Fri, Nov 27, 2020 11:46‘सीओपीडीसह राहा आनंदात : सर्वजण, सर्वत्र!’

Last Updated: Nov 19 2020 2:18AM
डॉ. अनिल मडके 

दुसरी लाट ...अर्थात कोरोनाची येणार का? या विवंचनेत आता प्रत्येक जण आहे. या काळजीपोटीच  संसर्ग टाळण्यासाठी  फटाके उडवू नका, अशी कळकळीची विनंती सर्व जनांना विविध समाजमाध्यमांतून करण्यात येत आहे. त्याला सर्वांनी जबाबदारीने प्रतिसाद देणे, तितकेच अगत्याचे आहे. कारण त्यामुळे होणारे प्रदूषण अनेकांच्या जीवाशी येणार आहे. हे अनेक आहेत दीर्घकालीन श्‍वसन विकारांनी त्रस्त असणारे लोक. उदा. दमा, क्रोनिक ब्राँकायटीस, सीओपीडी, आयएलडी इत्यादी.  

दरवर्षीप्रमाणे दिल्लीत प्रदूषणाची पातळी आताही वर गेलेली आहे. दिल्लीकरांना धूर, धुके आणि धुरके यांचा सामना करत कोरोनाला तोंड द्यावे लागत आहे. हवेतील पारदर्शकता कमी झाली आहे. वायूप्रदूषणाची गंभीर पातळी केवळ दिल्लीपुरती मर्यादित राहिली नाही. भारतातल्या बहुतेक शहरांमध्ये वायूप्रदूषण वेगाने वाढत आहे.

वायूप्रदूषणामुळे होणारा एक महत्त्वाचा विकार म्हणजे सीओपीडी होय. नोव्हेंबर महिन्यातील तिसरा बुधवार हा दिवस जागतिक सीओपीडी दिन म्हणून, ग्लोबल इनिशिएटिव्ह फॉर ऑब्स्ट्रॅक्टिव्ह लंग्ज डिसीजेस (GOLD) या जागतिक संस्थेच्या वतीने इ.स. 2002 पासून जगभर साजरा केला जातो. या निमित्ताने एक घोषवाक्य जाहीर केले जाते. यावर्षीचे घोषवाक्य आहे- Living Well with COPD ; Everybody, Everywhere ' म्हणजे सीओपीडीसह तंदुरुस्त :  सर्वजण, सर्वत्र!’ 

सीओपीडी हा दीर्घकालीन चिवट श्‍वसनविकार आहे.  ‘क्रोनिक ऑब्स्ट्रॅक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ या विकाराच्या नावाची COPD ही अद्याक्षरे आहेत. दीर्घकाळ साथ करणारा, श्‍वसनास अडथळा आणणारा फुप्फुसांचा विकार म्हणजे सीओपीडी. 

जगभरात सीओपीडी वेगाने वाढत आहे. वेगवेगळ्या कारणांनी मृत्युमुखी पडणार्‍यांमध्ये सीओपीडीचा नंबर हा तिसरा लागतो. कोणत्याही प्रकारचा धूर विशेषतः सिगारेटचा धूर हा सीओपीडीचा प्रमुख कारणीभूत घटक आहे. प्रदूषणकारी वायूमधील विविध घटक उदा. सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रेटस्, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डाय ऑक्साईड, वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म घटक (पार्टिक्युलेट मॅटर्स  - पीएम), लेड, हवेतील बाष्प कण आणि इतर कण (व्होलाटाईल कंपाऊंडस् ) अशा वेगवेगळ्या घातक घटकांमुळे सीओपीडीचा त्रास संभवतो.

ज्या व्यक्‍ती सिगारेट, बिडी, चिलीम, हुक्‍का, गुडगुडी अशा या ना त्या प्रकाराने धूम्रपान करतात, त्या व्यक्‍तींना कालांतराने सीओपीडी होतोच; पण ज्या व्यक्‍ती स्वतः धूम्रपान करत नाहीत पण आजुबाजूला धूम्रपान करणार्‍या व्यक्‍ती असतात त्यांना जसे की, कुटुंब, कार्यालय, सार्वजनिक ठिकाणे, बंद जागा-थिएटर्स, मंडई, रेल्वे, बसस्थानक इ. ठिकाणी सीओपीडीचा धोका भविष्यात उद्भवू शकतो. कारखाने, गिरण्या अशी धूर सोडणारी ठिकाणे, पेट्रोल, डिझेलवर किंवा ज्वलनशील गॅसवर चालणारी वाहने यामुळे वातावरणात प्रदूषण निर्माण होते. वातावरणातील हे कण नाकातून फुफ्फुसात प्रवेश करतात आणि फुप्फुसातील सूक्ष्म श्‍वासवाहिन्या - वायुकोश यांच्यावर दाह निर्माण करतात. यामुळे वायुकोशाच्या आकुंचन-प्रसरणावर परिणाम होतो. फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होते. यालाच सीओपीडी म्हणतात.

