Mon, Sep 21, 2020 17:46होमपेज › Aarogya › लहान मुलांमधील कर्करोग

लहान मुलांमधील कर्करोग

Last Updated: Feb 13 2020 1:36AM
डॉ. मनोज शिंगाडे

कर्करोगाने आता हातपाय पसरले आहेत. कोणत्याही वयाच्या व्यक्‍तीला तो होऊ शकतो. कर्करोग कोणातही भेदभाव करत नाही. अगदी लहान मुलांनाही कर्करोग होत असल्याचे आपल्या निदर्शनाला आले आहे. गेल्या 15-20 वर्षांत मुलांमधील कर्करोगांवर यशस्वी उपचार करण्यात यश येताना दिसत आहे. वैद्यकीय शास्त्राच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी मानली पाहिजे.

लहान मुलांमधील कर्करोगांवर यशस्वी उपचार केले जात आहेत. लहान मुलांमध्ये आढळणार्‍या कर्करोगांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्करोगग्रस्त मुलांवर संपूर्ण उपचार केले जात आहेतच; या व्यतिरिक्‍त कर्करोगाला मुळापासून उखडून टाकण्यातही  यश येत आहे. काही वेळा मुलांना काही समस्या किंवा आजारांना सामोरे जावे लागते. त्याकडे पालकांनी विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा डॉक्टरांना असते. लहान मुलांना रोज सकाळी उलटी येऊ शकते. त्याला पालक शाळा बुडवण्यासाठीचा बहाणा म्हणून दुर्लक्ष करतात किंवा अगदी खूप लहान वयाच्या मुलांना पायात वेदना होत असल्याने त्यांना चालता येत नाही. थोडा थोडा वेळाने मूल कडेवर घेण्याचा आग्रह करत असते. पालक मात्र बराच काळ मुलांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष करतात; परंतु मुलांमध्ये सातत्याने अशी लक्षणे दिसत असल्यास त्यावर उपचार करूनही 15 दिवसांनंतरही मुलांमध्ये अशी लक्षणे सतत दिसत राहिल्यास आणि महत्त्वाचे म्हणजे, अशा वेदना होण्यासाठी काही विशेष कारणही नसेल तर केवळ मुलांचा बहाणा या नावाखाली मुलांच्या या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. कारण, मुलांमध्ये ही लक्षणे ब्रेन ट्युमर किंवा हाडांच्या कर्करोगाचीही असू शकतात. त्यामुळेच पालकांनी अतिदुर्लक्ष न करता आँकोलॉजी विशेषज्ज्ञाशी संपर्क करावा. मुलांची योग्य तपासणी करून निदान झाल्यास आणि त्यावर योग्य उपचार झाले तर कर्करोगासारख्या गंभीर आजारापासूनही बचाव करता येऊ शकतो.  

मुलांमध्ये प्रामुख्याने आढळणारे कर्करोगाचे प्रकार : कर्करोगाची लक्षणे ओळखणे कठीण असते. त्यातही मुलांमध्ये ही लक्षणे ओळखणे कठीणच आहे. कारण, अगदी साध्या आजाराप्रमाणे ही लक्षणे असतात. तरीही काही लक्षणांच्या आधारे आपण सतर्क राहून त्याचे वेळीच निदान करू शकतो. 

