Fri, May 07, 2021 19:06
दम्याच्या रुग्णांनी कोरोना काळात काय काळजी घ्यावी?

Last Updated: Apr 29 2021 1:14PM

डॉ. संजय गायकवाड

जगभरात दरवर्षी मे महिन्याचा पहिला मंगळवार हा जागतिक अस्थमा दिन म्हणून साजरा होतो. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अस्थमा किंवा दम्याचा  आजार असणार्‍या रुग्णांच्या चिंतेत भर पडत आहे. कारण, या दोन्ही आजारपणातील लक्षणे बव्हंशी सारखीच आहेत; मात्र रुग्णांनी चिंता करण्याऐवजी सजग राहणे गरजेचे आहे आणि इन्हेेलरचा वापर सुरूच ठेवणे आवश्यक आहे. 

अस्थमा हा श्‍वसननलिकेवर परिणाम करणारा आजार आहे. श्‍वसननलिका ही फुफ्फुसातून हवा भरण्याचे आणि बाहेर सोडण्याचे काम करते. अस्थमामध्ये श्‍वसननलिकेवर आतील बाजूला सूज येते. साधारणपणे धूळ, धूर या कारणांमुळे किंवा हवामान बदलल्यामुळे अस्थमा पीडित लोकांचा त्रास वाढतो. हल्ली हा आजार साधारण झाला आहे. आई-वडिलांपैकी एकाला अस्थमाचा त्रास असेल, तर मुलांमध्ये हा आजार बळावण्याची शक्यता अधिक राहते. अस्थमाचा अ‍ॅटॅक येेण्यामागे हवेतील प्रदूषणदेखील कारणीभूत आहे. स्मोकिंग, धूळ, कारखान्यातून बाहेर पडणारा धूर, धूप, अगरबत्ती, कॉस्मेटिकसारख्या सुगंधीत वस्तूने दम्याच्या रुग्णासमोरील अडचणी वाढू शकतात. अस्थमा पूर्ण बरे होणारे उपचार फारसे नसले, तरी काही गोष्टींची काळजी घेऊन यावर नियंत्रण मिळवता येते. काळानुसार या आजाराच्या स्थितीत बदल होऊ शकतो. त्यामुळे अस्थमा असलेल्या रुग्णाला सतत डॉक्टरांच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे. जेणेकरून वेळोवेळी बदलणारी लक्षणे ओळखता येईल. 

अस्थमाचे लक्षण

दम लागणे, सतत खोकला येणे, छाती धडधडणे, श्‍वास घेताना शिटी वाजल्यासारखा आवाज येणे, छातीत कफ जमा होणे, श्‍वास घेण्यास अचानक त्रास होणे यासारखी लक्षणे आहेत. अस्थमा रोगींना रात्रीच्या वेळी झोपताना अधिक त्रास होतो, तर काहींना व्यायामाच्या काळात दम्याची लक्षणे दिसू लागतात. थंडी किंवा कोरड्या वातावरणात ही लक्षणे अधिक गंभीर होतात. 

उपाय

 पाऊस, थंडी आणि वादळापासून अस्थमा रुग्णांनी बचाव करावा.
 अधिक उष्ण किंवा दमट वातावरणातूनही स्वत:ला वाचवले पाहिजे. कारण, या प्रकारच्या वातावरणात मोल्ड स्पोर्स पसरण्याची शक्यता अधिक राहते.
 घराबाहेर जाताना मास्क ठेवा. मास्कमुळे प्रदूषणापासून बचाव होईल. धूम्रपान करणार्‍या व्यक्‍तीपासून दूर राहावे. घरात धूळ राहणार नाही, याची काळजी घ्यावी. 
 औषधे नेहमीच सोबत बाळगावीत. विशेषत: इन्हेलर आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे. 
 दम्याच्या रुग्णांचा आहार सकस आणि हेल्दी असावा. हिरव्या पालेभाज्यांचे सेवन नियमित करावे. थंड पदार्थ कटाक्षाने टाळावेत. 

कोरोना काळातील दक्षता

कोरोनाची साथ आली तेव्हा सुरुवातीच्या काळात अस्थमा असलेल्या रुग्णांना कोव्हिडची बाधा होण्याची शक्यता अधिक असल्याचे सांगितले जात होते. कारण, या रुग्णांच्या फुफ्फुसाची क्षमता कमकुवत असते. परंतु, अभ्यासातून काही गोष्टी स्पष्ट झाल्या असून अस्थमा रुग्णांनी घाबरण्याची गरज नाही. या रुग्णांनी सध्याच्या काळात अस्थेमेटिक इन्हेलरचा नियमित वापर करावा. 

कोव्हिडचा प्रसार वेगाने होत असल्याने रुग्णालये रुग्णांनी भरलेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधांची कमतरता निर्माण झाली आहे. सध्याच्या काळात अस्थमाचा अ‍ॅटॅक झाला, तर रुग्णालयात जावे लागेल आणि तेथे संसर्ग होण्याचा धोका अधिक राहू शकतो. त्यामुळे अस्थमा रुग्णांनी कोणत्याही स्थितीत डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करावे. 

जुनी औषधे आणि पथ्य नियमितपणे सुरू ठेवावेत. एखादी समस्या जाणवल्यास डॉक्टरांना दवाखान्यात भेटण्याऐवजी फोनवरून सल्लामसलत करून उपचाराविषयी मार्गदर्शन घ्यावे.  कोरोना काळात अस्थमाच्या रुग्णांना मास्क वापरणे कठीण ठरू शकते. मास्कचा वापर केल्यास दम्याचा आजार असलेल्या नागरिकांना श्‍वास घेण्यास अडचणी येतात आणि श्‍वास गुदमरण्याचा धोका असतो. त्यामुळे अधिकाधिक काळ घरातच थांबण्याचा विचार करावा. परंतु, घराबाहेर पडताना मास्क वापरणे विसरू नका. 

अस्थमा रुग्णांनी कोरोनाची लस आवर्जून घ्यावी. ही लस सुरक्षित असून या लसीमुळे कोव्हिड संसर्गापासून आपला बचाव होईल. या रुग्णांनी नियमितपणाने प्राणायाम, अनुलोम-विलोम, भस्रिका, भ्रामरी यासारखे श्‍वसनाचे व्यायाम करणे आवश्यक आहे.