Fri, Dec 04, 2020 04:29होमपेज › Aarogya › आरोग्यदायी टाळी

आरोग्यदायी टाळी

Published On: Sep 12 2019 1:43AM | Last Updated: Sep 12 2019 1:43AM
अपर्णा देवकर

लहानपणी कोणत्याही गोष्टींचा आनंद झाला की आपण टाळ्या पिटत उड्या मारायचो. आताही आपल्याला आनंद होतो; पण तो व्यक्‍त करण्यासाठी आपण टाळ्या वाजवत नाही. टाळ्या वाजवण्याच्या आनंदाला तर आपण मुकलोच आहोत; पण टाळ्या वाजवण्यामुळे होणार्‍या फायद्यांनाही आपण मुकतो आहोत. तुम्ही म्हणाल टाळ्या वाजवण्यात कसा आलाय फायदा? पण, मानवी शरीरातील अनेक आजारांपासून केवळ टाळ्या वाजवल्याने मुक्‍ती मिळू शकते. आपल्या तळहातावर असलेले संवेदना बिंदूंना उत्तेजन मिळते. त्यामुळे आपल्या आरोग्यात सुधारणा करण्यार्‍या मेंदूचा मोठा भाग कृतिशील होतो. 
साध्या टाळ्या वाजवणे हे आपल्या जीवनातल्या किती तरी गोष्टींशी निगडित आहे. बढती, चांगली श्रेणी, आनंद साजरा करणे अशा सर्वांशी टाळ्या निगडित आहेत. 

टाळ्या वाजवण्याचे उपचार

आपल्या शरीरातील सर्व अवयवांशी निगडित असलेले 39 अ‍ॅक्युप्रेशर बिंदू हे आपल्या तळहातांवर असतात. त्यामुळे टाळ्या वाजवल्या की हे बिंदू संवेदनशील होत असल्याने हळूहळू का होईना; पण परिणामकाररीत्या आपल्या आरोग्यात सुधारणा होते. आपल्या तळहातावरील अ‍ॅक्युप्रेशर पॉईंट हे शरीरातील विविध अवयवांशी जोडलेले असतात. त्यामुळे अवयवांमधील दुखणे बरे करण्यासाठी आपण या प्रेशर बिंदूंवर दाब देऊ न त्यांना कृतिशील बनवू शकतो. 

अ‍ॅक्युप्रेशरचे पॉईंटस् ः आपण टाळ्या वाजवतो तेव्हा पाच प्रकारच्या बिंदूंवर दाब येतो. 

* हँड व्हॅली पॉईंट
* बेस ऑफ थम्ब पॉईंट
* रिस्ट पॉईंट
* इनर गेट पॉईंट
* थम्ब नेल पॉईंट

आरोग्याचे लाभ

हातांवरील या प्रेशर बिंदूंवर दाब पडल्यास काही आरोग्याचे लाभ होतात. ज्येष्ठ नागरिकांमध्ये गाऊटची समस्या निर्माण होेते. टाळ्या वाजवून ही समस्या सोडवता येऊ शकते. कमी रक्‍तदाब असणार्‍या व्यक्‍तींनाही टाळ्या वाजवणे लाभदायी ठरते.

आपल्या मेंदूतील काही अडथळे टाळ्या वाजवल्यामुळे दूर होतात आणि दुय्यम रक्‍तवाहिन्यांमधील अडथळे दूर करण्यासही मदत करतात. त्यामुळे आपले शरीर आरोग्यपूर्ण राहण्यास मदत होते. तसेच मान, पाठ आणि सांधे यांच्या दुखण्यापासून मुक्‍तता होण्यासही मदत होते. 
पचनविषयक काही समस्या असल्यास टाळ्या वाजवण्याची ही उपचार पद्धती उपयोगी ठरते. 

दिवसभरात अर्धा तास टाळ्या वाजवल्या तर मधुमेह, आर्थ्रायटिस, हायपर टेन्शन, डिप्रेशन, क्रोनिक हेडेक, सर्दी, केस गळणे, डोळ्यांविषयक समस्या, निद्रानाश यापासून मुक्‍ती मिळू शकते. 

काही लोक सतत वातानुकूलित घरे, ऑफिस अशा ठिकाणी वावरत असतात. अशा वेळी क्लॅपिंग थेरेपीचा वापर केल्यास त्यांचे रक्‍ताभिसरण सुधारते. एसी किंवा वातानुकूलित वातावरणात राहिल्याने घाम येणे बंद होते. रक्‍ताभिसरणामुळे सर्वच शरीरातील विषद्रव्ये निघून जातात. 

अस्थमा किंवा हृदयरोग यांच्यापासूनही सुटका मिळवण्यासाठी टाळ्या वाजवणे हा उत्तम उपाय आहे. 
तळहातांवर हृदयापर्यंत  पोहोचणार्‍या अनेक नसा आहेत. हृदय, फुफ्फुस, यकृत यांना जोडणार्‍या अनेक नसा असल्याने टाळ्या वाजवल्यास नसा अधिक चांगल्या प्रकारे काम करू लागतात. 
टाळ्या वाजवल्यामुळे आपल्या शरीरातील प्रतिकारशक्‍तीत वाढ होते. रक्‍तवाहिन्या मजबूत होतात. त्या मजबूत झाल्यास रोगांशी त्या अधिक चांगल्या पद्धतीने लढू शकतात. 
मुलांमध्येही या उपचाराचे फायदे दिसून येतात. त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागतो. त्यांच्या हस्तलिखितात सुधारण होऊन स्पेलिंग लिहितानाच्या चुका कमी होतात. 
टाळ्या वाजवल्यामुळे रक्‍ताभिसरण वाढते. नीला आणि रोहिणी या वाहिन्यांमधील अडथळे राहत नाहीत. बॅड कोलेस्ट्रेरॉलपण नाहीसे होते. 
जेवणानंतर रोज एक तास टाळ्या वाजवल्यास एक प्रकारची ऊब येते आणि आपल्या हातापायांना घामही येतो. 

महत्त्वाच्या युक्त्या 

तळहातावर नारळाचे किंवा तीळाचे तेल लावूून मजास करा. त्यामुळे ते शरीरात जिरेल. पायात सॉक्स आणि चामड्याचे शूज घातल्यास आपल्या शरीरात तयार होणारी ऊर्जा बाहेर पडणार नाही. त्यामुळे रोज दिवसातून दहा ते वीस मिनिटे टाळ्या वाजवल्यास नैसर्गिकपणे आरोग्य वर्धन होईल. 

टाळ्या वाजवण्याचे तंत्र

उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने टाळ्या वाजवायला हव्या. तळवे एकमेकांच्या दिशेने तोंड करून थोडे शिथिल असावेत. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना लागले पाहिजेत. तसेच बोटेही एकमेकांवर घासली गेली पाहिजेत. या उपचाराचा चांगला फायदा मिळवण्यासाठी सकाळच्या वेळात ही उपचार पद्धती अवलंबायला हवी. त्यामुळे आपले बालपण आठवून आनंदाने टाळ्या पिटा आणि आरोग्याच्या तक्रारींपासून दूर राहा, असे म्हटल्यास गैर ठरणार नाही.