रक्‍ताचा कर्करोग (ल्युकेमिया, लिम्फोमा) : रक्‍ताच्या प्लेटलेटस् कमी झाल्यामुळे रक्‍तस्राव होणे, शरीरावर काळे, निळे किंवा लाल रंगाचे रक्‍तस्रावाचे डाग पडतात. अशक्‍तपणा वाटणे, वजन कमी होणे, ताप येणे किंवा एखाद्या भागात गाठ येणे, पोट फुगणे, प्लीहा वाढल्याने पोट बाहेर येणे, लिम्फोमामध्ये लिम्फनोडमध्ये सूज आणि गाठ येणे.
ब्रेन ट्युमर (सेंट्रल नर्व्हस सिस्टीम ट्युमर) : डोकेदुखी, उलटी येणे विशेषतः सकाळी उठल्यावर येणे, चक्‍कर येणे, अशक्‍तपणा जसे उजवा हात कमजोर होणे, दृष्टी कमजोर होणे. 
हाडांचा कर्करोग (ऑस्टियो सारकोमा) : हाडाला अगदी हलकीशी इजा झाली तरी सतत वेदना होत राहातात. पाठदुखी किंवा पोटदुखी होत असेल तर निष्काळजीपणा न करता त्वरित तपासणी करून घ्यावी. लहान मुले दर थोडा वेळाने कडेवर उचलून घेण्याचा हट्ट करतात, हात किंवा पाय यांच्या  सांध्यांच्या हाडांना सूज येणे आणि वेदना होणे. 
डोळ्यांचा कर्करोग (रेटिना ब्लास्टोमा) : डोळे लाल होणे, पापण्या पांढर्‍या किंवा लाल होणे. 
नेफ्रोब्लास्टोमा (किडनीचा कर्करोग) : पोटदुखी, ताप, मळमळणे, भूक न लागणे, चिडचिड होणे. 

रक्‍ताचा कर्करोग बरा होऊ शकतो :

लहान मुलांमधील रक्‍ताचा कर्करोग (ब्लड कॅन्सर : अ‍ॅक्युट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया किंवा एएलएल), रेटिना ब्लास्टोमा (डोळ्याचा कर्करोग) आणि विल्म्स ट्युमर (किडनीतील), न्यूरोब्लास्टोमा, ब्रेन ट्युमर आदी प्रकार पाहायला मिळत आहेत. त्यातही सर्वाधिक रुग्ण हे रक्‍ताचा कर्करोग आणि रेटिनो ब्लास्टोमा याविषयी आढळतात. अर्थात, दोन्हीवर उपचार करणे शक्य आहे. कर्करोग प्राथमिक पातळीवर असताना जर उपचार करण्यात आले तर रक्‍ताच्या कर्करोगामध्ये 80 टक्के आणि रेटिनो ब्लास्टोमा मध्ये 60 टक्क्यांपर्यंत रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. 

आजार कसा ओळखावा? : योग्य वेळी रोगाचे निदान झाले आणि त्यावर उपचार सुरू केले तर रुग्ण लवकरात लवकर बरा होऊ शकतो. रक्‍ताच्या कर्करोगामध्ये मुले अशक्‍त होतात, शरीरात रक्‍ताची कमतरता निर्माण होते. ताप आल्यास तो लवकर बरा होत नाही. प्लेटलेट कमी झाल्याने रक्‍तस्राव होऊ शकतो. रक्‍तही कमी होऊ शकते आणि वाढूही शकते. या रोगामध्ये अनेकदा रक्‍ताच्या पेशींची वाढ पूर्ण झालेली नसतानाच रक्‍तामध्ये येतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. अशी काहीही लक्षणे दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करावी. रेटिनो ब्लास्टोमामध्ये आजाराचे निदान होण्यासाठी 6 महिने ते 3 वर्षांचा कालावधी लागू शकतो. प्राथमिक पातळीवर निदान करण्यासाठी अंधारात डोळे पाहावे. अंधारात मांजराचे डोळे जसे चमकतात तशाच प्रकारे या रोगग्रस्त मुलांचे डोळेही अंधारात चमकतात. कर्करोगाच्या या पातळीवर उपचार होऊ शकले नाहीत तर पुढील पातळीत डोळे बाहेर येऊ लागतात. 

उपचार कसे होतात?  

रक्‍ताच्या कर्करोगात 80 टक्के रुग्ण बरे होतात; परंतु त्यासाठी रुग्ण आणि नातेवाईक या सर्वांना खूप धीर राखावा लागतो. कारण, हे सर्व उपचार दीर्घ कालावधीसाठी सुरू राहतात. उपचारांसाठी 2-3 वर्षेही लागू शकतात. त्यासाठी दर महिना खर्चही बराच येतो. रेटिनोब्लास्टोमाच्या उपचारांना कमी कालावधी लागतो. खर्चही कमी येतो. किमोथेरेपी, रेडिओथेरेपी आणि शस्त्रक्रिया यामार्फत त्यावर उपचार केले जाऊ शकतात. 

