वाढती थंडी आणि ज्येष्ठांचे आरोग्य

Last Updated: Jan 13 2021 10:17PM
डॉ. संजय गायकवाड

हिवाळ्यात ज्येष्ठ नागरिकांना काही आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. हिवाळ्यात मधुमेह आणि हायपर टेन्शनसारखे आजार असतील तर त्यात वाढ होते. थंडी वाढल्यामुळे रक्तही थोडे घट्ट होते. त्यामुळे नसा अधिक संकुचित होतात. शरीरातील रक्ताभिसरण चांगले होण्यासाठी हृदयाला जास्त श्रम करावे लागतात. हृदयाचे पंपिंग जास्त प्रमाणात होते. हृदयाचे श्रम वाढल्याने रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अधिक होतो. 

मुळातच ज्येष्ठ नागरिकांची रोगप्रतिकारक क्षमता कमी झालेली असते आणि या  मोसमात ती अधिक कमी होते. त्यामुळेच ज्येष्ठ नागरिक जास्त आजारी पडतात. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी या व्यतिरिक्त थंडीमुळे डोळेही कोरडे पडतात. 

काय कराल आणि काय टाळाल :

अस्थमा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयाच्या आजार असणार्‍या ज्येष्ठ नागरिकांनी या काळात कोमट पाण्याचे सेवन करावे. जेणेकरून सर्दी, खोकला आणि कफ, आदी समस्या भेडसावणार नाहीत. गरम पाण्यात मीठ घालून गुळण्या कटाक्षाने रोज कराव्यात.  

ज्येष्ठ नागरिक असूनही सकाळी चालण्याचा व्यायाम करत असाल तर चांगले आहे. मात्र, या मोसमात सकाळ आणि संध्याकाळ थंडीचे प्रमाण अधिक असते त्यामुळे यावेळी चालायला जाणे टाळावे. मात्र, थंड वातावरणामध्ये शरीरात ऊब निर्माण होण्यासाठी दुपारच्या उन्हात जरूर बसावे. 

घरातून बाहेर पडताना शरीर ऊबदार कपड्यांनी लपेटूनच बाहेर पडावे. अस्थमा, रक्तदाब आणि हृदयविकार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आपली औषधे वेळेवर न चुकता सेवन करावीत. तणावात राहू नका. तणाव दूर ठेवण्यासाठी नियमित थोडा व्यायाम करणे उत्तम आहे. 

आहार असावा असा : 

* सी जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे सेवन करावे; जसे आवळा, संत्रे, लिंबू, मोसंब आणि पेरू
* हिवाळ्यात तीळ, गूळ, हरभरा, ज्वारी, बाजरी आणि नाचणी सारख्या पदार्थांचे सेवन करावे. हे सर्व पदार्थ शरीराला उष्णता आणि ऊर्जा देतात. 
* सुका मेव्याचे सेवन करावे. रात्री 8 ते 10 बदाम भिजत घालून त्याची साल काढून घ्यावी. 2 अक्रोडही रात्री भिजवून सेवन करावेत. त्यासाठी एक चमचा अळशी किंवा जवस वाटून ते दह्यात घालून दिवसातून एकदा सेवन करावेत. 
* चाकवत, मेथी आणि पालक यांचे भरपूर प्रमाणात सेवन करा. 
* चहा किंवा कॉफीचे सेवन कमी करावे किंवा शक्यतो टाळावे. अतिमेद किंवा अतिचरबी असलेल्या पदार्थांना दूरच ठेवा. तसेच धूम्रपान, मद्यपाननापासून दूरच राहावे. 
* हिवाळा तरुणांसाठी तंदुरुस्त राहाण्यासाठीचा उत्तम ऋतू असला तरीही ज्येष्ठ नागरिकांसाठी तो त्रासदायक ठरतो. योग्य आहार, आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास ज्येष्ठांसाठीही हा काळ नक्कीच सुखावह ठरू शकतो.