कमी- जास्त प्रमाणात असतो.
म्हणून सकारात्मक व्हा, योग्य निवड करा, इच्छाशक्‍ती असू द्या आणि स्वतःवर आणि आपल्या शल्यचिकित्सकावर विश्‍वास ठेवा. यामुळे आपली गुडघा प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी होते.