रक्‍ताच्या कर्करोगाचे निदान : रक्‍ततपासणी, लिम्फोफासाठी बायोप्सी आणि सीटी स्कॅन केले जाते. रक्‍ताच्या कर्करोगासाठी बोन मॅरोची तपासणी करावी लागते. ब्रेन ट्युमर किंवा बोन मॅरो  यांची तपासणी एमआरआय आणि बायोप्सी करून केली जाते. 

उपचार : बायोप्सीमध्ये कर्करोगाचे निदान झाल्यास किमोथेरेपी, शस्त्रक्रिया, रेडिएशन थेरेपी आणि औषधे यांनी उपचार केले जातात. रक्‍ताच्या कर्करोगाच्या 10-15 टक्के बालरुग्णांवर उपचारासाठी बोन मॅरो ट्रान्सप्लांट केले जाते. कर्करोगासाठीचे उपचार हे 6 महिने ते 3 वर्षांपर्यंत सुरू राहतात. रेडिएशन थेरेपी दीड महिन्यापर्यंत आठवड्यातून पाच दिवस घ्यावी लागते. बालरुग्ण भविष्यात सर्वसाधारण आयुष्य जगू शकावेत म्हणजेच मोठे झाल्यावर सर्वसामान्य व्यक्‍तींप्रमाणे शिक्षण, नोकरी आणि लग्‍न करू शकतील, या दृष्टीने किमोथेरेपी किंवा रेडिएशन उपचार करताना त्याचा परिणाम हृदय, मूत्रपिंड, मेंदू, गर्भाशय यांच्यावर कमीत कमी व्हावा, असा प्रयत्न केला जातो.

प्रगत औषधोपचार : प्रगत उपचारांतर्गत अनेक देशांमध्ये टारगेटेड थेरेपी, जीन थेरेपी, इम्युनोथेरेपी आदी प्रगत तंत्रज्ञानांचा वापर केला जातो. अर्थात, या उपचार पद्धती महागड्याच आहेत. त्यामुळेच आपल्या देशात फार कमी रूग्णालयात या उपचार पद्धती उपलब्ध आहेत. ऑस्टिओ सारकोमा हाडांचा कर्करोग किंवा डोळ्यांचा कर्करोगामध्ये पूर्वी हात किंवा पाय कापावा लागायचा किंवा डोळा काढून टाकावा लागत होता. त्याऐवजी आता उपचारांनी कर्करोग बरा होतो. अवयव काढून टाकावा लागत नाही. त्यासाठी लिम्फ ऑर्गन प्रीझर्व्हिंग ट्रीटमेंट केली जाते. त्यामध्ये लिम्फ किंवा ऑर्गन प्रिझर्व्हिंग सर्जरी करून कर्करोगाने बाधित भाग काढून टाकून तो स्पेशल लिम्फ प्लांट लावले जातो. त्याचबरोबर नियमित फिजिओथेरेपी म्हणजेच शारीरिक हालचाली करून घेतल्या जातात. जेणेकरून रुग्ण नियमितपणे सर्वसाधारणपणे हालचाली करू शकतात. 

लक्षणे ओळखावी कशी?

थकवा, सतत होणारा रक्‍तस्राव आणि शारीरिक वेदना  शरीराच्या कोणत्याही भागात अचानक वेदना, गाठ येणे आणि सूज  डोळ्यांमध्ये बदल होणे, डोळ्यांचे बुब्बुळ पांढरे होणे, कमी दिसणे आणि सूज येणे  पोटाला सूज येणे  सकाळी सकाळी डोेकेदुखी आणि उलटी येणे, पूर्ण दिवस चक्‍कर येत राहणे  हाडांमध्ये वेदना आणि सूज येणे  विनाकारण ताप येणे, वजन कमी होणे, सतत खोकला, दम लागणे आणि रात्री झोपेत घाम येणे.
 

 "