प्रदूषित वातावरणात दीर्घकाळ राहणार्‍यांना तसेच, भर चौकात ज्यांची कार्यालये किंवा दुकाने आहेत, उदरनिर्वाहासाठी, नोकरीसाठी, धंद्यासाठी ज्यांना रस्त्यावर बराचसा वेळ व्यतीत करावा लागतो, ज्यांची घरे रस्त्यालगत आहेत, अशा सर्वाना सीओपीडीचा धोका असतो. धूम्रपान करणार्‍या व्यक्‍ती, खाणकाम किंवा रस्त्याचे काम करणार्‍या व्यक्‍ती, ज्यांचे राहणीमान कनिष्ठ दर्जाचे (निकृष्ट) आहे, ज्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष आहे, ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे त्यांना आणि क्षयरोग वा एचआयव्ही- एड्सग्रस्त व्यक्‍तींना सीओपीडीचा धोका संभवतो.

बाहेरच्या किंवा वातावरणातील हवेच्या प्रदूषणाबरोबर  (आऊटडोअर पोल्युशन) घरातील प्रदूषण (इनडोअर पोल्युशन) हेदेखील सीओपीडीचे प्रमुख कारण आहे. ग्रामीण भागात इंधन म्हणून जिथे लाकूड किंवा शेण्या वापरल्या जातात, तिथला धूर सीओपीडीला कारणीभूत असतो. थंडी सुरू झालेली असताना लोक शेकोटी पेटवतात हे श्‍वसनासाठी धोक्याचे असते. काही ठिकाणी डास होतात म्हणून धूर केला जातो, तोही सीओपीडीला कारणीभूत असतो.

सीओपीडीचे निदान पल्मोनरी फंक्शन टेस्ट या चाचणीद्वारे केले जाते. फुप्फुसाची कार्यक्षमता ही साधी फुंकर मारून संगणकावर पाहिली जाते. यावरून सीओपीडीचे निदान आणि त्याची तीव्रता समजते. त्यावरून औषधोपचारही  ठरविले जातात. सीओपीडीसाठी आज विविध प्रकारची औषधे उपलब्ध आहेत. श्‍वासावाटे घ्यावयाची औषधे अत्यंत परिणामकारक ठरतात, पण ती औषधे नियमितपणे घ्यावी लागतात. 

सीओपीडीबरोबर जर हृदयविकार, मधुमेह स्थूलता, घोरणे किंवा अन्य दीर्घकालीन विकार असतील तर अशा व्यक्‍तींमध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. नियमित औषधोपचारासह आहारयोजनेचेही महत्त्व आहे. सीओपीडीचे रुग्ण हे कृश किंवा स्थूल असतात. कृश व्यक्‍तींनी वजन वाढवावे तर स्थूल व्यक्‍तींनी वजन कमी करावे. सकस आहार - ज्यात सर्व अन्‍नघटकांचा समावेश असेल, असा आहार घ्यावा. सीओपीडीच्या तीव्रतेनुसार व्यायाम करणे आणि मानसिक ताणतणावांपासून दूर राहणे या बाबी सीओपीडीवर मात करतात. सीओपीडी जर पुढच्या टप्प्यात गेला तर रुग्णाला छोट्या श्रमानेही दम लागतो. काही वेळा हवेतील प्राणवायू पुरत नाही. अशा व्यक्‍तींना ऑक्सिजन घ्यावा लागतो. सीओपीडीच्या रुग्णांनी आणि नातेवाईकांनी सीओपीडी समजावून घेतला तर त्यावर मात करणे अवघड नाही. म्हणूनच फटाके उडविण्यापूर्वी सीओपीडी आणि इतर सर्व रुग्णांचा विचार करा आणि भोवतालची हवा शुद्ध राहील यासाठी कटिबद्ध राहण्याचा निश्चय करावा, असे वाटते.